ऐस फक्त आसपास...!

.................................................

ऐस फक्त आसपास...!

.................................................

भोवतालच्या हवेत जाणवे तुझा सुवास...!
तू मला दिसू नकोस, ऐस फक्त आसपास...!

भेट तू पुन्हा पुन्हा अशीच चांदण्यामधून...
गा अशीच सावकाश मंद मंद मंद धून...
त्या सुरांमधून सोड तू तुझा हळूच श्वास !

बावरून पाहतो कधी हळूच चाचपून...
काळजात ठेवल्यात ज्या तुझ्या खुणा जपून...
ठेवतो पुन्हा पुन्हा मी तुझा जपून भास...!

मी करायचा असा खुळेपणा किती अजून ?
एकदाच ये नटून ! एकदाच ये सजून !
दे मला जगायची जिवंत-जातिवंत आस...!

वाटते कधी, उगीच जन्म काढला खिळून...
लाभले अखेर काय...? सर्व सर्वही मिळून...
ही कशी प्रसन्नता ? सदैव ठेवते उदास !

- प्रदीप कुलकर्णी

.................................................

(रचनाकाल ः ९ जुलै १९९८)

.................................................