मराठी शब्दलेखनकोश : जाणकाराचे मार्गदर्शन

अंतर्नादच्या ऑक्टोबर २००७ च्या अंकामध्ये डॉ. कल्याण काळे, पुणे ह्यांचे  'मराठी शब्दलेखनकोश : जाणकाराचे मार्गदर्शन' हे  पुस्तक परीक्षण प्रकाशित झाले आहे. प्रा. यास्मिन शेख यांच्या 'मराठी शब्दलेखनकोश' ह्या पुस्तकाचे परीक्षण त्यांनी उत्तम लिहिले आहे. लेखिकेची ओळख आणि पात्रता,  पुस्तकातील चांगल्या गोष्टी यांची नोंद करतानाच ह्या शब्दलेखनकोशातील कमतरतांविषयीही त्यांनी मुद्देसूद लिहिले आहे. ह्या परीक्षणाच्या निमित्ताने शुद्धलेखनविषयक चळवळीच्या इतिहासाचा  थोडक्यात परिचयही वाचकांना करून दिला आहे. पुस्तकातील कमतरता लिहिताना शब्दलेखनकोशामध्ये काय असावे, काय नसावे, कोणत्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करणे, स्पष्टीकरण देणे आवश्यक ठरावे  ह्याबद्दलही प्रा. काळे ह्यांनी लिहिले आहे. अंतर्नादाचे सभासद नसलेल्या मनोगतींनाही हे विचार आणि परीक्षण वाचण्यास मिळावे म्हणून अंतर्नादमधील पुस्तक-परीक्षण येथे उतरवले आहे. सदर परीक्षण येथे उतरवण्यापूर्वी दूरध्वनीने संपर्क साधून डॉ. कल्याण काळे ह्यांची परवानगी घेतली आहे. तसेच अंतर्नादचे संपादक श्री. भानू काळे यांचीही परवानगी विरोपाद्वारे घेतली आहे. शब्दलेखनकोश, शुद्धलेखन ह्याविषयी अधिक उहापोह व्हावा म्हणून सदर लेखन चर्चाप्रकारामध्ये टाकले आहे. सर्व शब्द आणि वाक्यरचना मूळ लेखानुसार आहेत.

---------------------------------------------------------------------------------

मराठी शब्दलेखनकोश : जाणकाराचे मार्गदर्शन

मराठीच्या शुद्धलेखनाची चर्चा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच सुरू झाली. इंग्रजपूर्व काळात मराठी गद्यलेखनाला परंपरेचाच काय तो आधार होता. तो सोडला तर मराठीचे गद्यलेखन स्वच्छंदानेच चालत होते. शुद्धलेखन ही संकल्पना प्रमाणभाषेशीच निगडित* असते. इंग्रजपूर्व काळात मराठीचे प्रमाणित रूपच अस्तित्वात नव्हते. त्यामुळे तिचे लेखन यदृच्छेने आणि स्वच्छंदानेच चालले होते. त्यात मोडी भाषेच्या शिथिल व्यवस्थेने तिच्या 'लेखनस्वातंत्र्या'त भरच घातली होती.

इंग्रजांच्या काळात मात्र मुद्रणकला, शिक्षणप्रसार, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, नियतकालिकांचा प्रसार, व्याकरणलेखन, कोशनिर्मिती इत्यादींच्या एकत्रित परिणामातून मराठीची लेखनपद्धती अस्तित्वात आली. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, मेजर कँडीसारखे दक्ष अधिकारी हे या लेखनपद्धतीचे आद्य शिल्पकार होते. पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकरांसारख्या पट्टीच्या लेखकांमुळे तिला स्थैर्य प्राप्त झाले. पण तिच्या अनुस्वाराधिक्य, ऱ्हस्वदीर्घांची धरसोड इ. बद्दल १८६० च्या सुमारासच असंतोष व्यक्त होऊ लागला होता. गुंजीकरांनी 'महाराष्ट्र भाषेची लेखनशुद्धी' हे पुस्तक १८६९ साली प्रसिद्ध करून प्रचलित लेखनपद्धतीत परिवर्तन करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. १९०४ साली साने, गोडबोले आणि हातवळणे यांनी परिवर्तनाचा आग्रह धरून 'मराठी शुद्धलेखन' हे आपले पुस्तक प्रसिद्ध केले होते. त्यांनी आपल्या मतांना राज्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे परंपरावादी लोक सावध झाले आणि त्यांनी संघटितपणे प्रयत्न करून परिवर्तनवादी मंडळींचा बेत हाणून पाडला. या संघर्षातून शुद्धलेखनाची चळवळ उभी राहिली.परिवर्तनवादी आणि परंपरावादी असे दोन पक्ष आमनेसामने उभे राहिले. त्यांच्यामते** वाद, चर्चा झडू लागल्या. हा वाद १९२८ पर्यंत केवळ सैद्धांतिक पातळीवरच चालू होता.

