...ये नववर्षा !

.........................................................................................
`मनोगत`चे संचालक, प्रशासक, कायमस्वरूपी सदस्य, धावती भेट देणारे
पाहुणे-सदस्य....
सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....!
.........................................................................................

या संकेतस्थळावर माझी ही पंचविसावी कविता (दिवाळी अंकातील रचना धरून) सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. तुम्हा सर्वांच्या हार्दिक प्रतिसादामुळेच हे शक्य झाले....असाच लोभ यापुढेही असू द्यावा....सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार...धन्यवाद.

.........................................................................................

...ये नववर्षा !
 
तुझ्या स्वागतासाठी माझे सजले अंगण...ये नववर्षा !
तुझ्या स्वागतासाठी दारी मंगलतोरण...ये नववर्षा !
 
नव-आशांचा, नव-स्वप्नांचा मोरपिसारा फुलवत ये तू
नव्या सुखांच्या इंद्रधनूचा पंखा हाती झुलवत ये तू
तुझ्याचसाठी फुलाफुलांची केली पखरण...ये नववर्षा !
 
दहा दिशांना नवतेजाचे किरण कोवळे उधळत ये तू
मनामनांचे किर्र कोपरे, अंधारे जग उजळत ये तू
दे येणाऱया क्षणाक्षणाला नवेनवेपण...ये नववर्षा !
 
ये प्रेमाचा ऋतू होउनी...गात गात गंधाळत ये तू
व्यथा-वेदना अन् दुःखांची विषे-किल्मिषे जाळत ये तू
ये, बरसत ये चराचरावर अमृत-श्रावण...ये नववर्षा !
 
जे जे वंचित आणि अलक्षित, ये त्यांनाही हसवत ये तू
आनंदाचे नगर वेगळे त्यांच्यासाठी वसवत ये तू
काय हवे ते सहजासहजी दे त्यांनापण...ये नववर्षा !
 
- प्रदीप कुलकर्णी
 
..........................................................................
रचनाकाल ः २५ व २६ डिसेंबर २००६
..........................................................................