महाराष्ट्र विद्यालयात आम्ही

तीसेक वर्षांपूर्वी आम्ही जनता शिशुमंदिरात पायधूळ झाडली होती, आणि त्या वेळेस त्या अपरिपक्व बालक-बालिकांच्या लीलांनी आम्हाला अचानक पळ काढावा लागला होता हे सर्वांस विदीत असेलच. तीस वर्षांनंतर आता पुन्हा एकदा तत्सम बालक-बालिकांची स्थिती काय आहे ते बघावे अशी विपरीत बुद्धी आम्हाला झाली आणि जे घडले त्याचा हा वृतांत.

आपणांस आठवत असेलच की तिथला सर्व छात्रवर्ग जयप्रकाश गुरुजी किंवा कृपलानी गुरुजी यांना मानत असलेला (वा तसे सांगत असलेला) होता. तीस वर्षांत या दोन गुरुजींचे सर्वप्रकारचे अस्तित्व मिटवून टाकण्याचे काम लागोपाठच्या सरकारांनी केले. जे सरकारला जमले नाही ते त्यांच्या अनुयायांनी केले.

ते शिशुमंदीर मोठे होताहोताच लयाला गेले, आणि पक्षवार शाळा काढण्यापेक्षा राज्यवार एकत्र येऊन शाळा भरवावी यावर सगळ्या पक्षांचे एकमत झाले. त्यामुळे आता महाराष्ट्र विद्यालय वेगळे, गुजरात विद्यालय वेगळे आणि कर्नाटक विद्यालय वेगळे. भारत शिक्षण संस्थेच्या आवारात ही सगळी विद्यालये नांदत आहेत.

आम्ही (म्हणजे आमचे पूर्वसुरी) तर त्या शिशुमंदिरात तीस वर्षांपूर्वी गेलो होतो. मग त्यावेळच्या शिशुमंदिरातील जनता (म्हणजे 'जनता' या राजकीय अर्थाने नव्हे, तर 'पब्लिक' या सर्वमान्य अर्थाने) आज विद्यालयातच कशी? ती तर केव्हाच महाविद्यालय (कसे का होईना) पार करून पोटापाण्याच्या उद्योगाला लागली असेल, किंवा बजाज ऑटोमध्य असेल तर सक्तीच्या निवृत्तीला आली असेल, अशी शंका कुणाला आल्यास त्याचे निरसन प्रथम करतो.

ही सर्व जनता (पब्लिक) राजकारणातील होती हे आठवत असेलच. आणि राजकारणी लोकांकरता वेगळा काळ असतो. तुम्हा-आम्हांसारख्या मर्त्य (आणि तरीही मतदारयादीत टिकून रहाणाऱ्या) मतदात्यांची पाच वर्षे ही 'त्यां'ना एका वर्षासमान असतात. त्यामुळे गेली तीस वर्षे 'त्यां'च्यासाठी जवळपास सहा वर्षेच उलटली. (एकूण या मंडळींची बौद्धिक वये याच गतीने वाढतात म्हणा) जवळपास यासाठी की मध्येच काही नतद्रष्ट बालिकांनी धडपड करून मतदात्यांचे तेरा महिने 'त्यां'च्या वर्षासमान करून दाखवले.

तरीही अगदी आठ वर्षे मोजली तरीही शिशुमंदिरातला घोळका आता विद्यालयात असणे हे ओघानेच आले. आणि वर्षानुवर्षे मिळालेल्या वाढत्या फीच्या आधारावर एका शिशुमंदिराची आज एक मोठी शिक्षणसंस्था होणे हेही ओघानेच आले.

तर आम्ही महाराष्ट्र विद्यालयात जाण्याचे ठरवले त्याची ही पार्श्वभूमी.

आम्हाला न्यायला 'कृष्णा' नामक कुणी मुलगा आला. 'कृष्णा' नावाचा मुलगा असू शकतो हे आम्हाला आमची भाषा तशी जुन्या वळणाचे असल्याने माहीत नव्हते. त्यामुळे आम्ही (पत्नीच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून) जरा सजूनच तयार होतो. तर आला हा बालक. आणि तोच इतका सजलेला होता की आम्हालाच आमची लाज वाटली. त्याच्या परीटघडीच्या कपड्यांकडे पाहून आणि केसांच्या पक्क्या झुलुपांकडे पाहून हे सगळे रात्रीच्या झोपेतही विस्कटत नसेल याची खात्री पटली आणि आमचे चमकणारे टक्कल कसे झाकावे या विवंचनेत आम्ही त्याच्याबरोबर चालू लागलो.

