माझ्याभोवतीचे जग बदलत आहे !

.......................................

माझ्याभोवतीचे जग बदलत आहे !

.......................................

आत आत खोल काही उमलत आहे !
माझ्याभोवतीचे जग बदलत आहे !

नवे नवे काहीतरी घडू लागलेले...
भरदिवसाच स्वप्न पडू लागलेले...
थोडे थोडे दिसू, थोडे दडू लागलेले...
हळू हळू कोडे असे उकलत आहे....!

मनाचे हे दार कोण ठोठावते बरे ?
काळजात कोण माझ्या डोकावते बरे ?
दूर दूर कोण मला बोलावते बरे ?
पाऊलच कुठे पण उचलत आहे...!

आनंदातसुद्धा असे दुःख वाटते का ?
विनाकारणच हुरहूर दाटते का ?
एकाएकी डोळ्यांतले पाणी आटते का ?
समजेना....! काहीतरी गफलत आहे...!!

पुन्हा पुन्हा केला मीच कोंडमारा माझा
झाकोळत ठेवला मी सदा तारा माझा
वाहू दिला नाही कधी मीच वारा माझा
...जरी सारे करायाची सवलत आहे !
            
 *  * *
सुटेलच कधीतरी पेच...जाणतो मी
मनापरी घडणार, हेच जाणतो मी
इथे माझा मीच...इतकेच जाणतो मी
...सुरू माझी माझ्याशीच मसलत आहे !!
             *  * *
- प्रदीप कुलकर्णी

रचनाकाल ः ३० मे १९९७