खिडकीतून डोकावतांना

खिडकीतून डोकावतांना

                               बालपणापासून ज्या गोष्टी मला आवडतात त्यांच्या यादीमध्ये  खिडकीला विसरून चालणार नाही. खिडकीतून अलगद  मनात शिरलेल्या  आठवणी अजूनही परीटघडीच्या कपड्याप्रमाणे जशाच्या तशा नीटनेटक्या आहेत.   मोठी झाले तरीही मी कित्येकदा जेवायचे ते सुद्धा खिडकीत बसून .    तिसरी चौथीत गेले तरी कधी कधी हट्टाने मी आईला मला तूच भरव असा आग्रह करत असे. असेच एकदा माझे जेवण सुरु असतांना  खिडकीत एक मोठ्ठा कावळा आला. खिडकीच्या गजाला चोच मारणाऱ्या  कावळ्याला पाहून मी घाबरले अन् गडबडीत धपकन खाली पडले. पण  तेवढ्याने खिडकीत बसण्याचा नाद  मात्र कमी झाला नाही. आयुष्याच्या प्रवासात  खिडकी मला भेटतच राहिली; विविध वाटांवर,वेगवेगळ्या रूपात!

                       खिडकीसमोरच्या त्या छोट्या जागेत, भावंडांबरोबर अंग अवघडून बाहेर बघण्याची स्पर्धा आठवली की आजही ओठावर हसू येते.  आमच्या सोसायटीत फुगेवाला, फेरीवाला, भाजीवाला असे अनेकजण नेहमीचेच  ये जा करणारे.   त्यांच्या चालण्याच्या तऱ्हा, त्यांचे निरनिराळे अंगविक्षेप बघण्यात त्यावेळी  मोठी मजा यायची.   'अनोळखी माणसाला  कधीही दार उघडू नका'; अशी ताकीद आम्हाला आईने दिली होती . त्यामुळे जमेल त्या खिडकीतून आम्ही भावंडे, 'कोण आलय' याचा अंदाज घेत असू.  खात्री झाली की दरवाजा उघडत असू.

                आमच्या घराला असणाऱ्या एका  खिडकीच्या डाव्या  कोपऱ्यातून, शेजारच्या घराच्या छपराची सावली दिसायची. त्या सावलीत किंवा कुंपणालगतच्या झाडाचा आडोसा शोधून तटस्थपणे एक गाय रवंथ करत असे.  घराच्या मागच्या बाजूला एक अडगळीची खोली होती. तिला एक भलीमोठी खिडकी होती. लपाछपीच्या खेळत असतांना  त्या खोलीत लपले की खिडकीतून भलामोठा वड दिसत असे.    मागून येऊन  हळूच मुलीने आपल्या आईच्या गळ्याभोवती हात गुंफावेत अशा त्या वडाच्या पारंब्या दिसत. आमच्या आजीच्या खोलीला दोन खिडक्या होत्या. एका खिडकीतून भिंतीपलिकडील झोपडपट्टी दिसे.  झोपडपट्टीत भांडणाचे आवाज सुरु झाले की आजी चिडत असे. उठून ती  खिडकी बंद करत असे. मग त्यानंतर खुर्चीत बसून माळेतले मणी ओढत काहीतरी पुटपुटत ती जप करत असे.  तरीसुद्धा बाहेरच्या संभाषणाने माझे सुरक्षित पांढरपेशे मध्यमवर्गीय घर ढवळून निघत असे.   त्याच खोलीच्या दुसऱ्या खिडकीतून अशोकाची चार झाडे दिसत. त्याच्या शेजाऱी भिंतभर ऐसपैस जागेत आरामात विसावलेला रातराणीचा वेल  होता. त्याच्या उजव्या बाजूला आपलाच पायथ्याशी गळणारा बहर बघत शांतपणे उभा असणारा संयमी  प्राजक्त होता. बदलत्या ऋतूचक्रात सृष्टीचे बदलते रूप आमच्या घराच्या खिडकीतून मी तासन् तास बघत असे.  जग खिडकीच्या चौकटीएवढेच नसते तर त्याकडे त्या छोट्या  चौकटीबाहेर डोळसपणे बघायला शिकायला हवे, हेच मला भेटलेली प्रत्येक खिडकी  खुणावून सांगायची.   
वर्गात जिथे खिडकी असेल असा बाक आणि जागा मिळावी असाच माझ्या कंपूचा प्रयत्न असायचा. शिक्षक शिकवतांना बाहेर प्रांगणात कोण खेळतय , कोण बाहेर उभ आहे, अशी सारी बित्तंबातमी आमच्या बाकामुळे सर्व वर्गाला मिळायची. वय वाढत गेल तस तस खिडकीने मनामध्ये  मोठी जागा व्यापली, खिडकी अगदी जिवलग मैत्रीण झाली.  

