शूटिंग - 'अर्धसत्य'ची चित्रणकथा

श्री दा पानवलकरांच्या 'सूर्य' कथेवर विजय तेंडुलकरांनी 'अर्धसत्य'ची पटकथा बेतली. कॅमेरामन-दिग्दर्शक गोविंद निहलानींनी ती आकारास आणली. ओम पुरी, अमरीश पुरी, स्मिता पाटील, शफी इनामदार, अच्युत पोतदार, आणि सदाशिव अमरापूरकर या सर्वांनी इतर कलाकारांच्या समर्थ साथीने ती पडद्यावर जिवंत केली.

या कथेवर चित्रपट काढण्यासाठी परवानगी मागायला जेव्हा निहलानी तेंडुलकरांना मध्ये घालून पानवलकरांना भेटायला गेले, तेव्हा प्रथम पानवलकरांचा विश्वासच बसला नव्हता.

मी जरा चेष्टेच्या सुरात पण सावचित्तानं विचारलं, "सकाळीसकाळी कुणी भेटला नाही का? मीच सापडलो?"

पण "गोविंद म्हणतो ते खरं आहे" तेंडुलकर एवढंच बोलले आणि घडतेय ते खरे आहे याची पानवलकरांना जाणीव झाली.

आपल्या कथेवर अख्खा चित्रपट निघतोय या आनंदात काही काळ गेल्यावर पानवलकरांना अजून एक कल्पना सुचली. या चित्रपटाच्या संपूर्ण चित्रीकरणाला हजर राहून त्या शूटिंगची दैनंदिनी लिहून काढावी.

आज ही कल्पना नवीन उरलेली नाही, पण त्याकाळी (१९८२ साली) ही अगदीच क्रांतिकारक कल्पना होती.

इथे थोडेसे विषयांतर - पानवलकर हे एक कलंदर व्यक्तिमत्त्व. तेंडुलकरांनी त्यांना पारखून लिहिते केले. पानवलकर तेव्हा मुंबईत नवीनच आले होते. पानवलकर निवर्तल्यानंतर तेंडुलकरांनी एका लेखात (तपशील - कुठे, कधी, दुर्दैवाने आठवत नाहीत) त्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. कस्टम खात्यात तीस वर्षे नोकरी करताना त्यांनी आपल्यातला संवेदनाशील लेखक जागृत ठेवला. पण एकटेपणा, कस्टममधल्या नोकरीतले ताणतणाव यांनी ते मद्याच्या आहारी गेले आणि सत्तावन्नाव्या वर्षी हे पुस्तक प्रसिद्ध होण्याआधीच गेले.

अशी दैनंदिनी लिहिण्यास कुणी सर्वसाधारण वकुबाचा लेखक असता तरीही ती वाचनीय झाली असती. इथे तर खुद्द पानवलकरच बाह्या सरसावून उतरले आहेत. हे म्हणजे गावंढ्या गावातल्या देवळात भजनाला धुमाळी ठेका वाजवायला खुद्द झाकीर हुसेन यावेत तसे झाले!

ज्या लोकांनी चित्रीकरण कधी बघितले नाही त्यांचे ह्या पुस्तकात खूपच प्रशिक्षण होईल. प्रत्यक्ष चित्रीकरण हा फारच कंटाळवाणा प्रकार असतो. एखादी छोटीशी चूकही 'रीटेक' करायला भाग पाडते. आणि जेव्हा जागेचे, लोकांचे, यंत्रांचे पैसे वापरल्या गेलेल्या वेळेवर मोजायचे असतात तेव्हा हा 'रीटेक' प्रकार निर्मात्याचा रक्तदाब वाढवायला कारणीभूत ठरतो. त्यामुळे दिग्दर्शक हा नेहमीच 'कातावलेला/चिडलेला' आणि 'बिचारा' या दुहेरी भूमिकेत असतो.

अर्धसत्य म्हटल्यावर ज्या प्रतिमा डोळ्यांसमोर लख्ख उमटतात, त्यात दगडी नजरेने रख्ख पाहणारा 'रामा शेट्टी' ही एक चरचरीत उमटलेली प्रतिमा. ह्याचे शूटिंग करताना सदाशिव अमरापूरकरांच्या डोक्यावर चार इंचांवर फूट-फ्लडचा तापलेला प्रकाश होता, आणि शॉट संपल्यावर डोळ्यांवर गार पाण्याचा रुमाल दाबून दाबून अमरापूरकरांना परत 'नेहमीच्या' जगात यावे लागले! या आणि अशा अनेक गोष्टींची पुस्तकात लयलूट आहे.

