गीतासार: एका श्लोकात एक अध्याय (१०,११,१२)

क्षमस्व! दीपावलीनिमित्त जरा सुट्टी घेतली होती.

मध्यंतरी आपलेच एक मनोगती श्री. चिंतामणी जोग यांच्याकडून अधिक शुद्द प्रत (वृत्तांसहीत )  मिळाली आहे, त्याचाच आता वापर करीन.

अध्याय १० (स्त्रग्धरा)

कोठे देवासी चिंतू,जरी म्हणसी असे,ऐक माझ्या विभूती/संक्षेपे अर्जुना हे तुज गुज कथितो मी असे सर्वभूती//

मी धाता,विष्णू मी,श्री,शिव,रवि, निगमीं साम,मी विश्वरूप/माझी सर्वत्र सत्ता,जगिं असुनी, असे दिव्य माझे स्वरुप//१०//

अध्याय ११ (चामर)

पार्थ विनवी माधवासि, "विश्वरुप भेटवा"/ म्हणुनिया हरी धरी विकटरुप तेंधवा//

मांडीला अनर्थ थोर पंडुकुमर घाबरे/म्हणे पुनश्च दाखवा, विभो,स्वरुप गोजिरे//११//

अध्याय १२ (पृथ्वि)

बरी सगुणभक्ती की भजन निर्गुणाचे बरे/पुसे विजय हे तदा,हरी वदे तया आदरें//

असोत बहू योग हे, तरिही भक्तियोगाहुनी/नसेच दुसरा असा,सुलभ जो श्रमावाचुनी//१२//

श्री. चिंतामणी जोग यांच्या संदर्भानुसार, याचे कर्ते श्री. दि. अ. घैसास हे आहेत. यांच्याविषयी अधिक माहीती असल्यास कळवावी.

मागील अध्यायांची वृत्तेः-

१- शार्दूल विक्रीडीत

२- शा.वि.

३‌‌. शिखरिणी

४- शिखरिणी

५-शिखरिणी

६-शा.वि.

७-शा.वि.

८-शिखरिणी

९- शा.वि.