आज दि. १४ डिसेंबरला रात्री उल्कावर्षाव

आज दि. १४-१५ डिसेंबरला रात्री उल्कावर्षाव

मिथुन राशीतील जेमिनिड्स उल्कावर्षाव

आज शुक्रवार दि. १४ डिसेंबर रोजी रात्री १०:१५ व त्यानंतर पूर्ण रात्र मिथुन राशीतून होणारा सुप्रसिद्ध असा जेमिनिड्स उल्कावर्षाव पाहण्याची चांगली संधी लाभणार आहे. चंद्र लवकर मावळ्णार असल्याने काळोखी रात्र उल्कावर्षाव पाहण्यास अनुकूल असेल. तसेच सर्वाधिक वर्षावाची वेळ मध्य आशिया क्षेत्रासाठी व भारतासाठी योग्य अशी आहे. रात्री १०:१५ ही सर्वाधिक उल्कावर्षावाची वेळ आहे. पण तेव्हा मिथुनरास पुरेशी वर आलेली नसेल. तरी त्यानंतरही खूप उल्का बघायला मिळतील.

हा उल्कावर्षाव वर्षातील सर्वोत्तम आणि विश्वसनीय उल्कावर्षावांपैकी एक मानला जातो.(अपवाद : सिंह राशीतून दर ३३ वर्षांनी होणारा लिओनिड्स हा महाउल्कावर्षाव: २००१ साली भारतातून दिसला होता)

मिथुन राशीतून होणाऱ्या या उल्कापातामध्ये बऱ्याच तेजस्वी उल्का आणि क्वचित अग्निगोल (फायरबॉल) दिसू शकतात.

कुठे दिसेल?

मिथुन रास रात्री १०:१५ च्या सुमारास पूर्वक्षितीजावर ४५ अंशापर्यंत वर आलेली असेल. पूर्वदिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास किंचीत उत्तरेकडे पाहिल्यावर तेजस्वी लालसर मंगळ ग्रह सहज दिसेल. सध्या मंगळ मिथुन राशीतच आहे. त्या आणि आसपासच्या भागातून उल्का पडताना दिसतील. दर तासाला १५ अंश याप्रमाणे मिथुन रास वर येत जाईल आणि पहाटे सुमारे २:०० च्या सुमारास ख-मध्यावर येईल. उल्का निरीक्षणासाठी ही सर्वात आदर्श स्थिती असते. कोणत्याही उल्कावर्षावाचा ताशी वेग देताना तो  ZHR (Zenithal Hourly Rate)  मध्ये देतात. म्हणजेच उल्कावर्षावाचा उगम बिंदू  (Radiant) ख-मध्यावर असतानाचा दर ताशी दिसणाऱ्या उल्कांची संख्या.
त्यानंतर पहाटे ५:३० पर्यंत मिथुनरास पश्चिम क्षितीजाकडे कलेल.

किती उल्का दिसू शकतील?

दर ताशी १०० हून अधिक (झेड एच आर = १२०)

*पहाटे नंतर अधिक उल्का दिसतात असा अनुभव आहे.

गच्ची किंवा अंगण असल्यास सरळ झोपून आकाशाकडे पाहात राहावे.मिनिटाला एक वा दोन किंवा त्याहून अधिक उल्का पडताना दिसतील. मध्येच ५-१० मिनीटे एकही उल्का दिसणार नाही असेही होऊ शकते.उल्कानिरीक्षण हे उघड्या डोळ्यांनीच करावे.दुर्बिणीची गरज नाही.शक्यतो आजुबाजूने येणारा दिव्यांचा उजेड नसावा.या प्रकाश प्रदुषणामुळे कमी तेजस्वी उल्का दिसत नाहीत. 

तेव्हा ज्यांना शक्य होईल अशांनी निसर्गाच्या या आतषबाजीचा जरूर आनंद घ्यावा.

- मंदार