मीलनगंध

वेगळेपण विरघळाया लागले
उमलुनी मी परिमळाया लागले

भासला तो चंदनाचे रान; मी
नागिणीसम सळसळाया लागले

गाजवाया लागता अधिकार तो
सर्व संयम डळमळाया लागले

व्यक्त मी आलिंगनी झाले अशी
प्रेम त्यालाही कळाया लागले

पेटली संसारहोत्राची धुनी
होउनी समिधा जळाया लागले

लाजण्या-रुसण्यात सरली रात्र अन्
तांबडे फुटुनी छळाया लागले

नयन ना विरहात जे पाणावले
मीलनी का भळभळाया लागले ?

नाहता ज्योत्स्नेत काया मृण्मयी
अंबरी तारे चळाया लागले