मतदान

अखेर ज्याची उत्साहाने वाट पाहात होते तो मतदानाचा दिवस उजाडला. ठरवलेच होते कि भल्या पहाटे रांग लावायाची. पहिले वहिले मत आपणच द्यायचे.

कर्तव्याच्या भावनेने मन अगदी भरून आले. मतदान केंद्रावर गेले. बघते तर निवडणूक कर्मचारी आणि ४-५ कुत्री स्वागताला.... लोकांच्या उदासीनतेला शिव्या घालत अगदी मनापासून मोठ्या उत्साहाने नाव, प्रभागक्रमांक, मतदार क्रमांक असलेली चिठ्ठी पुढे केली. मतदार सूचीतील नाव पाहून हायसे वाटले आणि नाव
पुकारले गेल्यावर तर अगदी कृतकृत्य झाले. इतक्या मेहनतीचे चीज झाले.

त्याच उत्साहाने मतयंत्रापुढे उभी राहिले. सगळीच नावे अनोळखी वाटत होती. येताना पोस्टरवर पाहिलेले
उमेदवारांचे चेहरे आठविण्याचा प्रयत्न केला पण लक्षात आले कि त्यातील बरेचसे चेहरे नुकतेच तुरुंगातून
सुटल्यासारखे आणि इतर तुरुंगात जाण्याच्या तयारीत असल्यासारखे.

आता आली का पंचाईत. मतदान करायचे तरी कोणाला? बरे निवडणूक चिह्न पाहून मत द्यायचे तर वाटले
शिट्टीपेक्षा नारळ बरा निदान रोजच्या स्वयंपाकात तरी उपयोगास येतो. मत वाटले गॅस सिलेंडरच चांगला. त्याच्या शिवाय तर जगणेच अशक्य. मग वाटले शंख हेच चिह्न चांगले. संबंधित उमेदवाराच्या नावाने शंख करायला बरा.

छे! मन अगदी गोंधळून गेले, काय करावे सुचेना. मी अगदी मुखस्तंभासारखी उभी. तो पर्यंत निवडणूक
अधिकार्‍यांचा गलका चालू झाला होता. एक प्रतिनिधि म्हणाला फार विचार करू नका. दाबा कुठलेही बटण.

मला हे पण करणे योग्य वाटेना.  ही तर लोकशाहीची थट्टाच. अरे देवा आता काय करावे? निर्णय तर
करताच येत नव्हता.

थोडा मेंदूला ताण दिला आणि रामबाण उपाय सापडला. ७ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रत्येक उत्तराला चार
पर्याय असायचे. आम्ही उत्तर सापडले नाही की "आदा पादा कोण पादा दामाजीचा घोडा पादा" असे म्हणून ज्या उत्तरावर बोट येईल त्याच उत्तरावर बरोबरची खूण करायचे. ही कल्पना आठवली आणि मन हर्षोल्हासितझाले. वाटले मनावरील मणामणाचे ओझे उतरले. मतदान करून आले आणि मन मोकळे मोकळे झाले.

कर्तव्यपूर्तीचा आनंद गगनात मावेना. पुढील पाच वर्षे आता बिनघोर जगायचे. पण आतल्या आत वाटले की मतदानायोगाने मतयंत्रात शेवटी "वरीलपैकी कोणत्याही चोरास आमचे मत नाही" असा पर्याय ठेवला असता तर सर्वच श्रम वाचले असते. निदान एव्हढ्या अग्निदिव्यातून जावे लागले नसते. काय मंडळी, खरे की
नाही?

आपली मते मला अवश्य कळवावीत.

आपली आणि नेहेमीच विनम्र,

मृदुला.