मराठी चित्रपटाची तंत्रातही हॉलिवूडशी बरोबरी

आजच्या ईसकाळात ही माहितीवजा बातमी वाचायला मिळाली. मराठी चित्रपटांचे काहीतरी चांगले होत आहे हे वाचून बरे वाटले. सदस्यांना ह्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी म्हणून ती येथे उतरवून ठेवीत आहेः

ईसकाळातली मूळ बातमी : मराठी चित्रपटाची तंत्रातही हॉलिवूडशी बरोबरी

सुनीत भावे - सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ - "पॅनोरमा'त यशाची मोहोर उमटविणारा मराठी चित्रपट तंत्राच्या बाबतीतही आता हिंदीच नव्हे, तर हॉलिवूडपटांशी बरोबरी करणार आहे. "वासुदेव बळवंत फडके' या रमेश देव प्रॉडक्‍शन निर्मित मराठी चित्रपटात "डिजिटल इंटरमीजिएट' (डीआय) हे तंत्रज्ञान प्रथमच वापरले जाणार आहे. .......
या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, सध्या "पोस्ट-प्रॉडक्‍शन'चे काम सुरू आहे. त्यासाठीच हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असल्याची माहिती रमेश देव आणि चित्रपटात वासुदेव बळवंत फडके यांची मुख्य भूमिका करणारे अभिनेते अजिंक्‍य देव यांनी आज "सकाळ'ला दिली.

""चित्रपटाच्या "प्रिंट'च्या दर्जात कोणतीही कसर राहू नये आणि त्याची गुणवत्ता सर्वोत्तम दर्जाची असावी, यासाठी हे "डीआय' हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. डिसेंबरअखेरीस हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे,'' असे रमेश देव यांनी सांगितले.

या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देताना अजिंक्‍य देव म्हणाले, ""या तंत्रज्ञानाअंतर्गत चित्रपटाची "डिजिटल निगेटिव्ह' बनविली जाते. त्याद्वारे चित्रपटाच्या विविध दृश्‍यांमध्ये दिसणारा "लूक' बदलता येणे शक्‍य झाले आहे. यात अगदी चित्रचौकटीचे रंग बदलण्यापासून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र भासवणे असे बदलही सहज करता येऊ शकतात. पार्श्‍वभूमीवरील आकाशाचा रंग मनाप्रमाणे बदलून घेणेही शक्‍य होणार आहे.''

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या "थ्री हंड्रेड' या चित्रपटात "डीआय' तंत्रज्ञानाचा वापर झाला होता. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये या प्रकारचे अद्ययावत तंत्र वापरले जाते. मात्र, त्यासाठी खर्च खूप येत असल्याने हिंदी चित्रसृष्टीतही त्याचा अभावानेच वापर होताना दिसतो. "वासुदेव बळवंत फडके' चित्रपटाची निर्मितीच भव्य प्रमाणात करण्यात येत असल्याने त्याच्या लूकबाबतही आम्ही आग्रही होतो. म्हणूनच, १२ लाख रुपये खर्च करून हे तंत्रज्ञान मराठीत प्रथमच आणले आहे, असेही अजिंक्‍य देव यांनी नमूद केले.


थ्री हंड्रेड हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का?

हे डीआय तंत्रज्ञान काय असते त्याची तुम्हाला कल्पना आहे का? ती तुम्ही आम्हाला सांगू शकाल का?

डीआय तंत्रज्ञान वापरले त्यामुळे हॉलीवुडशी बरोबरी झाली हे विधान तुम्हाला पटते का?

तंत्रातही म्हणजे काय? मराठी चित्रपटांनी आजवर ह्याशिवाय इतर प्रकारे हॉलीवुडशी बरोबरी केलेली आहे काय?

चित्रपट चांगला आहे की नाही हे ठरवण्यासाठी तो हॉलीवूडच्या बरोबरीचा आहे की नाही हे पाहणे कितपत योग्य / अयोग्य आहे ?

वासुदेव बळवंत फडके ह्या चित्रपटाची, त्याच्या कथेची, त्यातल्या इतर पात्रयोजनेची तुम्हाला माहिती आहे काय?