बस मधील अनुभव.

एकदा मी माज़्या बायको बरोबर बेस्ट बस मधुन पार्ल्याहुन दादरला जात होतो. संध्याकाळची वेळ असल्याने फार गर्दी नव्हती. आम्च्या बाजुच्या बाकावर एक बाई आणि तिचा बहुदा आठवी नववीतला मुलगा असे बसले होते. त्याच्या आईने त्याला पिशवीतुन एक बिस्किटाचा पुडा काढुन दिला. त्या मुलाने एक एक करत सर्व बिस्किटे संपवली आणि मग प्लस्टिक चुरगाळुन खिडकीजवळ हात नेला आणि तेव्हढ्यात मी त्याला "ए, थांब, आई कडच्या पिशवित ठेव ते! घरी घेउन जा आणि कचऱ्याच्या पेटित टाक" असे नरम आवाजातच सांगितले. पण मी ज्या प्रकाराने त्या मुलाला रंगेहात पकडले होते, ते पाहुन बसमधील बरिच माणसे संमतीदर्शक हसली आणि ते पाहुन त्या मुलाची आई चिडली! "तो लहान आहे, त्याला तुम्ही काय बोलता? त्याला थोडेच कळते आहे? आले मोठे समाज सुधारक!" वगैरे बोलु लागली. पण अनिच्छेने का होइना, प्लस्टिक स्वतःकडच्या पिशवीत रागा रागाने ठेवुन मला म्हणाली, "झालं समाधान?". मी म्हटले "ठीक आहे, त्यात माझ्या समाधानाचे काय आहे? मी तुम्हाला चांगलेच सांगितले. अहो, तुमचा मुलगा उद्या शिकुन मोठा झाल्यावर परदेशात जाइल आणि इकडे आल्यावर तिकडच्या स्वच्छतेच्या, शिस्तीच्या गोष्टी सांगेल, तेव्हा तुम्ही कौतुकाने ऐकाल, पण आतापासुनच त्याला हे शिकवायला तुमचा विरोध का?" त्यावर तो मुलगा म्हणाला "माझे बाबा सिंगापुरलाच असतात! मी तिथे जाउन आलो आहे! तिकडे असा कचरा टाकायला बंदी आहे!". मी म्हटले "हे तुझ्या आईला सांग, तिला सांग तु आता लहान नाहिस ते!" यावर त्या बाईचा पारा चांगलाच चढला! ती बरेच काही बाही बडबडायला लागली. तिचे असे म्हणणे होते कि मी तिच्या अब्रुचे धिंडवडे काढले, तिला चिल्लर कारणावरुन जिणे नकोसे करुन टाकले वगैरे, वगैरे!!!  मग ती बाई माहिमला उतरुन गेली आणि बसमधिल बाकिच्या लोकांना वाचा फुटली! सर्व लोक माझ्या कृतीवर बेहद्द खुश होते असे कळले. मी त्याने विशेष खुश न होता त्यातिल एक दोघांना उद्देशुन संयमाने म्हणालो "आभारी आहे, पण तुम्ही तेव्हा सुद्धा बोलु शकला असता, असो, पुढच्या वेळी असे कुणी करताना दिसले तर आपल्या विचारांशी प्रामाणिक राहुन स्पष्टपणे बोला."