सत्यशोधक समीक्षक

सत्यशोधक समीक्षक
मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे. केशवराव हे विदर्भातील अमरावतीचे निवासी. विसाव्या शतकातील आस्वादक संगीत समीक्षा आणि मराठी सुगम संगीत यावर केशवरावांनी "केशवमुद्रा' उमटविली. त्यायोगे त्यांनी या शतकाला कृतज्ञ केले आहे, अशी भावना ज्येष्ठ समीक्षक श्रीरंग संगोराम यांनी व्यक्त केली आहे.
केशवराव "एकलव्य' या नावाने संगीत समीक्षा करीत असत. केशवरावांनी संगीतशास्त्र आत्मसात करण्यासाठी कुणाचा गंडा बांधला नाही. जे जे चांगले ते ते नीरक्षीर विवेकाने ते वेचत राहिले. त्यांची साधना एकलव्यासारखी होती. म्हणूनच की काय त्यांनी "एकलव्य' हे टोपणनाव धारण केले होते. केशवराव खरे तर डॉक्टर होण्यासाठी मुंबईला गेले होते. परंतु नादब्रह्माचा "नाद' वरचढ ठरला. त्याकाळी मुंबईतील वास्तव्यात त्यांनी भास्करबुवा बखले, उस्ताद करीम खॉं, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, मंजीखॉं, हिराबाई बडोदेकर, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, सवाई गंधर्व, सुंदराबाई जाधव अशा अनेक दिग्गजांच्या मैफलीचा व संगीत नाटकांचा आनंद लुटण्यात त्यांनी आपल्या रात्री "रमविल्या' या सर्वांच्या गाण्यातील "अमृतकण' त्यांनी वेचले. पुढे आकाशवाणी कलाकार म्हणूनही त्यांनी काम केले. नंतर आकाशवाणीवर ते अधिकारीही झाले. मात्र, केशवरावांना ओळखले गेले ते साक्षेपी संगीत समीक्षक म्हणून. त्यांची संगीत समीक्षा बहुविध आणि व्यापक होती. रागदारी कंठसंगीत हाच तिचा मुख्य विषय होता. आपल्या समीक्षेद्वारे रसिकांना व अभ्यासकांना रसाग्रही वृत्तीने संगीताकडे पाहण्याची दृष्टी लाभावी हा केशवरावांचा हेतू होता. त्यांनी आपल्या संगीत समीक्षेत भावसौंदर्याबरोबरच शास्त्राची बूजही दक्षतापूर्वक राखलेली दिसते. समीक्षेतून जाणता श्रोता निर्माण करणे हे केशवराव आपले कर्तव्य मानीत होते. आस्वादक संगीत समीक्षेबद्दलचे त्यांचे विचार शुद्ध कलात्मक दृष्टीचे, तटस्थतेचे आणि कर्तव्यबुद्धीचे महत्त्व पटवून देणारे होते.
केशवरावांनी आपल्या संगीत समीक्षेत काही तत्त्वे मूलभूत मानली ही तत्त्वे त्यांनी कोणत्या घराण्यावरून ठरविली नाही, तर वेगवेगळ्या घराण्याची गायकी ऐकून निश्चित केली. केशवरावांनी चार कलाकारांना आपल्या समीक्षा विचारांच्या केंद्रस्थानी मानले. गायनाचार्य भास्करबुवा बखले, उस्ताद फय्याज खॉं, उस्ताद मंजीखॉं आणि उस्ताद करीम खॉं हे ते चार कलाकार. या चौघांचेही गायन केशवरावांनी मनमुराद ऐकले. त्यातून आपला संगीत विचार त्यांनी पक्का केला. हे चारही कलाकार वेगवेगळ्या घराण्याचे होते. गायनात बिलंपतीवर भर असावा, त्यात स्थायी व अंतरा हे दोन्ही ठाशीव पद्धतीने असावेत. गायनात अर्थपूर्ण शब्दोच्चार सौंदर्याची बूज राखली जावी. त्यात मींड, घसीटयुक्त आलापीने डौलदारपणे समेवर येऊन पुन्हा पुन्हा सुखद संवेदना निर्माण होत राहावी, तानबाजीचा अतिरेक नसावा, तानेत रागशुद्धता व सुरेलपणा असवा, या सौंदर्य घटकांची प्रचिती केशवरावांना भास्करबुवांच्या गायनात आली. इतर तीन कलाकारांच्या गायनातही थोड्याफार फरकाने हेच घटक दृग्गोचर झाल्याचे प्रत्यंतर त्यांना आले.
भास्करबुवा ग्वाल्हेर घराण्याचे, फय्याज खॉं आग्रा घराण्याचे, मंजीखॉं जयपूर घराण्याचे तर करीम खॉं किराणा घराण्याचे होते. फय्याज खॉं शृंगाररसाचे बादशहा, तर मंजीखॉं विविध रसप्रवीण आणि करीम खॉं करुण रसाचे पारिपोषक होते. अशा बहुविधरंगी कलानुभवावरून केशवरावांच्या संगीत विचारांची जडणघडण झाली. या पक्व विचारांवरच त्यांची समीक्षा आधारलेली आहे.
[float=font:dhruv;color:000000;place:top;]केशवरावांच्या लेखनशैलीला उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, दृष्टांत या अलंकाराने सजण्याचा सोस नव्हता. विशेषणयुक्त भाषेच्या फुलोऱ्याने मूळ तत्त्वाला बगल देण्याची चलाखी त्यांनी कधी दाखविली नाही.[/float] तशी गरजही त्यांना कधी वाटली नाही. कारण केशवराव स्वतःच अवलिया कलाकार होते. त्यांचे संगीत विचार समृद्ध आणि वृत्ती सत्यशोधक होती. संगीत क्षेत्रात केशवरावांसंबंधी विरोधी सूरही आळविले गेले. व्यक्तिद्वेषाचे आरोपही झाले. परंतु हे तितकेसे खरे नाही. त्यांची समीक्षा सत्यशोधक व परखड होती. तसेच ते गुणग्राहक देखील होते. परंतु समीक्षेत त्यांनी तुष्टीकरणाचे डावपेच केलेले दिसत नाहीत. ""टीकाकार हा तत्त्वाचा बंद आहे; व्यक्तीचा मिंधा नाही,'' असे त्यांनी एका समीक्षापर लेखात रोखठोकपणे सांगून टाकले होते. गुरुपरंपरा चालविली नाही म्हणून केशवरावांनी मास्टर कृष्णरावांवर ठपका ठेवून टीका केली. बालगंधर्वांच्याही चुकीच्या नाट्यमूल्यांचा त्यांनी समाचार घेतला. पण बालगंधर्वांच्याच ऐन उमेदीच्या गाण्याचे प्रात्यक्षिकासह वर्णन करताना त्यांनी आसवेही ढाळली. कलामूल्यांसाठी आसक्त उपासकाला त्यांनी दिलेली ही दादच होती.
(www.santshali.blogspot.com)