--- पाटील, --- पाटील,मी जात चोरली तेव्हा...!!!

मी कुणबी पाटील नाही, मी लेवा पाटील नाही, मी मराठा पाटील नाही, अरे हो, मी ९६ कुळीही नाही..... नाही, नाही, मी तिरोळे पाटील ही नाही.

मी पलंगावर बसून गरम गरम चहाचे झुरके घेत होतो. तोच, सणसणीत कानफडात मारावी, तसा आवाज माझ्या कानांवर पडला.

"तुमचं कूळ काय आहे हो?" मावशी.

"माहीत नाही." २ मिनिटे थांबल्यानंतर मी उत्तर दिलं.

"असं कसं? कूळ तर माहितीच पाहिजे. आणि आता तर अमेरिकेला जाणार आहेस.माहितीच पाहिजे."

"गरजच पडली नाही कधी.म्हणून माहीत नाही." त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी विचारलेला हा प्रश्न होता,हे मी समजून चुकलो होतो.

मी जिथे बसलो होतो, त्या पलंगाच्या मागे, भिंतीवर, विवेकानंदांचा हाताची घडी घातलेला, मोठा फोटो होता. तो बघून मी विचारांच्या अथांग सागरात बुडलो. "खबरदार, माझ्या हिंदू धर्माला नावे ठेवलीत तर, समुद्रात फेकून देईन". अजून काय म्हणतात ते, "माय डियर, ब्रदर्स ऍंड सिस्टर्स ऑफ अमेरिका......" प्रचंड टाळ्यांचा कडकडाट.मी, माझं ह्या पृथ्वीवरचं अस्तित्वच विसरलो.वाटलं, मावशींना सांगावं, समजावून सांगावं, जात वगैरे मी मानितं नाही.

सांगावं, "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे......, परार्था प्राणही द्यावे". साने गुरुजी सांगून गेले आहेत मला. मी १० वर्षे, १ ली ते १० वी, सोमवार ते शनिवार ( रविवार आणि सुट्टीचा दिवस वगळून इतर सर्व दिवशी) म्हटलेली प्रार्थना. पण अपेक्षितच उत्तर देतील, मावशी. म्हणतील, अरे ते फक्त म्हणायला आणि ऐकायला चांगलं वाटतं. वर्षानुवर्षे हेच उत्तर मी ऐकत आलो आहे.कदाचित गुरुजींनी खूप, खूप सोप्या शब्दात सांगितलं आहे हे, म्हणून हे आजच्या पिढीच्या लोकांना कळत नसेल.त्यांना पटलं असतं ते, जर गुरुजींनी फक्कड संस्कृत शब्दात सांगितलं असतं , काहीतरी कठिण भाषाशैली वापरली असती, काही वृत्तांचे प्रकार वापरले असते. का हो गुरुजी तुम्ही अर्थ सांगितला, एवढ्या सोप्या शब्दांमध्ये? अब्राहम लिंकनने, 'हेडमास्तरांस लिहीलेले पत्रात' मला एक प्रश्न टाकावासा वाटतो, आजवरच्या माझ्या शिक्षकांना. का सांगितलं नाही मला, जगाचं व्यवहारी स्वरूप? का सांगितलं नाही मला, "मनुष्यजातीवर निःस्वार्थ प्रेम" हा काही खरा धर्म नाही". 'ज' 'जहाजाचा' शिकवलात गुरुजी तुम्ही आम्हाला, 'ज' जातीचा का नाही शिकवला.