जाताजाता काही माहितीकण मिळवावेत म्हणून आम्ही त्या कृष्णाबरोबर संवाद सुरू केला. आम्हाला आठवत होते त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष आपापले वेगळे अस्तित्व टिकवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत असल्याने महाराष्ट्र विद्यालयात वेगवेगळ्या खोल्यांत जनता वर्ग, काँग्रेस वर्ग, शेतकरी कामगार वर्ग, शिवसेना वर्ग इत्यादी असतील असे आम्हाला वाटत होते. पण कृष्णाने त्याला छेद दिला. "नाही साहेब, आता सगळे पक्ष एकत्र येऊन मिळूनच शाळा करतात".

आम्हाला एकतर 'साहेब' उल्लेखाने दचकायला झाले. आम्हाला साहेब म्हणजे फेदरवेट साहेब. त्याच्या अस्सल इंग्लिशला भिण्यात आमचा जन्म गेला. अहो, आमच्या शंकऱ्याच्या वेळेला 'हि'ला तिच्या पार्ल्यातल्या मावशीकडे डोहाळजेवणाला सोडण्याकरता मला अर्धा दिवस रजा पाहिजे होती. पण फेदरवेट साहेबाला कळेलसे 'अस्सल' इंग्लिश सुचेपर्यंत शंकऱ्याचा पहिला वाढदिवस होऊन गेला होता. त्यामुळे साहेब हे बिरूद आम्हाला तसे भीतीदायकच. "अरे कृष्णा" (चुकून "अगं कृष्णा" म्हणणार होतो), "त्यापेक्षा सरळ 'गुरुजी' म्हणालास तरी चालेल". कृष्णाने आमच्याकडे थोड्याशा (खरेतर चांगल्याच) चमत्कारलेल्या नजरेने पाहिले, आणि तो म्हणाला, "नको साहेब ('ब' पूर्ण), 'गुरुजी' म्हणून ते तुमचं अपमान कशाला की हो?" हे आम्हाला काही कळले नाही. 'गुरुजी' हा अपमान? भाषा फारच बदललेली दिसत होती.

दुसरे दचकायचे कारण भाषेच्या संदर्भातलेच होते. 'शाळा काढतात', 'शाळा भरवतात', 'शाळा चालवतात' आदी वाक्प्रयोग आम्हाला परिचित होते. पण 'शाळा' हे नाम 'करणे' या क्रियापदाबरोबर चालते हे आमच्या व्याकरणात बसत नव्हते. आम्ही आमची शंका कृष्णासमोर मांडताच तो वदला, "साहेब, आता 'शाळा करणे' हेच सगळ्यात पाप्युलर बघा".

आता काय ते बघूच या म्हणून आम्ही मुकाट चालू लागलो.

जाताना प्रथम कर्नाटक विद्यालय लागले. कृष्णाची पावले तिकडे वळली. हे काय? बेळगाव महाराष्ट्रात येण्याऐवजी कर्नाटक-महाराष्ट्र एकीकरण होऊन गेले की काय? या विचारात कृष्णाकडे बघताच ओशाळवाणा हसत तो परत रस्त्यावर आला.

त्या कर्नाटक विद्यालयाच्या आवारात एक धोतर लुंगीसारखे गुंडाळलेला काळाशार माणूस नाचणीच्या पिठाची लापशी भुरकत होता आणि मधूनच डुलक्या मारीत होता. तो शेतकरी आहे हे सिद्ध करायला त्याने कुदळ, फावडे इत्यादी सामान आजूबाजूला पसरून ठेवले होते. "हा कोण"? असे कृष्णाला विचारताच त्याचा सात्त्विक संताप उफाळून आला. "हे हुच्च नशिबानं चांगलं दिल्लीच्या कालेजात पोचलं होतं. पण लायकी नाही वो. ह्येचं लायकी खरं म्हणाल तर हसनच्या शिशुमंदिरात जायचंपण नाही बगा. आता दिल्ली रिटर्न म्हणून हिंडत असतंय इकडेतिकडे धोतर वर धरून. वरनं आपल्या हुडग्याला घुसवून बसलाय कर्नाटक विद्यालयाचं मॉनिटर म्हणून". कृष्णा चांगलाच संतापलेला दिसत होता. आम्ही मुकाट चालू लागलो.