१९२८ साली न. चिं. केळकरांनी आपल्या टिळकचरित्राचा दुसरा खंड परिवर्तित लेखनपद्धतीनुसार छापून प्रसिद्ध केला, आणि परिवर्तनवादी पक्षाला प्रत्यक्ष कृतीचे पाठबळ मिळवून दिले. त्यामुळे मूळच्या वादाला अधिकच रंग चढला. अनेक लोक या वादात सहभागी झाले.त्यातले काही परंपरावादी होते, काही परिवर्तनवादी होते, तर काही तडजोडवादी होते. पण तडजोडवाद्यांतही आपापसात मतभेद होते. यातून तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई विद्यापीठ, शुद्धलेखन मंडळ, मराठी साहित्य मंडळ इ. अनेक संस्था आपापले पर्याय घेऊन पुढे आल्या. शेवटी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर त्याच्या शासनाने १९६२ साली मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या नियमांना पाठिंबा देऊन त्यावर आपले शिक्कामोर्तब केले. हे एकूण चौदा नियम होते. पुढे १९७२ मध्ये शासनाने त्यात आणखी चार नियमांची भर घालून त्यांची संख्या अठरा केली. सध्या हेच नियम प्रचलित आहेत. पण अनेक विद्वानांचे या नियमांनी समाधान झालेले नाही. आजही त्यांच्यामध्ये परंपरावादी, परिवर्तनवादी, तडजोडवादी असे पक्ष आहेतच.

पण गेल्या तीस चाळीस वर्षांत मराठी भाषेच्या लेखनाच्या संदर्भात वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. आतापर्यंतचे मराठीतले लेखन कोणत्या ना कोणत्यातरी मतप्रणालीनुसारच होत होते. केसरी, महाराष्ट्र टाइम्स इ. वर्तमानपत्रांचा शुद्धलेखनावर अधिक कटाक्ष असायचा. सर्व लेखन अप्रदूषित आणि शुद्धच असायचे. पण सध्या मात्र ती परिस्थिती राहिली नाही. लेखनाची केवळ उच्चभ्रूंची मिराशी आता संपली. बहुजनसमाजातील फार मोठा वर्ग उच्चविद्याविभूषित झाला, प्रसंगपरत्वे लिहू लागला. पण पूर्वपरंपरा नाही, संस्कृतचे ज्ञान नाही, पायाभूत शिक्षणात शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष झालेले, लिहिण्याच्या वेळेला अडेल तेथे मार्गदर्शन करायला कोणी नाही, अशा परिस्थितीत गरजेपोटी लेखन करत असताना खूपच चुका होऊ लागल्या. झालेल्या चुकांबद्दल खंत वाटेनाशी झाली. रस्त्यातील दुकानांच्या पाट्या, जाहिरातींचे फलक, दूरदर्शन, मुद्रणालये, पाठ्यपुस्तके, वर्तमानपत्रे इ. सर्व क्षेत्रातील लेखन प्रदूषित होऊ लागले. याला जबाबदार असलेल्या लोकांना प्रशिक्षित करण्याची तीव्रतेने गरज भासू लागली. त्यांना उपयोगी पडतील अशा मार्गदर्शक पुस्तकांची आवश्यकता भासू लागली. त्यासाठी शुद्ध लिहिलेल्या शब्दांचे कोश तयार होऊ लागले. मो.रा. वाळंबे, अर्जुनवाडकर, स्नेहलता तावरे, डॉ. द. न. गोखले, अरुण फडके इ. अनेकांनी शुद्ध शब्दांच्या याद्या तयार केल्या. अशा याद्या यापुढेही तयार होत राहतील. याच मालिकेतील प्रा. यास्मिन शेख यांचे 'मराठी शब्दलेखनकोश' हे पुस्तक आहे.

