...देहात माझ्या !

 ...देहात माझ्या !

पौर्णिमेचे चंद्र काही उजळले देहात माझ्या !
पारिजाताचे बहर तू उधळले देहात माझ्या...!

धुंद नजरेची मिठी तू घातली माझ्या दिठीला...
केवढा आवेग आला आणि श्वासांच्या मिठीला !
चांदणे गंधाळलेले निथळले देहात माझ्या...!

उष्ण ओठांची फुले तू चुंबिली हळुवार जेव्हा
कळ सुखाच्या वेदनेची लहरली गात्रात तेव्हा
स्पर्श सारे हावरे ते वितळले देहात माझ्या...!

एक झालो एवढे की वेगळे उरले न काही...
द्वैत नाही राहिले अन् राहिले अद्वैत नाही...
तू तुझे देहत्व सारे मिसळले देहात माझ्या !

यौवनाने पौरुषाला, पौरुषाने य़ौवनाला...
दान केले आज सारे या तनाने त्या तनाला
अमृताचे कैक सागर उसळले देहात माझ्या !
 
- प्रदीप कुलकर्णी

रचनाकाल ः २७ सप्टेंबर १९९८