गालांतल्या गालांत - २

एका कंपनींत उच्चस्तरीय मीटिंगसाठी अधिकारी जमलेले असतात. मीटिंगला वेळ असतो. ड्रिंक्स होत असतात. मीटिंगच्या वेळेवर चेअरमन येतात. सर्वजण स्थानापन्न होऊ लागतात. चेअरमन साहेबांसाठी संत्र्याचा रस येतो. तो पिऊन झाल्यावर चेअरमन आपल्या नेहमींच्या शैलींत उपस्थितांना उद्देशून म्हणतात, " आता चांगलं काही करण्यासारखं नसेल तर आपण मीटिंगला सुरवात करू या." (ऑर्थर हॅले च्या 'व्हील्स' या कादंबरीतून).

अमेरिकेंतल्या एका सिनेटरच्या बायकोला जुगाराचे व्यसन असतं. त्यांत सतत हरत असल्याने तिला खूप कर्ज झालेलं असतं. नवऱ्याला ही गोष्ट माहीत नसते. कर्ज न फेडल्यामुळे कर्जदार व्यावसायिक कलेक्टर्सना ते काम देतात. कलेक्टर्स पैसे न दिल्यास घरांतल्या जमिनीवर खिळ्यांनी ठोकून टाकू अशी तिला तंबी देतात. ती घाबरते आणि नवऱ्याला सांगते. नवरा चिडतो. पण बायकोला वाचवण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करायचे ठरवतो. तो कलेक्टर्सच्या प्रमुखाला भेटायला बोलावतो. सिनेटर त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण तो ऐकत नाही. शेवटी सिनेटर त्याला म्हणतो, 
" मी कोण आहे तुला माहीत आहे ना?"
"होय साहेब. आपण सिनेटर आहांत."
"माझे अगदी वरपर्यंत लागेबांधे आहेत."
प्रमुख त्यावर हसतो आणि म्हणतो,
"माझे लागेबांधे अगदी खालपर्यंत आहेत"
(सिडनी शेल्डनच्या 'ब्लडलाईन' या कादंबरींतून)

अमेरिकेंत वांशिक भेदभाव करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
एकदा एक गोरा एक्झिक्यूटिव्ह डिपार्टमेंतल स्टोअरच्या पार्किंग लॉटमधून गाडी बाहेर काढत असतो. त्याचवेळी समोरून एक गाडी काहीशा वेगानेच आत शिरत असते. दोन्ही गाड्यांची टक्कर होता होता वाचते. एक्झिक्यूटिव्ह चिडतो व समोरच्या माणसाला धडा शिकवण्याच्या तिरीमिरींत गाडींतून बाहेर येतो. समोरच्या गाडींतला माणूसही बाहेर येतो. तो निग्रो असतो.
गोरा चमकतो. 'समोरचा गोरा असता तर मुस्काटच फोडलं असतं', त्याच्या मनांत येतं. समोरचा निग्रो ते ओळखतो. किंचित हसून तो गोऱ्याला म्हणतो, "भेदभाव केल्याबद्दल मी तुला कोर्टांत खेचू शकतो". 
(ऑर्थर हॅले च्या 'व्हील्स' या कादंबरींतून)