...तुझी आठवण आहे !

...तुझी आठवण आहे !
.....................................
उरी-अंतरी सभोवताली एकाकीपण आहे
...हाच दिलासा! सोबत माझ्या तुझी आठवण आहे !
तुझ्याकडे येण्यास निघालो... प्रवास करतो आहे
दोन पावले पुढे जाउनी मागे सरतो आहे
तुला पाहण्यासाठी अगदी व्याकुळ झालो आहे
दूर मला सोडून तुझ्या मी दारी आलो आहे
भरले डोळे ! भरून डोळे तुला पाहतो आहे...
अबोल माझी प्रीत आज मी तुला वाहतो आहे
समीप माझ्या असूनही तू किती दुरावा आहे !
थकवा देतो ! असा कसा हा सांग विसावा आहे ?
अंधाराची ज्योत इथे ही कुणी लावली आहे ?
कशी दिसावी ? सांग तुझी मज कुठे सावली आहे ?
                    * * *
...परतीचाही प्रवास आता सुरू व्हायचा आहे
कळते आहे, निरोप आता तुझा घ्यायचा आहे
उंबऱ्यात पाऊल तरीही उगीच अडते आहे
`उगीच` नाही! आत वेदना अबोल रडते आहे !
भेटीची अन् विरहाचीही मनात खळबळ आहे
एकाकी या आयुष्याचे तेच खरे बळ आहे !
                   * * *
...हाच दिलासा! सोबत माझ्या तुझी आठवण आहे ! 
                     * * *

- प्रदीप कुलकर्णी
रचनाकाल ः २३ जुलै १९९८