मांजर व्हा!!!!

काय म्हणताय? आयुष्याचा कंटाळा आलाय? रोजचं ऑफीस, बॉस आणि बायकोची कटकट याने वैतागलाय? वैतागू नका. माझ्याकडे उपाय आहे. मांजर व्हा!!!! चेष्टा नाही! खरच!  माझा अनुभव सांगतो...

मी पण असाच वैतागलो होतो. हिमालयात निघून जावसं वाटायच. मनात यायचं उगाच माणसाच्या जन्माला आलो. प्राणी असतो तर फक्त पोटाची काळजी असती. बाकीच्या काळज्या नसत्या.

ऐक दिवस ऐक जाहीरात वाचली. "१०० रुपये द्या आणि हव्या त्या प्राण्यामध्ये बदलून जा! परत माणसाचे रूप घेता येईल.- जादुगार सरकार". मी विचार केला. ३ दिवस सुटी येत होती. बायको सुद्धा माहेरी चालली होती. बघुया ऐखादा प्राणी बनुन. मनातली इछछा पुर्ण करायला ही सुवर्ण संधी होती. बेत फसला तर माणसाच्या रुपात परत येता येणारच होतं.

बायको माहेरी गेल्यावर मी जादुगाराच्या भेटीला गेलो. पटकन नंबर लागला. "बोला. कोणत्या प्राण्यात रुपांतर करु?" जादुगाराने विचारलं. विचार केला मांजरच ठिक. कुठेही डल्ला मारता येतो, आकार छोटा म्हणून कोणत्याही घरात शिरता येतं. मी म्हणालो "मांजर!!".

"ठिक. पैसे द्या आणि ओणवे व्हा!". मी ओणवा झाल्यावर त्याने ऐक काळा कपडा अंगावर टाकला. काहितरी पुटपुटल्याचा आवाज मला ऐकू आला. अचानक मी लहान होतो आहे असं मला वाटू लागलं. त्या अंधारात सुद्धा मला त्या कपड्याच लेबल स्पष्ट दिसायला लागल. ह्याचा अर्थ मी मांजर झालो होतो!! जादुगाराने काळा कपडा काढला. हातात आरसा घेउन तो उभा होता. त्यात मी माझ नवीन रूप न्याहाळलं. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या ऐका गोजिरवाण्या बोक्यात माझ रुपांतर झाल होत. मी जादुगाराला छान म्हंटलं, पण तोंडातून फक्त 'म्यावं' निघालं.

"ठिक. परत माणसात यायच असेल तर १०० रुपये घेउन या."

मी घरी निघालो. आता मझी खरी अडचण सुरू झाली. चाळीत परतायच कसं हा माझ्या पुढे प्रश्न होता. बस, लोकल, रीक्षा, टॅक्सी अश्या कोणत्याही वाहनात मला प्रवेश नव्हता. शेवटी चाळीच्या दिशेने जाणऱ्या २-३ टॅक्सीच्या टपावर बसून  मी चाळ गाठली . मागे लागलेले कुत्रे चुकवून मी जिन्या पाशी पोहोचलो. सुटकेचा निःश्वास टाकला. येव्हढ्यात कुठूनतरी आवाज आला.

"मेल्या!!! चोरून दूध पितोस होय रे???" ऐक सणसणीत फ़टका माझ्या कंबरेत बसला. "आई गं!!!!" म्हणून ओरडलो, पण तोंडातून फक्त "म्यँव" निघाल. अजस्त्र शरीराच्या जोशीकाकू हातात कुंचा घेउन उभ्या होत्या. "अहो तो मी नव्हे!!!" अस मी म्हणालो, पण व्यर्थ. तोंडातून "म्यँव" शिवाय दुसरं काहीच निघत नव्हत. जोशीकाकू दुसरा फटका मारय्च्या बेतात होत्या. प्रसंगावधान राखून मी तिथून पळ काढला. जिना चढून मी पहील्या मजल्यावर आलो. सुरक्षित ठिकाण बघून मी थांबलो. माराने अंग ठणकत होतं. ह्याचा सुड घ्यायचाच असा मी निश्चय केला. थोडा आराम करावा म्हणून मी घरी निघालो. येव्हढ्यात समोर ऐक मांजर दिसली. तिच्या डोळ्यात कुतूहल होतं.

"लागलं वाटतं." तिने विचारलं.

"छे छे!!! फार नाही. पाठ थोडी शेकून निघाली." मी म्हणालो.

"नविन दिसताय...कुठून आलात?"

"मी तसा इथलाच."

"असं? कधी दिसला नाही ते?"

"ह्याच भागात राहतो. म्हंटलं ह्या चाळीत ऐक चक्कर मारावी." मी सावरून घेतलं.