महाराष्ट्र विद्यालयासमोर आम्ही पोचताच एका केसांचा कोंबडा काढलेल्या उंच्यापुऱ्या मुलाने "साहेब आले" अशी आरोळी ठोकली.

"हे तुम्हाला घेऊन यायचं खरंतर याचं काम बघा. पण हे हिंडत असतंय सारखं इंदापूर, खेड, बारामती करत. आज कसं काय इकडं कुणास ठावं. कुणाला तरी आश्वासनं देऊन पळून आल्यालं असंल नेहमीसारकं" कृष्णा आमच्या कानात फुसफुसला.

पण आमचे त्याच्याकडे फारसे लक्ष नव्हते. "साहेब आले" या आरोळीने समोर दंगा करणारा एक समूह "आमचे एकच दादा, प्रगतीचा पुणेरी वादा; घड्याळात वाजले दहा, साहेब इकडे पहा" अशा घोषणा देत आमच्याकडे येऊ लागला. त्यातील बऱ्याच जणांची शरीरबोली पाहून आम्ही चांगलेच टरकलो. पण आम्हाला बघताच त्यांच्या घोषणा विरून गेल्या.

"त्यांना वाटलं की त्यांचे 'साहेब' दिल्लीहून आलेत भांडणं सोडवायला. पण त्यांच्या साहेबांना आमच्या म्याडमनी कोंडून ठेवलंय गव्हाच्या पोत्यांमागे." कृष्णा परत कुजबुजला.

दुसऱ्या कोपऱ्यात एक दुसरा घोळका आपापसात मारामाऱ्या करत या पहिल्या घोळक्याकडे नजर ठेवून होता. बाकीची मुले भगव्या टोप्या घालून इकडेतिकडे विखुरली होती.

"मुलांनो, हे साहेब आले आहेत. चला आता आत जाऊ या" अशी कृष्णाने घोषणा केली. तेवढ्यात एका कोपऱ्यातून लाडू खात खात गुटगुटीत शरीरयष्टीचा नितिन पुढे झाला. "काह्याला आत चला म्हणते तुम्ही? आम्ही आत्ताशा कुठे मतभेद मिटवून सभात्यागाची औपचारिक घोषणा करून राहिलो होतो नं? एक तर हे दोनतीन पोट्टे चांगलेच बह्याड झालेत हल्ली. एक पुण्यात आमच्यासोबत तीन पायांची शर्यत खेळू म्हणते. दुसरं दिल्लीला जाते म्हणून बीडलाच आट्यापाट्या खेळत बसते. आणि हे तिसरं मुंबईतून फुटक्या डरकाळ्या मारत बसते. सुखानं सभात्याग करून जरा चार लाडू खावेत तर तेही करून देत नाही."

मग कृष्णाने त्याची समजूत काढली की सभात्याग करायला हे नेहमीचे अधिवेशन नसून पाहुण्यांसाठीचे खास अधिवेशन आहे, आणि त्यात सभात्याग करायची प्रथा नाही. नाराजीने कुरकुरत नितिनने "संचलन, एकसाथ अंदर चलो"ची आरोळी ठोकली. तेवढ्यात दुसऱ्या कोपऱ्यात संजय आणि मिलिंदने शाल पांघरून एक बोट उंचावून बोलण्याची प्रॅक्टीस करत असलेल्या उद्धवला ढोसले. अचानक गडबडून तो ओरडला, "युती असली तरी आम्ही ज्येष्ट बंधू आहोत हे विसरून चालणार नाही". क्षणभर शांतता पसरली. "हा मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे" उद्धव परत ओरडला.

मागल्या बाजूने संथ पावले टाकत मनोहर पुढे झाला आणि त्याने उद्धवला समजावले की महाराष्ट्रात सगळेच मराठी आहेत. आणि ज्येष्ठपणाच्या गोष्टी खेडच्या नाक्यावर गप्पा मारत बसलेल्या रामदासने केल्या पाहिजेत.

