गज़ल

छंदसाचा, शब्दवैभव, बाज होता
अंतरीचा पण कुठे आवाज होता ?

पाडता यांत्रिकपणे मी दोन ओळी
वाटले मज शेर खटकेबाज होता

वाटले मीही करावे काव्य थोडे
वाटले चिलटास तोही बाज़ होता

आग शब्दांतील होती कापरासम
तो कुठे वागीश्वरीचा याज होता ?

तोंडदेखी वाहवा मागून झाली
वाचताना चेहरा नाराज होता

न्यून का दडते कधी आभूषणांनी ?
चढवला प्रतिभामढ्याला साज होता

माणसा तुज रोज का होतोय घाटा ?
हेच उत्तर, "देव सट्टेबाज होता" !