बँक, खाजगी माहिती व आपण

प्रसंग १: वेळ रात्री ८ च्या सुमारास.
स्थळ: मी रिक्शातून रेल्वे स्टेशन वरून घरी येतोय.
मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज.
गृ: नमस्कार. देवदत्त का?
मी: हो.
गॄ: मी xxxx बँकेतून बोलतोय.
(फोन नं चेन्नईचा होता म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)
आपले जे हे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे स्टेटमेंट वेळेवर येते का?
मी: मागील स्टेटमेंट आले. ह्यावेळचे माहित नाही.
गॄ: ठिक आहे. बँकेने आता तक्रार निवारणाकरता फोनवर नवीन सुविधा चालू केली आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.
मी: धन्यवाद.
गॄ: तुमचा पत्ता पडताळून पाहायचाय. तुम्ही सांगू शकता का?
मी: नाही. मी अशा गोष्टी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो.......
गॄ: तुम्हाला माझा विश्वास नाही आहे वाटते. मी XXXX च्या मुख्य कार्यालयातून बोलत आहे.
मी: आता नाही आहे. तुम्ही मला रात्री ८ ८:१५ ला फोन करताय. पुन्हा तुम्ही माझी माहिती विचारताय. जी मी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो आणि मी फोन केल्यावरच.
(माझ्याकडून थोडेफार रागाचे आणि मग निर्वाणीचे बोलून संभाषण बंद)

प्रसंग २: वेळ सकाळी ११ च्या सुमारास.
स्थळ: कार्यालयात मी काम करण्याच्या प्रयत्नात ;)
मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज..

गृ: नमस्कार. देवदत्त का?
मी: हो.
गॄ: मी xxxx बॆंकेतून बोलतोय. तुमचे हे XXXX कार्ड आहे. त्याबाबत बोलायचे आहे. (माझ्याकडे ते कार्ड आहे म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)
मी: मग?
गॄ: बँकेने तुमच्याकरीता नवीन क्रेडिट कार्ड मान्य केले आहे.
मी: मला गरज नाही आहे.
गॄ: अहो, तुम्हाला काही कागदपत्रे द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त स्वत:ची माहिती द्या . जन्मतारीख, पॅन नंबर, पत्ता वगैरे. तुम्हाला २२ दिवसांत क्रेडिट कार्ड मिळून जाईल.
मी: मी ती माहिती देणार नाही. तुम्हाला पाहिजे तर मला ईमेल पाठवा. मी विचार करून त्याला उत्तर देईन.
गॄ: बहुधा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. तुम्ही माझे नाव व फोन नंबर घेऊन बँकेतून खात्री करू शकता.
मी: ती खात्री करायला मी केव्हाही करू शकतो. तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आलाच आहे. पण मी तुम्हाला माहिती देऊ इच्छित नाही.मी अशा गोष्टी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो. आणि मी फोन केल्यावरच. तुम्हाला पाहिजे तर मला इमेल पाठवू शकता.
(माझ्याकडून निर्वाणीचे बोलून संभाषण बंद)

मी त्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करून ह्याबाबत माहिती दिली.
मला उत्तर मिळाले की तुम्हाला क्रेडिट कार्ड मान्य झाले आहे का ह्याबाबत आमच्यकडे माहिती नाही.
बाकी खाजगी माहिती विचारण्याबद्दल सांगण्यात आले की काही एजंट ही माहिती मागू शकतात.

असेच भरपूर संवाद झाले आहेत. मी कोणालाही स्वत:ची माहिती देत नाही. ग्राहक सेवा केंद्राला फोन लावल्यानंतर ही माहिती काही वेळा द्यावी लागते (फोनमध्ये, कोणाही माणसाला नाही). उदा. कार्ड क्रमांक, PIN क्रमांक.पण पुढेही काही वेळा सारखी सारखी माहिती मागितल्यास त्यांच्यावरही डाफरलो आहे.

माझे सदस्यांना असे विचारणे आहे की
मी योग्य केले का?
तुम्हाला जेव्हा असे फोन येतात तेव्हा तुम्ही काय करता?
बँक जर वेळोवेळी सांगते की तुमची माहिती अनोळखी इमेल किंवा फोनवर देऊ नका तर ग्राहक सेवा केंद्रातील त्या मुलीचे म्हणणे, की काही एजंट ही माहिती मागू शकतात, बरोबर मानावे का?