मुलींच्या घोळक्यात मोर्चा मोर्चा खेळत असलेली नीलम पुढे झाली, आणि 'माननीय हिंदूहृदयसम्राटांच्या सूचनेवरून आणि कार्यकारी अध्यक्षांच्या आदेशावरून रामदासने ताबडतोब आत चलावे' अशी द्वाही फिरवली. "च्यामारी, हिला फुडे व्हायची काय्येक गरज नव्हती. उगाचच मदीमदी करते. पुन्याला काय तां करून दाकव म्हनला की उगाचच मुलींचे मोर्चे काडत हिंडते" कपाळाचा गुलाल पुसून खेड नाक्यावरून पळत येता येता रामदार आपल्या साथीदारांसोबत कुजबुजला.

दोन गालांत दोन आवळे ठेवून हसत असलेला नारायण शेरे मारत उभा होता. "ह्येंका प्लोअर कॉर्डिनेशन जमूचाच नाय माज्यासारका. मी हुतंय तेव्हा येक आवाज टाकला की मुकाट सगले आत शिरत. हिंमत होती कुनाची अशी टायली करन्याची? सत्याचा विजय करून दिला असता येका तलवारीत" तेवढ्यात त्याच्या कानावर रामदासचे कुजबुजणे गेले. झपाट्याने तिकडे जात तो पुटपुटला, "तुका कदीचा सांगतंय ये माज्यावांगडा म्हनून. आपन येकत्र जालो तर रायगडच्या रोठ्यापासून मालवणच्या मासलीपर्यंत सगलेकडे आपलाच राज्य. मग सपासप एसीझेड काडून टाकू. वर्साला पाच नवीन पंप आनि दहा हाटेलां काढशीत, रवळनाथाशप्पथ". पण नारायण आपल्याकडे येत असलेला पाहून रामदासने आधी संजय-मिलिंदकडे पाहिले, आणि ते दोघेही आपल्यावरच नजर लावून बसले आहेत हे ध्यानात येताच तो थेट मनोहरकडे गेला. आणि नारायणला कालिदासने हाका मारण्याचा सपाटा लावला म्हणून नाईलाजाने तोही तिकडे वळला.

"मातेच्या दुधाशी बेइमानी करणाऱ्याला कडवट मराठी हिंदू कधीही माफ करणार नाही. असल्या अफजलच्या अवलादीला कबरीत गाडायला चवताळून उठा" उद्धव म्हणाला. पण त्याचे तोंड तर मिटलेले दिसत होते आणि संजयचे ओठ हलल्यासारखे वाटले.

एवढ्यात दिल्लीहून एक गाडी आली. त्यातून शरद उतरून झपाझप आत आला. त्याच्या एका हातात त्याने बॅट धरली होती आणि दुसऱ्या हातातल्या भ्रमणध्वनीवर बोलतच तो आत येत होता. "त्या नाबार्डवाल्यांना म्हणा उद्याची मीटींग कॅन्सल. उद्या द्रवीडचा निरोपसमारंभ आहे. आणि परवाला त्या गहू आयातीचा रेट अजून वाढवून घ्यायचाय त्या साठी जागतिक बाजारभाव बदलायचेत, त्याची गुप्त बैठक आहे". तुंदिलतनूच्या मानाने तो झपाझप चालत होता.

त्याच्या मागोमाग पहिल्यांदा घोषणा देणारा सगळा समूह मुकाट आत शिरला. सगळ्यात पुढे शरदबरोबर रहाण्यासाठी आबा पळापळ करीत होता, पण अजितने ती जागा आधीच पटकावली होती. त्याच्या मागोमाग जावे तर छगन, विजय, जयंत रेटारेटी करीत होते. अखेर आबा कसाबसा दिलीपबरोबर आत शिरला. शेवटी "अब्बी तू अंदर चल, फिर भाअर आके देकताच मै तेरेको" अशी सदाशिवला धमकी देऊन हसनही आत गेला.