"बरं बरं. जपून रहा हो!!! मांजराच्या जातीने सावध राहव नेहमी. बोला काय नाव तुमचं?".

"मी सदा भोळे."

"काय सांगता? अहो ह्याच नावाचा ऐक वेंधळा माणुस आमच्या चाळीत आहे. आजच त्यांच्या घरात चुकून उघड ठेवलेलं दुध मी पिउन आले. तुम्ही पण तसेच दिसता. बघितला तुमचा वेधळेपणा मघाशी!!"

माझ्या वेंधळेपणाचा उल्लेख केल्यापेक्षा, मला मी स्वःता साठी ठेवलेल्या दुधावर तिने डल्ला मारल होता त्याचा जास्त राग आला.

"ठिक ठिक!!" मी म्हणालो.

"चला मी तुम्हाला मासे खाऊ घालते."

"कोणाकडे?" मी विचारलं.

"तळमजल्यावरचे जोशी!"

"ते कधीपासुन मासे खायला लागले? ते तर ब्राम्हण!"

"कसंच काय! दर रविवारी घरी कार्यक्रम असतो! चला जाउया. फक्त काळूला कळता कामा नये!"

"कोण काळू?"

"चाळीचा भाई!"

मांजरांमध्ये सुद्धा भाई असतो हे मला प्रथमच कळत होतं.

"असू दे! भाई असो वा ताई! मी नाही घाबरत!"

"अहो पण.....काळू!!!!"

"नाव नका घेऊ!!"

"काळू....तुमच्या मागे....."

तिच्या आवाजातला बदल मला जाणवला. मी मागे वळून बघितलं. ऐक काळाशार बोका त्यच्या लाल डोळ्यांनी मला बघत होता. त्याने झेप घेत पंजा मारयचा प्रयत्न केला. मी चपळाईने बाजुला होत धुम ठोकली. त्यचा तोल जाउन तो पाटिलबाईंच्या वाळवणावर पडला. मेणकापडावरून घसरत जातांना त्यातच तो अडकून गेला. योगयोगाने पापड वाळत टाकायला आलेल्या पाटिलबाईंनी चिडून हातातल्या लाटण्याने काळूचा चांगलाच समाचार घेतला. "मांजरड्यांनी नुसता वैताग आणलाय!!!!!" पाटीलबाई रागात पुटपुटल्या. त्यांच्या पापडांचा काळू ने सत्यानाश केला होता.

मी दुसऱ्या मजल्यावरून हे सगळ मजेत बघत होतो. येव्हढ्यात मागून आवाज आला.

"अहो!!! शुक....शुक...!"

मी बघितल तर जाधवांची मनी ऊन खात बसली होती. मी शेपुट हलवून प्रतिसाद दिला.

"या पाव्हणे...बसा!"

जवळ जाऊन मी पण तिथेच अंग टाकले.

"चांगलीच जिरवली तुम्ही काळूची!!!", कौतुकाने मनी बोलली.

"ह्या काळू आणि राणी पासून संभाळून राहा हो!!"

"ही राणी कोण?"

"अहो तिच जिच्याशी तुम्ही गुलुगुलू बोलत होतात!!! त्या काळू ची काळी!!"

"पण ती तर पिवळी आहे!"

"पण मनाने काळी आहे हो! ऐक महीन्यापुर्वी माझ्या ऐका पिलाचा जीव घेतला होता हो तिने. अजुनही त्याच्या आठवणीने जीव कळवळतो!!"

"रडू नका, चालायचच!!"

मनीने डोळ्यातल पाणी टिपलं.

"चला मी तुम्हाला मासे खाऊ घालतो." मी म्हंटलं.

"कोणाकडे?"

"तळमजल्यावरचे जोशी!"

"जोशी? बरं चला!"

आम्ही तळमजल्यावर गेलो. उघड्या झरोक्यातून आत मध्ये गेलो. घरात कोणी नव्हतं. जोशीकाका ऑफीसला गेले होते, आणि काकूंना मी मघाशी भाजीची पिशवी घेऊन जातांना बघितल होतं. आम्ही स्वयंपाकघरात शिरलो.

"कुठे ठेवले असतील काकूंनी मासे?" मी विचारलं.

"बहुतेक त्या फडताळात!. महत्त्वाच्या गोष्टी त्या तिथेच ठेवतात." मनी म्हणाली.

मी बघितलं फडताळ फार उंच नव्हत. मी त्यावर उडी मारली, पण अंदाज साफ चुकला. माझी धडक फडताळाला बसली आणि ते खाली पडले. आतल्या सगळ्या वस्तू खाली पडल्या.

"अहो काय हा वेंधळेपणा!! नवशीके आहात काय?"

हो म्हणायचं अगदी जिभेवर आलं होतं.

