साहित्यसेवा???

     ही हॉ ही हॉ असा गाढवाच्या आवाजात ओरडणारा मोबाईलचा गजर वाजायला लागतो तेव्हा सकाळचे साडेआठ वाजलेले असतात.खरं तर सकाळी साडेसहा वाजता उठवण्याची मोबाईलला आज्ञा असते.पण डुलकी नामक कळ जवळजवळ सात ते आठ वेळा दाबली गेल्याने मोबाईलचाही नाईलाज होतो.आता मात्र मनोगती उठतो.सूर्याचे प्रखर किरण डोळ्यावर आल्याने चैतन्याच्या प्रकाशवाटेवर चालल्याचा त्याला भास होतो.त्यामुळेच उठल्यावर आजूबाजूच्या परिस्थितीचा एकंदर अंदाज यायला त्याला थोडा वेळ लागतो.हे रोजचंच आहे.पण आज! आजचा दिवस वेगळा आहे.आज त्याचं पहिलं अपत्य मनोगतावर झळकणार आहे,आणि प्रतिसादांच्या संख्येवरून तो आपल्या साहित्यसेवेचं पाणी जोखणार आहे.म्हणूनच एका विलक्षण उत्साहाने मनोगती कामाला लागतो.
    रोजची क्षुद्र नित्यकर्म करण्यात आणखी एखादा तास उडून जातो.शेवटी हुश्श करत तो संगणकाचा पडदा उघडतो तेव्हा घड्याळात,दुकानात मांडलेल्या घड्याळांप्रमाणे दहा वाजून दहा मिनिटं झालेली असतात.पण संगणक सुरु होताच त्याला कळतं की नेहमीप्रमाणे (त्याच्याच गलथानपणामुळे)मराठी शब्द संपले आहेत.त्याची खूपच चिडचिड होते.झालं,म्हणजे आता झक मारत शब्दभांडारात जाउन आधी शब्द विकत आणावे लागतील.एवढ्या सकाळसकाळ त्या दुकानाच्या मालकाला तोंड द्यावं लागणार या कल्पनेनं त्याच्या पोटात गोळा येतो.कारण त्याने(म्हणजे दुकानदाराने)दुकानदार बनण्याच्या सगळ्या परीक्षा दिलेल्या असतात,त्यामुळेच ग्राहकांशी कसं वागावं हे त्याला चांगलंच कळतं.
    चडफडत मनोगती दोन घास पोटात ढकलतो आणि पायात चपला सरकवून शब्द आणण्यासाठी बाहेर पडतो.(जाण्यापूर्वी तो दार लावून घ्यायला विसरत नाही.) बाहेर आल्यावर ऊन अर्थातच मी म्हणत असतं.उन मी म्हणतं तर थंडी काय तू म्हणते का असा त्याला नेहमीच प्रश्न पडतो. स्वत:ला शहाणं समजणा-या त्या दुकानदारालाच आता या वाक्प्रचाराचा अर्थ विचारायचा अशी मनोगती मनाशी नोंद करतो आणि चालू लागतो.
    ब-याच पायपिटीनंतर 'अक्षरसखा शब्दभांडार खाजगी मर्यादित' ही लांबलचक पाटी दिसल्यावर मनोगतीला हुरुप येतो."साल्याचं स्वत:चंच शब्दाचं दुकान आहे,त्याला काय होतंय लंबेचौडे शब्द वापरायला"असा विचार मनोगतीच्या मनात येतो आणि तो दुकानात पाऊल ठेवतो.उन्हातून सावलीत आल्यामुळं त्याला हायसं की काय म्हणतात ते वाटतं.दुकानदाराचा अर्थातच ग्राहकसेवेबद्दल दशदिशात लौकिक असल्यामुळे दोनचार टाळक्यांखेरीज दुकानात कोणीही नसतं.दुकानदाराकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून कोणते शब्द घ्यावेत याचा मनोगती विचार करू लागतो.प्रतिसाद देताना उपयोगी पडतील म्हणून तो तीनचार 'सहमत' आणि वीसपंचवीस 'असहमत' घेतो.चार जोडी पु.ले.शु.पुरतील असं त्याला वाटतं.उत्तम,छान,चालू द्यात,लगे रहो,आणखी येउ द्यात वगैरे शब्द त्याने आधीच किलोवर घेतलेले असल्याने ते परत घेण्याच्या फंदात तो पडत नाही.थोड्याच दिवसात लिहायच्या एका जडजंबाल लेखासाठी तो सर्वसमावेशक,उन्नती,सांगोपांग,महामेरु,फलनिष्पत्ती,कर्तव्यपरायण आदी दिग्मूढ करणारे वजनदार शब्द घेतो ज्यामुळे पिशवीचं वजन अर्थातच बरंच वाढतं.काउंटरपाशी आल्यावर 'पन्नास शब्दांवर दोन म्हणी मोफत' ही सुचना वाचून मनोगती आशेने आपले शब्द मोजतो.ते एकोणपन्नास झालेले असतात.शेवटी घ्यायचा म्हणून तो एक 'संत' विकत घेतो.(लागलाच तर!)
