कहाणी आभारप्रदर्शनाची

अमेरिकेत सर्वप्रथम जे 'यात्रेकरू' आले ते सगळे इंग्लंडमधल्या इंग्लिश सेपरेटिस्ट चर्चचे (प्युरिटन पंथ) सदस्य होते. ते आधी इंग्लंडात राहत होते आणि धार्मिक छळापासून सुटका होण्यासाठी हॉलंडला पळून गेलेले होते. तेथे धार्मिक सहिष्णुता जास्त जाणवत होती. पण त्यांना डच जीवनपद्धती अपवित्र वाटायला लागली, त्यामुळे अधिक चांगल्या जीवनासाठी लंडनच्या एका समभाग संस्थेशी वाटाघाटी करून त्यांनी अमेरिकेच्या यात्रेसाठी अर्थसाहाय्य मिळवले. जहाजावरचे बहुसंख्यजण हे धार्मिक फुटीरतेशी संबंधित नसून संस्थेच्या स्वारस्यांचे भले पाहण्यासाठी होते. आद्यवसितांपैकी सुमारे एक तृतियांश लोक धार्मिक फुटीर होते.

प्लिमथ खडकावर यात्रेकरूंनी ११ डिसेंबर १६२० रोजी पाय ठेवला. पहिला हिवाळा विनाशक निघाला. पुढच्या पानगळीच्या सुरवातीपर्यंत सुरवातीच्या १०२ यात्रेकरूंपैकी ४६ जण मरण पावलेले होते. मात्र त्यानंतर येणाऱ्या हंगामात पीक चांगले आले. राहिलेल्या वसितांनी ते साजरे करायचे ठरवले. पहिल्या वर्षात जीव वाचवायला त्यांना ९१ अमेरिकेच्या आदिवाशांनी मदत केलेली होती. त्यांनाही त्यात सहभागी करून घेण्याचे ठरले. त्यांच्या मदतीविना यात्रेकरूंना अमेरिकेत जिवंत राहणे शक्य झाले नसते, असे मानतात. हल्लीच्या आभारप्रदर्शनाच्या जेवणापेक्षा जास्त करून इंग्रजी सुगीच्या जेवणासारखे झाले. मेजवानी ३ दिवस चालली.

गव्हर्नर विल्यम ब्रॅडफोर्डने जंगली बदके आणि पक्षी शिकार करून आणायला चारजण पाठवले होते!

त्यानंतर १६७६ पर्यंत असा काहीही उत्सव समारंभ झाला नाही. २० जून १६७६ रोजी चार्ल्सटाऊन (मॅस) आदिवासी अमेरिकनांवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी असा आभारप्रदर्शनाच समारंभ करण्यात आला.

त्यानंतर जवळ जवळ शंभर वर्षांनी ऑक्टोबर १७७७ मध्ये १३ वसाहतींनी एकत्र येऊन ब्रिटिशांवरचा आपला विजय आभारप्रदर्शनाच्या सोहळ्याने साजरा केला, पण तो एकदाच.

राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनने १७८९ मध्ये आभारप्रदर्शन हा राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. वसाहतीवसाहतीमध्ये ह्यावर मतैक्य नव्हते. राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसनने ह्या समारंभाच्या कल्पनेला विरोध केला.

बॉस्टन लेडीज मॅगझिन आणि नंतर गॉडेज लेडी बुक मध्ये सारा जोसेफा हेल ह्या संपादिकेने सतत ४० वर्षे संपादकीये आणि राज्यपाल आणि राष्ट्राध्यक्षांना पत्रे लिहिण्याचा सपाटा लावला. शेवटी त्याला यश येऊन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने नोव्हेंबरचा शेवटचा गुरुवार हा आभारप्रदर्शनाचा राष्ट्रीय दिवस म्हणून मान्य केला.

मध्येच राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्टने शेवटून दुसऱ्या गुरुवार पासून एक आठवड्याचा नाताळ खरेदीचा काळ जाहीर केला. ह्यावर जनतेत नापसंती निर्माण झाल्याने दोन वर्षांनी तो पुन्हा पूर्ववत करण्यात आला.

सरतेशेवटी १९४१ मध्ये अमेरिकन संसदेने नोव्हेंबरचा चौथा गुरुवार हा कायदेशीररीत्या आभारप्रदर्शनाचा सुट्टीचा दिवस म्हणून मान्य केला.

अशी ही आभारप्रदर्शनाच्या दिवसाची साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण!


हे सर्व मी http://wilstar.com/holidays/thankstr.htm ह्या पानावरच्या माहितीचे त्रोटक स्वैर रूपांतर केलेले आहे. चित्रही तिथूनच चिकटवलेले आहे.

विनंती. ऐतिहासिक तपशील, नावांचे लेखन, उच्चार काही शब्दांची भाषांतरे ह्याबद्दल कृपया चूक भूल द्यावी घ्यावी.