"चला पटापट. बघा सापडतंय का!"

मी पंज्याने वस्तू इकडच्या-तिकडे करायला लागलो.

"अहो असं काय करता आहात? वास घेऊन बघाकी!!"

आम्ही दोघे वास घेउन शोधायला लागलो. ५-१० मिनिटे शोधा-शोध केल्यावर शेवटी डबा सापडला. दोघांनी माश्यांवर यथेच्छ ताव मारला. माश्यांपेक्षा घरातली नासधूस बघून जोशीकाकूंचा चेहरा कसा होइल ह्या विचारने मला हसू आलं. कुंच्याच्या माराचा मी बदला घेतल्याच मला समाधान वाटलं.

त्यानंतरचे १-२ दिवस अगदी मजेत गेले. दिवसा मनी बरोबर चाळीतल्या घरात शिरायचं, पदर्थांवर यथेच्छ ताव मारायचा आणि रात्री स्वःताच्या घरात घोरत पडायचं. ह्या दिवसांत उडी मारणे, शिकार करणे, पंजा मारणे, अंग चाटणे, शेपुट हलवणे  ह्या मांजरंच्या कला सुद्धा मी आत्मसात केल्या. १-२ वेळा मार बसला, पण ह्या मजे पुढे त्यच काही वाटलं नाही. काळू ने ऐकदा परत पंजा मारयचा प्रयत्न केला होता, पण मी परत निसटून गेलो. असं एकंदर मजेत चाललं होतं.

ऐक दिवस घरावरून चक्कर मारली तेव्हा घर उघडं दिसलं. आतमध्ये डोकावून बघितल तर ही रडत बसलेली. शेजारच्या दामलेबाई "काळजी नका करू हो, नक्क्की येतिल. आज नाही आले तर पोलीसांमध्ये तक्रार देऊ" असा सल्ला देत होत्या. माझ्या ह्या कार्यक्रमाची कोणाला माहीती नव्हती. त्यामुळे हिने काळजी करणं स्वाभविक होतं.

मी लगेच माणसांत यायचा निर्णय घेतला. अडचण अशी होती की जादुगाराला द्यावयाचे पैसे उशी खाली होते. मी पलंगावर हळूच चढलो. उशी खालून तोंडात पैसे घेतले.

"ह्याट!!!!!!" हिचा आवाज आला. पाठोपाठ फेकून मारलेलं पुस्तक. मी बघितलं तर ही दरवाजा आडवूण ऊभी होती. जायला रस्ता नव्हता. शेवटी पळून जायला मी तिच्या अंगावर ऊडी मारली. माझ्या कृतीने तिची चांगलीच घबराट उडाली. माझा नाईलाज होता.  मांजराच्या रूपात का होईना, मी पहील्यांदा माझ्या बायकोला घाबरवलं होतं.

घाईने मी जादुगाराकडे पोहोचलो. तिथे ऐक कुत्रा बसला होता. पहील्यांदा मी घाबरलो, पण नंतर लक्षात आलं की तो पण माणूस बनायला आलेला आहे. माझा नंबर आला. घाईने मी तोंडातली नोट जादुगारापुढे टाकली. परत काळा कपडा, मंत्र होत माझ परत माणसांत रुपांतर झालं.

स्पेशल टॅक्सी करून चाळीत आलो. बायकोची समजूत काढता काढता नाकी नऊ आली. त्यानंतर सकाळचा किस्सा तिने ऐकवला. मी फक्त हसलो.

त्यानंतर माणसाच्या जीवनाचा सराव व्हायला मला ३-४ दिवस लागले. कधी ऐकदम ऊडी मारून ४-४ पायऱ्या चढायची ईच्छा व्हायची, कधी हात चाटायचो, शेपटी गेल्याने चुकल्या-चुकल्यासारख़ं वाटायचं. १-२ वेळा मनीला मी स्वःताच्या हाताने दुध दिल. काळूवर ऐकदा नेम धरून दगड मारला.

माझ्या ह्या विक्षिप्त वागण्याचं बायकोला सुद्धा आश्चर्य वाटलं, पण नवरा परत आल्याच्या खुशीत ती काही बोलली नाही.

तर मित्रांना असा होता माझा अनुभव..कसा वाटला???? काय म्हणतां? जादुगाराचा पत्ता हवा आहे? घ्या की मग लिहून...


मुळ कथा रमेश मंत्री ह्यांची आहे. ती पुर्वी १२ वी च्या मराठीच्य पुस्तकात होती. ती थोडी आठवून आणि बरिचशी मनाने लिहून येथे देत आहे. कोणाकडे मुळ कथा असल्यास टाकवी. प्रतिसादांचे स्वागत.

रमेश मंत्री ह्यांची क्षमा मागून.

हेमंत मुळे