प्रा. यास्मिन शेख या मराठीच्या एक यशस्वी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. व्याकरण आणि भाषाशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांनी 'बालभारती'च्या संशोधन विभागाचे 'मराठीचे कार्यात्मक व्याकरण' सहकार्याने लिहिले आहे. 'मराठी लेखन मार्गदर्शिका' हे त्यांचे पुस्तक राज्य मराठी विकास संस्थेतर्फे प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी मराठी विषय घेऊन आय्. ए. एस्.ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा वर्षे मार्गदर्शन केले आहे. 'अंतर्नाद' सारख्या दर्जेदार मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून गेली अनेक वर्षे त्या काम पाहत आहेत. तेव्हा एका जाणकार व्यक्तीने हा कोश तयार केला आहे, हे लक्षात येते.

त्यांनी या कोशात जवळ जवळ अठरा हजार शब्दांचा समावेश केला आहे. त्यासाठी त्यांनी शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील मराठी लेखनात येणारे शब्द घेण्याचे धोरण ठेवले आहे. त्याशिवाय मराठी दैनिके, साप्ताहिके, मासिके, ललितवाङ्मय, वैचारिक लेखन आणि मराठी प्रमाण भाषेत वारंवार वापरात येणारे शब्दही त्यांनी घेतले आहेत. याशिवाय राज्य मराठी विकास संस्थेच्या 'शालेय मराठी कोशा'तलेही अनेक शब्द त्यांनी यात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे त्यांचा हा संग्रह सर्वसमावेशक झाला आहे, असे म्हणता येईल.

या कोशाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यातील विकारी शब्दांचे सर्व विकार त्यांनी या कोशात नोंदवलेले आहेत. सर्वसाधारणपणे प्रचलित असलेल्या मराठीच्या शब्दकोशांत या शब्दविकारांकडे दुर्लक्ष केलेले आढळते. याला अपवाद फक्त डॉ. द. ह. अग्निहोत्रींच्या पंचखंडात्मक कोशाचा आहे. कोशातील शब्दांचे हे विकार मराठी लेखनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. शुद्धलेखनातील अनेक चुका या विकारलेखनातच होताना दिसतात. प्रा. यास्मिन शेख यांनी त्या विकारांकडे लक्ष वेधले हे महत्त्वाचे आहे.

कोशकार्यात शब्दांची वर्णानुक्रमाने नोंद करावयाची असते. मराठीत सध्या या संदर्भात बराच गोंधळ आहे. प्रत्येक कोशकाराने आपल्या मनाला येईल तो क्रम स्वीकारला आहे. निरनिराळ्या कोशकारांच्या कोशात याबाबतीत एकवाक्यता दिसून येत नाही. प्रा. यास्मिन शेख यांनी स्थूलमानाने डॉ. अशोक केळकर पुरस्कृत पद्धती स्वीकारलेली असली तरी प्रास्ताविकात पृ. १० व ११ वर त्यांनी या संदर्भात जी माहिती दिलेली आहे ती बरीच शिथिल स्वरूपाची वाटते. स्वरातील ऍ, ऑ यांचा क्रम त्यांनी दिलेला नाही. किंबहुना त्यांचा समावेशही वर्णमालेत केलेला नाही. पण प्रत्यक्ष कोशात मात्र बँक, डॉक्टर यांसारखे शब्द त्यांनी अपेक्षित जागी दिलेले आहेत. त्यांनी अनुस्वारांच्या बाबतीत जसा विचार केलेला आहे, तसा विसर्गाचा विचार केलेला नाही. पण प्रत्यक्षात मात्र विसर्गयुक्त दु:ख, दु:शासन हे शब्द कोशात दिले आहेत. तेव्हा वर्णमालेत विसर्गाचा समावेश आवश्यक होता.

शब्दकोशांच्या मुद्रणात खूप काळजी घ्यावी लागते. कोशात मुद्रणदोष असू नयेत, कोशाला शुद्धिपत्र जोडलेले असू नये. सुदैवाने हा शब्दकोश खूपच शुद्ध स्वरूपात छापला आहे. मला एकच शब्द चुकीचा छापलेला आढळला. उदा. 'दध्योदन' हा शब्द 'दध्योधन' असा छापला आहे. हा मुद्रणदोष आहे, हे त्या शब्दातील इतर नोंदी पाहता चटकन लक्षात येते. पण या कोशातील काही शब्दांच्या लेखनाबद्दल शंका उपस्थित होतात.

