मी दुःख विसरण्यासाठी गातो गाणी...

...................................................
मी दुःख विसरण्यासाठी गातो गाणी...!
...................................................

मी डोळ्यांमधले दिसू न देतो पाणी !
मी दुःख विसरण्यासाठी गातो गाणी !

ओढून इथे मज कुणी आणले आहे ?
माझे न गाव हे,नीट जाणले आहे...
मुक्काम किती हा उरला याच ठिकाणी ?

आनंद कधीही निखळ मिळाला नाही...
ही त्यात आसवे कुणी मिसळली काही ?
जी सुखे लाभली, तीही उदासवाणी !

साधीच अपेक्षा...पूर्ण कुठे पण झाली ?
पदरात उपेक्षा...फक्त उपेक्षा आली...
मी व्यर्थ याचना केली केविलवाणी !

आकांत हा किती किती समंजस माझा...
हा शांत राहतो...मित्र निखालस माझा
वेदना-सखीही आहे खूप शहाणी !

काहूर आतल्या आतच माझे दाटे...
बाहेर न येती कधी आतले काटे
आयुष्य राहिले...राहो हे अनवाणी !

काळोखच आहे बरा... सोबती माझा
तो एकच जिवलग...खरा सोबती माझा
त्यालाच कळे ही माझी रामकहाणी!

वेशीवर माझ्या व्यथा मीच का टांगू ?
मी काय, कुणाला, कशास आता सांगू ?
परक्यांना का ही समजतील गार्‍हाणी ?

मी दुःख विसरण्यासाठी गातो गाणी...!

...................................................
- प्रदीप कुलकर्णी
...................................................

रचनाकाल ः ६ व ७ फेब्रुवारी २००८