"युतीत बघा, बोलतात तरी ज्येष्ठ कोण ते, आपल्याकडे बघा, मॉनिटरच पावडर लावून भांग पाडण्यात गुंग असेल तर हे असे 'दुसऱ्या' नंबरवालेच आधी आत घुसणार. मग आपण कसे होणार नंबर एक?" प्रभा रागारागाने म्हणाली. लगेच मार्गारेटने आपला भ्रमणध्वनी काढला आणि त्यात बोलायला सुरुवात केली. "दिल्लीशी बोलतेय" असा मोठ्या आवाजात खुलासाही केला. तिच्याभोवती नारायण, कालिदास, रोहिदास इत्यादी मुले जमायला सुरुवात होताच "मंडळाचा विस्तार हे पाहुणे गेले की लगेच होईल" अशी आरोळी ठोकून विलास शरदच्या टोळीपाठोपाठ आत शिरला. प्रभाभोवतीची सगळी प्रभावळ मुकाट विलासपाठोपाठ गेली.

इकडे अखेर उद्धव आणि गोपिनाथ गळ्यात गळे घालून आत शिरू लागले. आपले एक पाऊल पुढे असेल याची काळजी उद्धव घेत होता. आपलाच फोटो काढला जात आहे अशा आनंदात मनोहर हसत होता.

आत वर्गात गडबड करीत सगळे घोळके बसले.

आम्ही कुणाला प्रथम संबोधावे असा विचार करीत असताना शरद दिसला. तोच सगळ्यांत ज्येष्ठ वाटत होता, म्हणून मी त्याला हाक मारली, "बाळ शरद".

अचानक शरदबरोबर दुसऱ्या कोपऱ्यातून एक दुसरा मुलगा उभा राहिला. त्याने अंगावर शाल घेतली होती आणि डोळ्यांवर काळा चष्मा लावला होता.

"अरे आव्वाज कुणाचा?" अशी आरोळी रामदासच्या पाठिराख्यांनी मारली. त्याला "काकांचा" असे उत्तर राज आणि अजितने मिळून दिले. तो फटाका तिथेच विझला.

पण आम्हाला हा दुसरा मुलगा कोण ते कळले नाही. मागच्या वेळेस तर तो शिशुमंदिरात वा आजूबाजूच्या माँटेसरीत नव्हता. हे विचारल्यावर झपकन मनोहर पुढे झाला. "साहेब, हा आपल्या हातात रिमोट घेऊन बसतो. रिमोटची बॅटरी उतरली की फेकून देतो आणि नवीन घालतो. त्याचे जाहीर बोलणे आपण जाहीरपणे ऐकले तर आपण गोत्यात येतो" या खुलाशाने आम्हाला फारसे कळले नाही. "पण मी शरदला हाक मारल्यावर हा का उभा राहिला?" "याचे नावच 'बाळ' आहे. आणि सध्या तो शरदला भागीदारीत घ्यायचा विचार करतोय". असे होते तर.

"या वर्गाचा मॉनिटर कोण?" विचारल्यावर विलास चटकन उठून उभा राहिला. त्याच्या बरोबरच आबाही उठला. नारायणही उठून उभा रहाणार तोच "ते आजच्या मॉनिटरबद्दल विचारताहेत, उद्याच्या नव्हे" असे प्रभाने त्याला समजावले.

आता 'बाळ शरद' या संबोधनात दोन नामे असू शकतात. पण एकाच वर्गाला दोनदोन मॉनिटर? तर गडबडीने आबाने खुलासा केला, की तो उपमॉनिटर आहे. "पण असे पद आपल्या घटनेत आहे का?" या आमच्या प्रश्नाला "तशी घटना नसली तरी प्रथा आहे, आणि ती प्रथा मुरारजीने चरणला शिशुमंदिराचा उपमॉनिटर करून सुरू केली" असे भारत नावाच्या चुणचुणीत मुलाने प्रेक्षकांच्या गॅलरीतून उत्तर दिले.

लगेचच भारतच्याच ओळीत बसलेला कुमार उठला, आणि ही इंदिरेने कसे मुरारजीला उपमॉनिटर केले होते आणि त्याही आधी जवाहरने कसे वल्लभला उपमॉनिटर केले होते याचे त्याने चिरक्या आवाजात सविस्तर विवेचन केले. शेवटी 'नेहरू घराण्याचे कर्तृत्त्वच एवढे आहे की अनेक जणांना विस्मृतीचा विकार जडतो. सोनियाच्या त्यागाने हे आजचे दिवस दिसत आहेत' अशी पुस्ती जोडली.