१. 'कार्यकर्ती' असे रूप हा कोश देतो. मूळ तत्सम रूप कार्यकर्त्री असे हवे. अभिनेत्री हे रूप मूळ तत्समाला धरून आहे. या प्रकारच्या रूपांमध्ये बरीच धरसोड आहे. उदा. 'निर्माता', 'वक्ता', 'व्याख्याता' यांची स्त्रीलिंगी रूपे दिलेलीच नाहीत. 'द्रष्टा', 'नियंता' यांचीही स्त्रीलिंगी रूपे दिली नाहीत. या रूपांबद्दल संशय निर्माण झाल्यास कोणता कोश पाहावा? शुद्धलेखन कोशाने याबाबतीत मार्गदर्शन करायला नको का? निदान त्याने आपली भूमिका तरी स्पष्ट केली पाहिजे. 'नर्तक' शब्दाचे स्त्रीलिंगी रूप 'नर्तकी' असे कोशात दिले आहे ते बरोबर आहे. पण हल्ली 'नर्तिका' असेही लोक लिहिताना दिसतात. या दोन्ही शब्दांत थोडासा अर्थभेदही करतात असे दिसते. तेव्हा शुद्धलेखनकोशाने मार्गदर्शन करायला हवे. तेथे मौनाने काम साधणार नाही.

२. या कोशात जिव्हा, आल्हाद, आव्हान, आन्हिक अशा प्रकारची लेखनरूपे आढळतात. पण ब्राह्मण, ब्रह्म अशीही रूपे या कोशात दिसतात. या शब्दांच्या बाबतीत कोशकर्त्रीची नेमकी भूमिका काय आहे?

३. या कोशामध्ये 'साहाय्यक' असा एक शब्द येतो.'सहायक' असाही शब्द आढळतो. माझ्यामते 'सहायक' हा शब्द नियमांनी सिद्ध होत नाही. 'सहाय' याच शब्दाचा अर्थ 'मदत करणारा' असा असताना 'सहायक' अशी सिद्धी अनावश्यक होती. या शब्दांच्या बाबतीत कोशकर्त्रीचे मत काय आहे?

४. विभाग दोनमध्ये एक ते एकशेपाच पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहून दाखवल्या आहेत. त्यामध्ये ७९ (एकुणाऐंशी), ८२(ब्यायंशी), ८१ (एक्यांशी) असे भिन्न भिन्न स्वरूपाचे लेखन आढळते. त्यामध्ये धरसोड आढळते. खरे तर ७९ (एकूणऐंशी), ८१ (एक्याऐंशी), ८२ (ब्याऐंशी), ८३ (त्र्याऐंशी) असे लेखन सुसंगत झाले असते. कोशात जी भिन्न भिन्न रूपे दिली आहेत ती सदोष आहेत. ब्यायंशी, त्र्यायंशी असे लेखन चुकीचे वाटते. त्यापेक्षा वर सुचविल्याप्रमाणे ब्याऐंशी, त्र्याऐंशी अशा प्रकारच्या लेखनात त्या त्या शब्दांचे दोन्ही घटक स्वतंत्रपणे दाखविता येतात. संदिग्धता राहत नाही. इतर बरेच कोशकार याच पद्धतीचे लेखन करतात.

पृ. ४१४ वरील क्रमवाचकांना लागणाऱ्या वा प्रत्ययाबद्दलची माहितीही अपूर्ण वाटते. ५ च्या पुढे सर्व शब्दांना वा प्रत्यय लागतो, असे कोश सांगतो. सात, आठ ह्या शब्दांपुरता तो बरोबर आहे.पण नऊ+वा येथे ऊ ला व असा आदेश होऊन तो लागतो. सहा, अकरा, बारा इ. आकारान्त शब्दांना तो प्रत्यय तसाच लागतो हे खरे असले, तरी पुढे सर्व व्यंजनान्त संख्यावाचकांना तो लागताना मधे** 'आ' असा प्रत्यय येतो. आणि ऐंशी, एकूणऐंशी इ. ईकारान्तांपुढे मात्र तो केवळ वा असाच प्रत्यय लागतो. या सर्व प्रकारांचा बारकाईने विचार करून नियम देण्याची गरज होती.

