पांढरपेशी कविता

पांढरपेशी कविता

क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या
फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या

मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास
खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास

गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या
मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या

गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली
दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली

चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी
फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी

शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा
कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा

जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही
आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही!

दर्प सांगती अभिमानाने उच्छ्वासांच्या जाती
श्वासांशी मेकडे जोडती स्वच्छ सुसंस्कृत नाती

करपट ढेकर येता - येतो चार शिव्यांचा खलिता
नको! नको ही त्यात आणखी पांढरपेशी कविता!

-नीलहंस