खपात आपण अग्रेसर असलो तरी असे पटकन उठून बोलणारा आपल्याकडे कुणी का नाही याबद्दल राजेंद्रने आपल्या लोकांना झापायला सुरुवात केली.

आम्ही परत सूत्रे आमच्या हातात घेण्याचा प्रयत्न केला.

"तर मुलांनो, आपल्या महाराष्ट्राला आज ज्या समस्या भेडसावत आहेत, त्यांना तोंड द्यायला तुम्ही काय तयारी करताय हे जाणून घ्यायला मला आवडेल".

"कसली समश्या? मला मॉनिटर करा, सगळ्यांच्या समश्या मिटवून टाकतो. ज्यांच्या समश्या नाही मिटणार त्यांनाच मिटवून टाकतो. पाश्शे पेटी तय्यार आहे आपल्याकडे आजच्या तारकेला. अजून पायजे तर तसं बोला" नारायण पटकन बोलला. प्रभा आणि मार्गारेटने कौतुकाने त्याच्याकडे पाहिला. "नारायण एक अंगार है, बाकी सब भंगार है" श्रीकांतने आरोळी ठोकली.

केसांचे झुलूप उडवीत विलास पुढे झाला. "आज आपल्या विकासाचा वेग ८% वरून ९.५%वर गेला आहे (इथे "असे माझी ओळ का ढापतो रे लातुऱ्या?" असे जयंत उठून ओरडला. "ए, चिदंबरम शेवटी आमच्यात आला आहे हे विसरून नकोस" असे त्याला पतंगने झापले). आपले शेतकरी कापसात दगड भरून आणि तोंडात तंबाकू भरून बसले आहेत (इथे "हा शेतकऱ्यांचा अपमान आहे" असे नारायण आणि नितिन जवळपास एकत्रच कुरकुरले. "उद्धव, दोघेही एकत्र बोलताहेत. लक्ष आहे ना?" असे संजयने त्याला ढोसले). आता फक्त दोन-चार अमेरिका दौरे केले की बिल गेटस पासून सगळे आपल्या समस्या मिटवून टाकायला पळतच येतील".

"पण बजाजचे काय? मराठी कामगारांच्या पोटावरती पाय?" असे सूर्यकांत ओरडला. "तुम्ही लोकांनीच त्याला पाठवलेय दिल्लीच्या कॉलेजात, आता तुम्हीच काय ते बघा" असा विलासने प्रतिटोला दिला.

"तरी मी म्हणतोय की यापेक्षा रामसेतूचा मुद्दाच चांगला. एक तर तो सेतू आहे भारताच्या बाहेर. म्हणजे काही पाडापाडी करायची वेळ आलीच तर उगाच कोर्टात खटले दाखल व्हायला नकोत. मागच्या वेळेच्या खटल्यांनी लालकृष्ण आणि मुरली अजून गोत्यातच आहेत. आणि दुसरे म्हणजे राम काही आपल्याला निवडणूक निधी देऊ शकत नाही. त्यामुळे उद्या करुणानिधीला नाहीतर जयललिताला बोलावण्यासाठी घूमजाव करावे लागलेच तरी हरकत नाही. नाहीतरी भूतकाळात रमणे हीच आपली खरी ओळख" चष्मा लावलेल्या 'मागो'ने मागे वळून आपल्या सहकाऱ्यांचे बौद्धिक घेतले.

"रामसेतू आणि अणुकरार या दोन्हींवर आमच्या कडवट सैनिकांचा विचार चालू आहे" बाळने जाहीर केले. ("अरे, आता तू हे सगळे बोलायला हवेस" असे मग तो दमलेल्या स्वरात उद्धवला म्हणाला. उद्धव कॅमेऱ्याची काच पुसत हेलिकॉप्टरची वाट पहात बसला होता. "मी तर केव्हाचा तयार झालो होतो. मला शाल पांघरून, मनगटावर घड्याळ उलटे बांधून, एक बोट उंच करून बोलायची सवयपण झाली होती" राज कुरकुरला. बाळने पटकन आपला काळा चष्मा सारखा केला)

"तो छगन कुठे रे हिंडत असतो झेंडूच्या फुलांच्या माळा घेऊन? दिल्लीत कसा पोचला तो? हल्ली त्याचं हिंदीही सुधारलंय. भायखळ्याच्या मार्केटातलं हिंदी नाही बोलत तो आता" शरदने विचारले. "काळजी नको, माझे लक्ष आहे त्याच्याकडे" असे अजितने समजावले.

