कात्रज ते सिंहगड

--------- हा लेख आमच्या कात्रज ते सिंहगड प्रवासाचे (ट्रेकचे) संक्षिप्त वर्णन आहे.

ट्रेक :- कात्रज ते सिंहगड

दिनांक :- २४/१२/२००७

                       मी (श्रीकांत), मानसी, प्रवीण, इंद्रजीत आणि पुरुषोत्तम, आम्ही कात्रज ते सिंहगड ट्रेक ची सुरुवात २४ डिसेंबर ला रात्री केली. रात्री १०.३० च्या दरम्यान आम्ही कात्रज बोगद्या जवळ पोचलो. प्रवीण आमच्या मध्ये अनुभवी माणूस होता त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही कात्रज च्या बोगद्या वर पोचलो ती रात्र पूर्णचंद्रा ची रात्र असल्या मुळे प्रवास करण्याजोगा उजेड होता. पुरुषोत्तम चा पहिलाच ट्रेक होता आणि त्यात पहिल्याच डोंगरावर जाण्याची पायवाट चुकल्यामुळे त्याच्या चेहऱ्या वरचे भीतीचे भाव साफ दिसत होते. प्रवीण ने मग आपल्या तल्लख मेंदूवर जोर दिला आणि आम्ही आमच्या प्रवासच्या पहिल्या पडावावर येऊन पोचलो. पहिलाच डोंगर थोडा अवघड होता, वर पोचताच आम्हाला आमच्या ट्रेकचा अंतिम पडाव म्हणजेच सिंहगडावरचा लाल लाईट दिसला.

                      पहिल्या डोंगरावर आम्ही थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला, वरून पुण्याचे ते नयनमनोहर दृश्य पाहून आमचा थकवा लगेच दूर झाला आणि आम्ही आमच्या लक्षाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. पुढचे २४ डोंगर पार करण्याची  आम्ही मनाची तयारी दर्शवली. मला पुरुषोत्तम आणि मानसी बद्दल थोडी चिंता वाटत होती कारण पुरुषोत्तमचा पहिलाच ट्रेक होता आणि त्याने आयुष्यात साधी टेकडी सुद्धा चढली नव्हती, आणि इतर वेळी कर्णबधिर असलेल्या मानसीला रात्री येणाऱ्या आणि न येणाऱ्या (भासाची) अगदी सूक्ष्म आवाजाची फार भीती वाटत होती. बघता बघता आम्ही ६ डोंगर पार केले. ७ व्या डोंगरा वर विसावा घ्यायचा आम्ही निर्णय घेतला, तसा पाहता १ ते ६ या डोंगरा मध्ये जास्त करून लहान डोंगर होते त्यामुळे तसा थकवा आला नव्हता पण थोडी भूक लागली होती. प्रवीण ने नेहमीप्रमाणे खाण्यासाठी आणले होते आम्ही पुण्याच्या दिशेने तोंड करून खजुरांचा आस्वाद घेतला.

                      साधारण एक वाजला होता थंडी पडायला सुरुवात झाली होती सगळ्यांचे स्वेटर बाहेर यायला लागले. ७ व्या डोंगर उतरण्यास थोडा कठिण होता, जवळ जवळ आम्ही २० मी. ७ वा डोंगरा उतरत होतो. दोन अडीच वाजले होते आम्ही ११ व्या डोंगरावर पोचलो, पाय थकले होते डोळ्यात पण झोप जाणवत होती आम्ही अर्धा तास विसावा घेतला. [float=place:top;]११ वा डोंगर सर्वात मोठा डोंगर होता त्याच्या वरून आम्हाला पुढची पायवाट स्पष्ट दिसत होती. तीन वाजता आम्ही आमच्या लक्षाच्या दिशेने प्रवास सुरू केला.[/float] चंद्र आता डोक्यावर आला होता त्यामुळे आमची सावली आमच्या पायासमोर पडत होती अर्थात आम्हाला चालण्यास थोडा त्रास होत होता आणि आजू बाजूला झाडांचे प्रमाण सुद्धा वाढत चालले होते. मी मानसीला आधारासाठी दिलेल्या हातावरून तिला वाटत असलेल्या भीतीचा अंदाज मी लावू शकत होतो. तिला वेळोवेळी धीर देऊन आम्ही अंतर कापत होतो. आता आम्ही जवळ जवळ निम्म्या पेक्षा जास्त अंतर पार केला होता.

                     मानसीला आता नवीन अडचण त्रास द्यायला लागली, तिने जो बूट घातला होता तो तिच्या पायाला लागत होता. आम्ही थोड्या थोड्या अंतरावर थांबत थांबत पुढे जात होतो. इंद्रजीत ने आता आघाडी घेतली होती. आता साधारण ५ वाजले होते, पायवाटेने आम्ही आता २० डोंगर पार केले. २१ व्या डोंगर जवळ आम्ही रस्ता भटकलो आम्ही मोठा वळसा घालून आम्ही वरती पोचलो. तशी सूर्योदया ची वेळ जवळ आली होती त्यामुळे प्रकाश वाढत चालला होता २२ वा डोंगर हा शेवट चा डोंगर असल्यामुळे आम्ही अंतर पटापट कापत होतो. त्याच्यावर गेल्यावर आमच्या लक्षात आले की अजून २ डोंगर पार करायचे होते. आमचे पाय आता चालवेनासे झाले तरी आम्ही पुन्हा नवीन उमेदीने आम्ही चालण्यास सुरुवात केली. मानसीच्या पायाच्या वेदना आता तिला असह्य झाल्या होत्या आम्ही थोडा वेळ थांबलो तसा पाहत तांबडं फुटला होतं. तिने शेवट (२५ वा) चा डोंगर अनवाणी चढायचा निर्णय घेतला त्यामुळे आमचा चालण्याचा वेग मंदावला.

                      साधारण ७.३० वाजता आम्ही कोंढाणपुर फाट्या जवळ पोचलो, तिथून डांबरी रस्ता सिंहगडावर जातो आम्ही तिथे गाडीची वाट पाहत बसलो. थोड्यावेळाने आम्हाला गाडी मिळाली आणि ८.१५ ला आम्ही सिंहगडावर पोचलो.