सांगाल का मावशी मला? कूळ म्हणजे काय हो? हिंदू म्हणजे काय हो? जात, उपजात म्हणजे काय असतं हो. कोण आहे मी? माझ्या "शाळा सोडल्याच्या दाखल्यावर" तर मी हिंदू कुणबी असल्याचं लिहिलं आहे. कुणी लिहिलं आहे हे? माझ्या वडिलांनी.त्यांना कुणी सांगितलं हे? त्यांच्या वडिलांनी. त्यांना? त्यांच्या वडिलांनी.........!!!!!! ही प्रश्नावली आणि उत्तरावली पृथ्वीवरच्या पहिल्या मनुष्यापर्यंत जाऊन थांबेल एकदाची. पण त्याला कोणी सांगितलं असं वर्गीकरण करायला? काय गरज होती जातिव्यवस्था निर्माण करायची? फिरायला पृथ्वी होती, जंगल होतं , पाणी होतं, कंदमुळं होती. मग अशी कुठली बुद्धी त्याला सुचली होती, जात निर्माण करायची. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं ठेवायला नावं पुरेशी नव्हती का? तो मनुष्य समूह करून राहू लागला. प्राण्यांमध्ये पण अशी जातिव्यवस्था असते का हो? त्यांच्यात पण जात, उपजात असते? शास्त्र जेवढं मला आठवतं, तेवढ्यानुसार समूह करून राहणाऱ्या प्राण्यामध्ये, मुंगी आणि मधमाशी ह्यांचे प्रकार पडतात. लढाऊ मुंगी, अन्न शोधणारी मुंगी वगैरे, वगैरे. मग तसं समजून कदाचित माणसाने ३ जाती निर्माण केल्या असतील. ब्राम्हण, क्षत्रिय आणि क्षुद्र. पण ही जातिव्यवस्था आपल्या भारत देशातच आहे. इतर देशांच्या जातिव्यवस्था काय आहेत? त्यांचे प्रमुख प्रकार काय पडतात ह्याचं सखोल ज्ञान मला नाही. पण प्रमुख प्रश्न हा आहे की काय गरज आहे ह्या जाती निर्माण करण्याची? आणि पाडल्या तर पाडल्या तर तुम्ही त्या निसर्गाचे नियम पाळून पाडल्या नाहीत. लढाऊ मुंग्या, अन्न शोधणाऱ्या मुंग्या ह्यांच्यामध्ये निसर्गतःच शरिररचनेमध्ये फरक असेल म्हणून त्यांचं हे वर्गीकरण मला पटतं. पण माणसांचं काय? नाना पाटेकर म्हणतो त्या प्रमाणे, " ये लो हिंदू का खून, ये लो मुसलमान का खून.....बोल इसमे हिंदू का कौन सा और मुसलमान का कौन सा? साला बनाने वालेने फर्क नही किया तुम कौन होते हो, फर्क करनेवाले"? माझ्या मते मनुष्यांचे ३ च प्रकार पडू शकतात, पुरुष, स्त्री आणि ३ रा प्रकार. मग ह्या जाती आल्या कुठून? जन्मदात्यांना विचारलं तर ते म्हणतात, 'माहीत नाही' असं सांगायचं. पण का? आजवर किती तरी लोकांशी माझं पटलं नाहीये, का तर ते जात-पात,धर्म ह्या गोष्टी सहज स्वीकारत होते आणि मी त्यांना विरोध करत होतो.मी अरुंधती रॉय ह्यांच्याप्रमाणे ह्या विश्वाचा एक सदस्य आहे, "हे विश्वची माझे घर आहे". मला आठवत, १२ वीत असताना, माझ्या एका मित्राला मी असच उत्तर दिलं तर तो कितीतरी वेळ हसत होता." येडा-बिडा आहे का रे तू? पुस्तकं जास्त वाचलेली दिसतात तू"?

ह्या ३ जाती निर्माण केल्या तर केल्या, मग ह्या उपजाती का? ब्राम्हणामध्ये हा देशस्थ, तो कोकणस्थ, मराठ्यामध्ये तो ९६ कुळी मराठा, तर कुणी सूर्यवंशी क्षत्रिय मराठा, कुणी लेवा पाटील, तर कुणी कुणबी पाटील, हा शीख, हा ईसाई, हा पारशी, हा मुसलमान, हा जाट, हा तमका, हा ढमका तर हा फलाणा. आणि ह्या सगळ्या गडबड गोंधळात माझी "वैश्विक जात" वेगळीच.म्हणून मी आजकाल एक चोरी करतो. मी जात चोरतो. भांडतही बसत नाही कुणाशी. शांत राहतो. माझ्यातला माणूस जिवंत ठेवून जगण्याचा एक प्रयत्न करतो.कुणी मारला इतर लोकांमधला माणूस? कोण मारेल माझ्यामधल्या माणसाला?

मुंबईमधल्या लोकलमध्ये जेव्हा एका मतिमंद मुलीवर एक दारुडा बलात्कार करतो आणि इतर लोकं बघतच राहतात तेव्हा माझ्यातला माणूस मरतो. अमृता देशपांडेला गर्दीसमोर मारलं जातं तेव्हा माझ्यातला माणूस मरतो, सत्येंद्र दुबेचा खून होतो त्या वेळेस मरतो, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या स्त्रीला ज्या वेळी जिवंत जाळलं जात त्या वेळी, मरतो माणूस..... गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस मध्ये जाळलेल्या निष्पाप बालकांच्या मातांचा आक्रोश कानांवर पडल्यावर माझ्यातला माणूस मरतो....किती वेळा मरणार? आणि किती मरणार रे?

आपण एक काम करूया ना, आपली मुलं जन्माला आली ना, लगेच त्यांच्या डोक्यावर एक पाटी ठोकायची, जातीची, उपजातीची. त्यांना लगेच शिकवायचं, दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला. त्यांना तलवार भाले, चालवायला शिकवायचं. छ्या, कुठल्या जमान्यात जगतो आहे मी? शिवाजी महाराजांच्या नव्हे. त्यांना शिकवायचं, मशिनगन कशी चालवायची ते. त्यांना शिकवायचं एके-५६ कशी चालवायची ते. त्यांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं प्रशिक्षण द्यायचं. आणि आता तर, न्युक्लिअर बॉंब आहे, १००-२०० लावले की झाली पृथ्वी नष्ट. कुणीच उरणार नाही ह्या जगात.तसंही आता कुणी खऱ्या अर्थाने जगतच नाहीये म्हणा. पण, पण......पण.जगवायचा तर आहे माणूस. अरुंधती रॉय यांनी म्हटल्याप्रमाणे,

"आय हॅव अ ड्रीम, टू लिव्ह लाईफ, टिल आय ऍम अलाइव्ह, टू डाय टिल आय ऍम डेड".