      काउंटरवर येउन तो पैसे चुकते करतो आणि मोफत म्हणी काय मिळतात हे एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने पाहू लागतो.मात्र 'आपला तो बाब्या आणि दुस-याचं ते कार्टं' आणि 'हपापाचा माल गपापा' या म्हणी पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते."तुमचा न खपणा-या शब्दांचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी तुम्ही या असल्या म्हणी आमच्या गळ्यात मारता काय?" तो आवेशाने ओरडतो."घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर राहू द्या" दुकानदार मनोगतीला सुनावतो. क्षणभरासाठी पिशवीतून महामेरु काढून दुकानदाराच्या डोक्यात मारावा असं मनोगतीला वाटतं पण तो स्वत:ला सावरतो आणि पुटपुटत दुकानाबाहेर पडतो.चटचट पावलं उचलत तो घराजवळ पोहोचतो तेव्हाही उन मीच म्हणत असतं आणि त्या दुकानदाराची जिरवायला तो अर्थ विचारायचं तो नेहमीप्रमाणे विसरलेला असतो.
     घरात पाऊल ठेवताच तो पंख्याचं बटण चालू करतो.थंडगार पाणी पिताच त्याच्या चित्तवृत्ती का काय म्हणतात त्या उल्हसित होतात.पण अजून खरी कामगिरीतर पुढेच असते.शब्दांची पिशवी तो जवळ ओढतो आणि संगणक चालू करतो.पण लवकरच त्याची निराशा होते. 'कॅनॉट फाईंड सर्व्हर' नामक शब्द जगातलं अंतिम सत्य असल्याप्रमाणे पडद्यावर झळकू लागतात.तोपर्यंत काहीतरी करायचं म्हणून तो की-बोर्डवरच्या काही की काढून आणलेले शब्द संगणकात भरायचं काम सुरु करतो.तेवढ्यात आंतरजालही सुरु होतं.नेहमीप्रमाणे ज्यांना मराठीत लिहण्या-बोलण्याची आवड आहे त्यांच्या मनोगतावर येउन तो चिकटतो.प्रतिसादाबाबत मनोगती भलताच चिकित्सकपणा दाखवतो.उगाच कुणालाही तो प्रतिसाद देत बसत नाही.लेखनाचं योग्य मूल्यमापन आणि परीक्षण करायची आपल्यावरची जबाबदारी तो ईमानेतबारे पार पाडतो.कंपूबाजीकडे तो सोयीस्करपणे  दुर्लक्ष करतो.मंद गतीच्या आंतरजालामुळे प्रत्येक लेख वाचायला त्याला बराच वेळ लागतो.नेमकं शेवटच्या प्रतिसादापाशी आल्यावर कृपया पान ताजंतवानं करायची सूचना झळकते. रिफ्रेश करत बसलं तर सगळं काही परत यायला पंधरा मिनिटं लागतात हे जाणून मनोगती पडद्यावर थोडं पाणी शिंपडतो आणि पडदा स्वच्छपणे पुसुन घेतो.काम होऊन जातं आणि तो स्वत:च्याच युक्तीवर जाम खूष होतो.पण परत त्याची नजर घड्याळाकडे जाते आणि सर्व्हर कोलमडायच्या आत लेख लिहण्याचा तो निर्णय घेतो.
            आयुष्यात पहिल्यांदाच त्याचं आंतरजाल साथ देतं आणि आयुष्यात पहिल्यांदाच लेख यशस्वीपणे पाठवण्यात तो यशस्वी होतो.एव्हाना त्याला खूपच तरतरीत वाटू लागलेलं असतं आणि तो समाधानाने संगणक बंद करतो.पण हाय रे दुर्दैवा!नेहमीप्रमाणे जाण्याची नोंद करायला तो नेहमीप्रमाणेच विसरलेला असतो.पुन्हा संगणक सुरु करण्यापेक्षा आपलं नाव चोवीस तास मनोगतावर झळकलेलं काय वाईट? यातच समाधान मानून पोटाच्या ज्वलंत प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी त्याची पावलं आपसूक किचनकडे वळतात.

टीप:  वरील लेखातील मनोगती म्हणजे 'आपणच' असं कोणत्याही मनोगतीला वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजण्यात येऊ नये. या लेखातील कोणत्याही गोष्टीची घेण्यास बांधील जबाबदारी
       लेखक आहे.