राजाला लवकरच लक्षात आलं...

आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. होता मनाचे फ़ार चांगला पण थोडासा लहरी. एकदा काय झालं त्याच्या डोक्यात आलं की आपला देश जगातला सगळ्यात बलाढ्य आणि संपन्न देश म्हणवला गेला पाहिजे. पण सध्या तिजोरीत काहीच नव्हतं झालं!! त्याने फतवा काढला, यापूढे आपल्या देशाला संपन्न श्रीमंत करणं ही प्रत्येक सामान्य नागरिकाची जबाबदारी आहे. यापुढे प्रत्येकाने विविध नियम पाळणं बंधनकारक आहे.  कोणीही ३००० मुद्रांपेक्षा अधिक कमावत असल्यास त्यावरिल मिळकत सरकारी तिजोरीत जमा केली जाईल... सैन्यात प्रत्येक युवकाला किमान ५ वर्षे भरती व्हावे लागेल... इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी..

राजाला लवकरच लक्षात आलं... की सगळी प्रजा काही आपलं ऐकत नाहि आहे. काही जण कर चुकवताहेत तर काही सैन्यभरतीच्या भीतीने वय लपवताहेत, तर काही दुसर्या देशात निघून चालले आहेत. तेव्हा त्याला कळलं की आपण राजे असलो तरी प्रत्येकाच्या वैयक्तिक निर्णयक्षमतेवर वार करतोय म्हणून त्याने ही अट सगळ्या राज्यासाठी न राबवता फ़क्त सरकारी नोकरांसाठी चालू केली.

राजाला लवकरच लक्षात आलं... की सरकारी नोकरांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. कामं आणि उशीरा होत आहेत. त्यामुळे जनताही नाखूश आहे. जरी राजाची वैयक्तिक संपत्ती वाढत असली तरी, राजकोषात घट होत आहे. त्याला फ़ार वाईट वाटलं.. आपलं संपन्न देशाचं राजा होण्याचं स्वप्न तसच रहाणार असं त्याला वाटू लागलं.. आता त्याचं वय होत चाललं होतं.. आता आपली मुलं हे राज्य सांभाळतील असं त्याच्या डोक्यात आलं.. आणि त्याला अचानक जाणवलं जरी जनता / सरकारी नोकर त्याग करत असले तरी राजपरिवारतील माणसे अजून मजाच करताहेत. आपला मित्रपरिवार आपल्या जीवावर उड्या मारतो आहे. त्याने आदेश फ़िरवला, आता सरकारि नोकरांनाही कर भरण बंधनकारक नव्हतं, पण राजदरबारी आणि आप्तस्वकीय यांच्यावर करवसुली आणि प्रसंगी तूट भरून काढायची जबाबदारी येऊन पडली.

राजाला लवकरच लक्षात आलं...  की यामुळेही काही फ़ायदा होत नाही आहे. राजकीय व्यक्तीच जनतेला लुबाडत आहेत. जनता नाखूष आहे. तो फ़ार दु:खी झाला त्याला काही उपाय सुचेना

राजाला लवकरच लक्षात आलं... की आता आपण काही तासांचे सोबती आहोत. त्याने आपल्या सगळ्या परिवाराला बोलावलं... सगळे जमले. सरतर सगळ्यांच्या मनातून राजा उतरला होता, पण शेवटची इच्छा म्हणून सगळे भेटायला आले होते.. राजाने आपल्या ज्येष्ठ पुत्राला जवळ बोलावलं.. विचारलं अरे मी आपल्या राष्ट्राला संपन्न करायला खूप झटलो, सगळ्यांना बदलायचा प्रयत्न केला पण तुम्ही कोणीच मला साथ दिली नाहीत.. माझ हे स्वप्न तसंच राहणार.. मुलगा म्हणाला "रागवू नका स्पष्टच बोलतो...तुम्ही अजूनही तसेच आहात.. सगळ्यांकडून अपेक्षा केलीत पण स्वतःकाय केलंत?..!"

"अरेरे!.." राजा विचार करू लागला "आपण चुकलोच.. सगळ्या जगाला बदलायला निघालो होतो.. जर मी स्वतःच बदललो असतो, काटकसर करत असतो, देशासाठी जे जमेल ते करत राहिलो असतो.. तर माझ्यापासून प्रेरणा घेऊन मुलं, कुटुंबीयांनीही साथ दिली असती. त्यांचं पाहून राजदरबारी, आप्त-स्वकीय यांनीही देशसेवेत वाटा उचलला असता. आपापल्या नेत्याचं अनुकरण करून सरकारी कर्मचारी सरसावून कामाला लागले असते.. उत्तम सरकारी कामामुळे , जनता आनंदी राहिली असती आणि देशाला उन्नत करायच्या धेय्याने प्रेरीत होऊन झटून कार्यभार उचलला असता... खरंच मी स्वत:पासून सुरवात करायला हवी होती.. कोण जाणे.. मी कदाचित हा देश खरंच सर्वसंपन्न करू शकलो असतो..

राजाला अखेर हे लक्षात आलं पण वेळ निघून गेली होती...!!!

ही लोककथा आहे. कोणत्या भाषेतली माहित नाहि. एका अमेरिकन (लॅटिन अमेरिकन) सहकर्मचाऱ्याकडून सारांश ऐकला होता. त्यावरून केलेली ही स्वैर मांडणी आहे. मुळ कथा आणि पात्रे वेगळी असण्याची शक्यता आहे. पण आशय हाच आहे)

व्य. नि. नीट चालत नाही आहे. क्षमस्व