ती वाट लांब गेली

मज आठवे आता तो
जो काळ 'भूत' झाला
सल बोचरा असा हा
हृदयात आत गेला

आकाश चांदण्यांचे
न मुळीही अभ्र होते
हातातली कला अन
डोळ्यांत स्वप्न होते

हृदयात आस होती
नि मनात ध्यास होता
केला परंतु मी का
हा अट्टाहास होता

सोडून मी ती वाट
चोखाळी राजरस्ता
यश, लक्ष्मी, कीर्ती सारे
मिळते इथे नि सत्ता

तरीही मनात दाटे
जे बोललोच नाही
ती वाट लांब गेली
जी चाललोच नाही