शृंगार

संपत आला प्रवास माझा, नावाड्या ने पार मला
खूप उन्हाची वाट चालले, दे माझा अंधार मला
फुकट आणिसी, मोफत नेसी, दाम मागसी जगण्याचे
खिसे रिकमे करून जायचा कळला ना व्यवहार मला
पार्थिवतेचे तोडून बंधन उत्कटतेने मिठीत घे
जिवाशिवाची भेट घडू दे, देह जाहला भार मला
मनोमनी मी तुलाच वरले, नेई कृतान्ता हरुन मला
जगण्याशी हा संग रोजचा भासतसे व्यभिचार मला
हरेक जन्मी एकदाच का होते अपुली भेट सख्या ?
याही जन्मी आसुसले मी, ये मृत्यो, स्वीकार मला
किती मृण्मयीने सजवावे मातीला ह्या तुजसाठी ?
दोन घडी तुज रिझवायाला किती जन्म शृंगार मला ?