"आपल्याकडे निष्ठावंतांची कदर नाही हीच खरी समस्या आहे" सुपारी चघळत रणजित पुढे झाला. विलासने ते ऐकून न ऐकल्यासारखे केले. प्रभा डोळे मिटून पाय चेपत बसली होती (स्वतःचे).

"मग जाऊन ऱ्हायला की नाही दिल्लीला ते बोलून टाक नं एकदाचं. नाहीतर मीतरी जातो. बंगाली मार्केटात छोले-भटूरे तरी खाईन निवांतपणे" नितिनने गोपिनाथला टोचले.

आम्ही सगळा गोंधळ एकदम आवरण्यासाठी निकराचा प्रयत्न केला. "मुलांनो, आज महाराष्ट्र म्हणून आपल्याला एकत्र यायला हवे असे तुम्हाला वाटत नाही का?"

"हो ना, पण नुसत्या महाराष्ट्रावर दिल्लीच्या कॉलेजात मॉनिटर होता येत नाही म्हणून आम्ही 'राष्ट्रवादी' झालो" शरदने खुलासा केला.

"महाराष्ट्रात 'महार' हा शब्द सर्वप्रथम येतो. पददलितांच्या आणि तळागाळातल्या जनतेच्या उद्धरणासाठी मला मॉनिटर केल्याशिवाय जातीयवादी शक्तींना आळा घालता येणार नाही. मायावतीचा मनूवाद या फुले-आंबेडकरांच्या भूमीत सहन केला जाणार नाही" हा दुसरा रामदास.

"महाराष्ट्रातला 'महा' हा मूळचा संस्कृत शब्द. आणि संस्कृत ही हिंदूंची भाषा. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदूंचेच राज्य असले पाहिजे" गुजराती वळणाच्या मराठीत प्रवीण ओरडला.

"महाराष्ट्रातला 'म' आणि मुस्लिमांतला 'म' हा सारखाच. त्यामुळे महाराष्ट्र हा धर्मनिरपेक्षच होता आणि धर्मनिरपेक्षच राहील. पुढच्या वर्षीची छटपूजा करायला पोपलाच बोलावतो" हा दुसरा संजय.

"आता मी 'मी महाराष्ट्रीय' असे आंदोलन सुरू करेन लौकरच" मिलिंदने ढोसढोसून उद्धवच्या तोंडून एवढे वदवले.

"जोपर्यंत ट्रॅक्टर आणि जीन्सचा खप एकत्र वाढत नाही, जोवर एका ट्रॅक्टरवर चार जीन्स फुकट असल्या योजना राबवल्या जात नाहीत, तोवर महाराष्ट्राची एकही समस्या सुटणार नाही" राज गरजला. आम्हाला क्षणभर बाळच बोलल्याचा भास झाला.

मतामतांच्या या गलबल्यात आमच्याकडे कुणाचेच लक्ष उरले नाही हे पाहून आम्ही काढता पाय घेतला. बाहेर येऊन बघतो तर कृष्णा आधीच बाहेर पडला होता, आणि कर्नाटक विद्यालयाच्या आवारातल्या त्या काळ्या माणसाबरोबर काहीतरी कुजबूज करीत होता.

टीप: (१) हा लेख 'ओरिजिनल' नसून याची प्रेरणा कुठे आहे हे वरती कबूल केलेलेच आहे. हा कुणाला शालीला ठिगळ लावण्याचा प्रयत्न वाटला तर दुर्लक्ष करावे.

(२) येथे दिलेले सगळे संवाद व सगळी वर्णने संपूर्णपणे कल्पित आहेत. त्यात कुणाचाही जाणूनबुजून वा नकळत उपमर्द वा अपमान करण्याचा कणभरही हेतू नाही.