पानवलकरांनी हे पुस्तक अगदी शिस्तीत लिहिले आहे. तारीख, स्थळ, सिनेमातील दृश्याचा क्रमांक आणि वेळ निगुतीने टिपली आहे. आणि प्रत्यक्ष वर्णनात तर त्यांची रसवंती भरभरून वाहते! त्यांचा शब्दफुलोरा प्रत्यक्ष वाचण्यासारखाच!!

काही मासले:

एका कोपऱ्यातल्या टेबलावर स्टोव्ह सतत पेटलेला. फर्रर्र. चहाचं सत्र चाललेलं सतत. कुणाचा किती चहा झाला याची नोंद चहावाल्या पोरानंच ठरवायची. असा बेखुदी मामला.  जो तो आपल्या मस्तीत. एका बाजूला गादीवर थकलेला एक जुगारी डोक्याखाली तक्क्या घेऊन बिनधास्त झोपलेला. अधूनमधून 'जीता!' च्या आरोळ्या. अड्ड्यावरची हवा धुंदीत भारावलेली. सिग्रेटच्या धुरानं करडी झालेली, नशेत तरंगलेली. हारजितीचा धारदार खंजीर सगळ्यांच्या डोक्यावर. जुगाऱ्यांना बाहेरच्या जगाची शुद्ध नसते. त्यांचं हे जग धुरकट, भाजट हवेतलं. भूमिगत.

किंवा

रणजित स्टुडिओतील उजव्या बाजूचा फुंकणीसारखा बोळ. बोळातून शिरल्यावर रामा शेट्टीच्या अड्ड्याची खालची पटांगणवजा मोकळी जागा. कॅरमच्या दोन वेगवेगळ्या बोर्डांवर सातआठ माणसं कॅरम खेळताना दिसतात. जमिनीवर फाटक्या चटईवर पत्त्याचा डाव चाललेला. सगळे खेळाडू इरसाल दिसणारे. सिग्रेटचा धूर काढत खेळ चाललेला. खेळ पाहणारे तीनचार जण. वातावरण काहीसं गूढ वाटतं. इथल्या लाकडी जिन्यानं वर गेल्यावर रामा शेट्टीचा जुगारी अड्डा आणि त्याची खास खोली असेल अशी नवख्याला कल्पना येत नाही. सगळा मामला गुप्त-गूढ. समोरच्या भिंतीवर सिनेमाच्या कागदी जाहिराती डकवलेल्या : 'गंगामैय्या तेरी...' पोस्टर फाटलेलं. 'उपकार : दिग्द. मनोज कुमार का महान चित्र'. समोर एक खोपटं. जुनं-जीर्ण.

असो. पुस्तकाचे पुनर्टंकन करायचा मोह आवरतो!

अर्धसत्य ज्यांनी बघितला आहे (आणी ज्यांना तो अजून आठवतो आहे) त्यांना हे छोटेखानी (१५५ पाने) पुस्तक संपवायला वेळ लागेल. कारण एक तर पुस्तकात संदर्भाशी घट्ट जोडलेली अप्रतिम छायाचित्रे आहेत. त्यामुळे हे पुस्तक शब्दातून उमटणाऱ्या प्रतिमा आणि प्रत्यक्ष डोळ्यांसमोर काळ्यापांढऱ्या रंगात दिसणाऱ्या प्रतिमा यांचे डोक्यात भिनणारे रसायन आहे. मला चोख एक आठवडा लागला!

'आपल्या कथेवर निघालेल्या सिनेमाची चित्रणकथा' हा कागदोपत्री विसविशीत आणि स्व-संतुष्ट वाटू शकणारा प्रकार पानवलकरांनी चिरेबंदी भक्कमपणे उभारला आहे एवढेच लिहून थांबतो.

प्रकाशक: मौज प्रकाशन

पहिली आवृत्ती: १९८५ (पुढच्या निघाल्या असल्यास कल्पना नाही)