स्वप्नात रंग माझ्या कोणी भरून जाते.....

स्वप्नात रंग माझ्या कोणी भरून जाते
निद्रिस्त स्पंदनांना जागे करून जाते

आहे सदैव केला मी राग राग ज्याचा
ते दुःख का अताशा मज सावरून जाते

नाचे वसंत देही चाहूल ऐकता ती
येताच हाक कानी जग मोहरून जाते

एका क्षणास पटते ती खूण अंतरीची
एका क्षणात प्राक्तन सारे ठरून जाते

 खोटारडेपणाने होतात डाव सारे,
फासे असून हाती मी का हरून जाते

--अदिती
(१० ऑक्टोबर २००७
भाद्रपद वद्य १४ शके १९२९ )
गज़लेचा (अजून एक फसलेला ) प्रयत्न...