                             महाविद्यालयीन दिवसात खिडकीच महत्त्व अनन्यसाधारण आहे. मनाला भुरळ घालणाऱ्या ,हृदयाभोवती पिंगा घालणाऱ्या कित्येक गोष्टींकरता खिडकीचा आडोसा, खिडकीचा आरसा, तर कधी मनाचीच खिडकी झालेली मला आठवते आहे. 'सांज ढले खिडकीतले ..तुम सिटी बजाना छोड दो' अशी खट्याळ गाणी उगीच का अमर झाली आहेत!    सिनेमागृहातली तिकिटाची इवली खिडकी, माझ्या अभ्यासाच्या खोलीची खिडकी, मोठ्या बंगल्यातली एक मोठी खिडकी अशा अनेक रूपात खिडकी मला भावली आहे. साहित्यातही आणि चित्रपटात खिडकीला मानाचे स्थान आहे.  ऐतिहासिक घटनेचा संदर्भ देताना किल्ला म्हटला की  एखाद्या राणीने गवाक्षातून चंद्राकडे किंवा राजाने प्रजेकडे टाकलेला एक कटाक्ष असायलाच हवा.   कोणत्याही गीतामध्ये   सखी, तिचा सजणा ... त्यांचा विरह  किंवा मीलन काही दाखवायचे असले तरी  एक मोठा गवाक्ष आणि चंद्रचांदण्या सुद्धा आल्याच!! 

                        खिडकीचे गज, सरकत्या काचा, बारीक जाळी, शोभिवंत पडदे .. असे एक ना अनेक अडथळे पार करत माझे खिडकीप्रेम कायम राहिले आहे.  आगगाडी, बस, विमान या सर्व वाहनात  खिडकीलगत जागा कशी मिळेल याची ध्यास मला लागला असतो.  कारमध्ये , बसमध्ये बसले असतांना दिसतात त्या वेगाने पळणाऱ्या झाडांच्या आणि डोंगरांच्या  रांगा मला खूप आवडतात.  सहप्रवाश्याच्या हातातील वर्तमानपत्र जसे लोचटपणे मान वळवून वळवून वाचणारे असतात ना अगदी तसेच मी जिथे खिडकी असेल तिथे पोचण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नांमुळे मी कित्येकदा लोकांची बोलणी व  त्यांचे तिरपे कटाक्षसुद्धा सहन केले आहेत.   भर चौकात कार थांबली की आशाळभूत नजरेने आपल्याकडे याचना करणारे असंख्य इवले हात काचेआडून बघितल्याचे आजही ठवतात.  नकळत पर्सकडे हात जातो.  जे बघायचे नाही अथवा त्यापासून दूर पळायचे म्हणून खिडकीची काच बंद केली तरी मनाची खिडकी बंद करता येत नाही हेच खरे आहे.  
विमांनात बसल्यावर एकमेकांच्या हात हात गुंफून चालणारे ढग, पावसाच्या धारा, समांतर चाललेले दुसरे विमान हे सारे मला अनेक विमान फेऱ्यांनंतरही  आजच्या घटकेलासुद्धा  खिडकीतून बघावेसे वाटते. विमानाच्या खिडकीतून हात बाहेर काढता येत नाहीत याची खंत तर आहेच.   कुरळ्या केसांप्रमाणे असणारे ढगांचे गुच्छ विमानाच्या खिडकीतून अप्रतिम दिसतात.  

 उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या घराच्या खिडक्यांना वाळ्याचा ताटी लावण्याचा एक कार्यक्रम असे. ताटीवर पाणी घालण्याचे काम मला खूप आवडायचे. पण खिडकीतून बाहेर बघता येत नाही याची खंतही मनात असायची. ताटीवरून थेंब थेंब करत पाणी खाली खिडकीत ठिबकत असे.  घर बदलले, शहर बदलले.  खिडक्यांची जागा अन् आकार बदलले. घराला खिडक्या अजूनही आहेत.. आता माणसांना थांबून निवांत श्वास घ्यायला वेळ नाही. पण एका क्षणाचा विसावा सुखकर करणाऱ्या खिडक्या आहेत हे ही नसे थोडके!  इतिहासाच्या पुस्तकात क्रांतीकारकांची चरित्रे वाचताना ,कारागृहात ठेवलेले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कोठडीला असणारी एक छोटी खिडकी यावर मी विचार करत असे. ते दृष्य कितीवेळा माझ्या डोळ्यासमोर येई. खिडकीबाहेर डोळ्याने पाहू शकले नाही तरी जगाचा कानोसा तरी त्यांना  खिडकीमुळे घेता येत असावा असे माझ्या भाबड्या मनाला वाटत असे.  

                                     माझा देशही  आता बदलला आहे.  ते फेरीवाले, ती गाईगुरे, ती झाडे.. सारे मी एका जुन्या खिडकीशेजारी सोडून आले आहे. कोणे एके काळी खिडकीतून मनाला भावणार दृष्यही आता या नव्या जागी दूर्मिळ झाले आहे.  कधीतरी पाऊस दिसतो.. जुन्या आठवणीतला तर कधी आठवणीतल्या पावसासारखा !  आता सजलेली रंगीत पाने दिसतात तर कधी पानांनी साथ सोडली म्हणून   एकाकीपणे गोठणारी  बापडी झाडे दिसतात.   असच कधी नजरेसमोर  भुरभुरणार बर्फ येत.   ट्युलिपच्या बागा दिसतात.   भिन्न वर्णाची दोनचार मुले   हातवारे करत माझ्या खिडकीसमोरून जाता असतांना  किलबिलतात.  अशा वेळी माझी मनाची खिडकी जुन्या आठवांनी भरुन येते.   'टिंग' अशा आवाजाने माझी तंद्री भंग पावते.    मी भूतकाळातून पुन्हा वर्तमानात येते तोवर माझ्या संगणकावरील मायक्रोसॉफ्टच्या खिडकीतून दिसणारे जग मला वेगाने खुणावत असते.  माझा दिवस सुरु असतो तो त्या एका खिडकीच्या सोबतीने- एका नव्या खिडकीच्या शोधात!

सोनाली जोशी