५. माझ्यामते विठ्ठल, मठ्ठ इ. शब्दांचे खरे उच्चारण विट्ठल असे होते. लागोपाठ होणारे महाप्राण उच्चारता येत नाहीत. स्वादिष्ट या शब्दाचे मूळ रूप स्वादिष्ठ असे होते. मराठी, हिंदी ह्या भाषांमध्ये ते स्वादिष्ट या स्वरूपात आलेले दिसते. मध्यंतर, मध्यंतरी या शब्दांचे लेखन खरे मध्यांतर, मध्यांतरी असे असायला पाहिजे. या शब्दांमध्ये कोशकर्त्रीने रूढीने आलेली परंपरागत रूपे स्वीकारली आहेत. पण कोट्याधीश या परंपरेने आलेल्या शब्दाऐवजी कोट्यधीश हा संधिनियमाने सिद्ध झालेला शब्द निवडला आहे. या निवडीच्या संदर्भात परंपराप्राप्त कोणते शब्द घ्यायचे, कोणते टाळायचे यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे सांगण्याची गरज आहे. पण बहुतेक सर्वच कोशकार यदृच्छेनेच ही निवड करतात.

६. या कोशात १८००० शब्दांचा संग्रह दिला आहे. तो तेवढाच का, आणखी जास्त वाढवणे शक्य असते का याला उत्तर कोणाकडे नसते. ज्या कोशकाराला शक्य आहेत तेवढे शब्द त्याने द्यावेत असे एकंदरीत धोरण दिसते. माझ्यामते अशा मार्गदर्शक कोशातील शब्दांची निवड करताना ज्या शब्दांसाठी मार्गदर्शनाची खरोखरच गरज आहे, अशांचीच निवड करणे योग्य ठरले असते. कोश आणि व्याकरण यांच्या सीमारेषा निश्चित आहेत. ज्या गोष्टी नियमांनी सिद्ध करता येतात, त्यांचा विचार व्याकरणात होतो. ज्या गोष्टी नियमांनी सांगता येत नाहीत, त्यांचा समावेश कोशात होतो. हे तत्त्व जर स्वीकारले तर ज्या शब्दांच्या लेखनात काहीही चूक होण्याचा संभव नाही, त्यांचे विकारही नियमांनी सिद्ध होणारे आहेत अशा शब्दांचा समावेश कोशात करण्याची गरज नव्हती. पण ज्या शब्दांच्या लेखनात खरोखरच अडचणी आहेत अशा शब्दांची निवड कोशात आवर्जून केली पाहिजे. या कोशात अनावश्यक अशा अनेक शब्दांच्या नोंदी झालेल्या आहेत. उदा. नट, दत्तक (वि.), दगड, छंद, जडता इ. अनावश्यक म्हणण्याचा अर्थ एवढाच, की या शब्दांच्या लेखनात सहसा कोणी चुका करणार नाही.

प्रा. यास्मिन शेख यांचा हा कोश जाणकारीने तयार केला आहे. त्यामागे त्यांची विषयावरची पकड आणि प्रेम यांचे प्रत्यंतर जागोजागी येते. माझे परीक्षण म्हणजे त्यांच्या कोशाच्या निमित्ताने झालेले मुक्तचिंतन आहे. शुद्धलेखनाची सध्याची समस्याच इतकी कठीण होऊन बसली आहे, की अनेक दिशांनी तिच्या निरसनार्थ प्रयत्न झाले, तरच परिस्थिती सुधारण्याची थोडीफार आशा आहे.

(मराठी शब्दलेखनकोश, प्रा. यास्मिन शेख, मनोविकास प्रकाशन, पृष्ठे ४५६, किंमत ३०० रुपये)

प्रा. डॉ. कल्याण काळे
ए-५, प्रज्ञागड, नवश्या मारुती गल्ली,
वीटभट्टी, सिंहगड रस्ता, पुणे ४११०३०
दूरध्वनी : (०२०) २४२५३१३६
भ्रमणध्वनी : ९४२०२०२५८४

* ह्या शब्दांचे टंकन अंतर्नादच्या मूळ प्रतीनुसार केले आहे.
** 'यांच्यामते' हा मुद्रणदोष असावा. तेथे 'यांच्यामध्ये' असले पाहिजे, मात्र मूळ लेखनानुसार टंकन केले आहे. 'मधे' हाही मुद्रणदोष असावा, लेखामध्ये इतरत्र 'मध्ये' असाच शब्द आला आहे.

------------------------------------------------------------------------------

'अंतर्नाद' चे सभासदत्व घेण्याच्या दृष्टीने चौकशी करण्यासाठी संपर्क -
श्री. भानू काळे
सी-२, गार्डन इस्टेट, वायरलेस कॉलनीजवळ
औंध, पुणे ४११००७
दूरध्वनी : (०२०) ६५२२७२३३ (सोमवार ते शुक्रवार, साडेबारा ते साडेचार)
ई-मेल : bhanukale@vsnl.com