कळ्यांचे दिवस फुलांच्या राती....

       थंडीचा कडाका आता आता पर्यंत होता. रात्री झोपताना चार पांघरुणं घेऊनही हात पाय पोटाशी घेऊन झोपताना मजा वाटायची. सकाळी उठल्यावर अंगावरचं उबदार पांघरुण बाजूला सारून उठावं असं वाटायचंच नाही. 'अजून पाच मिनिटांनी उठू या ' चे तीन चार गजर झाले की मात्र उठावंच लागायचं. पण तोवर उशीर झालेला असायचा. एकूणच गेले तीन-चार महिने सगळी काम उशीरानेच सुरू होती. दिवस लहान असल्यामुळे संध्याकाळ पण लवकर व्हायची. सूर्य पश्चिमेला झुकतो आहे असं म्हणेपर्यंत, बटण बंद केल्यावर विजेचा दिवा बंद होतो तसा झटक्यात अंधार पडायचा. नेहमीच्या वेळेला घरी जात असलो तरी त्या चटकन पडलेल्या अंधारामुळे घर एकदम लांब लांब वाटायचं. दिवसभर स्वेटर चढवून वावरायचं, भर दुपारीही उन्हातून जाणारी वाट शोधून त्यावरून चालायचं. हवा गार, पाणी तर फारच गार आणि सूर्याचं ऊनही गार पडल्यासारखं वाटायचं. मला या सगळ्याची कुठेतरी खूप गंमत वाटायची. ही अशी गार हवा, छोटे दिवस, हवंहवंसं वाटणारं ऊन हे वर्षातल्या फार थोड्या काळात अनुभवायला मिळतं म्हणून आपल्याकडे त्याचं अगदी अप्रूप असतं. रोज दुपारी जेवणानंतर ऊन खात एक फेरफटका मारताना 'युरोपात अशी हवा नेहमी असते त्यामुळे तिथले लोक जास्त उत्साही असतात' ही चर्चा हटकून होतेच. एकूणच थंडीचे दिवस म्हणजे खाण्यापिण्याची रेलचेल, पावसाच्या चिकचिकाटापासून आणि रडक्या उदास दिवसांपासून मुक्ती असं काहीसं समीकरण असतं.

        पण मला मात्र थंडीचे दिवस म्हटलं की आगगाडीच्या डब्याची आठवण येते. एखादं लग्नाचं वऱ्हाड आगगाडीच्या डब्यात कोंबून परगावी निघालेलं असावं. विशेषतः बरीचशी मंडळी मुंबईतच गेल्या दोन तीन पिढ्या गेलेली असावीत आणि लग्न मात्र मुंबईकरांच्या दृष्टीने अतिदूर म्हणजे वर्धा किंवा भुसावळ वगरे (म्हणजे आठ दहा तास आगगाडीत काढावे लागतील इतकं लांब) असावं. अशा वेळी सगळे कसे एकमेकांना धरून धरून राहतात, कोणीही कुणाच्याही शेजारी बसून गप्पा मारतं, चहाच्या सामुदायिक 'पंगती' उठतात, पत्त्यांचे डाव रंगतात. एखादी दूरची आत्या आणि या लग्नासाठी म्हणून अनेक वर्षांनी दिल्लीहून आलेली मामी एकमेकींची ओळख नसताना देखिल बालमैत्रिणी असल्याच्या थाटात गप्पा मारत बसतात , वेळप्रसंगी सगळ्यांचं सामानही सांभाळतात. एखादी तरुण माता गाडीच्या खिडकीतून येणारा वारा आणि आगगाडीचा नादमय डौल (म्ह. डोलणे हो) यामुळे आपल्या बाळाला मांडीवर घेऊनच झोपी जाते आणि मग तिच्या सासरची कोणीतरी आजी कौतुकाने 'झोपू दे, एरवी कुठे बिचारीला एवढा निवांतपणा मिळायचा'  असं म्हणत त्या तान्हुल्याला आपणच खेळवत बसते. एकूणच आगगाडीच्या त्या चिमुकल्या डब्यात त्यांचं इवलंसं विश्व त्या प्रवासापुरतं सीमित झालेलं असतं आणि जो तो त्याचा मनापासून आस्वाद घेत असतो. संगतीला राहिल्याशिवाय आणि पंगतीला जेवल्याशिवाय माणूस कळत नाही म्हणतात तसं दैनंदिन धकाधकीला आणि काळज्यांना काही वेळ त्या डब्याच्या दाराबाहेर ठेवून सगळेच जण त्या क्षणाचा आनंद घेत असतात. माणसा माणसात एरवी कधीही निर्माण झाले नसते असे घट्ट बंध बांधले जाण्याचं काम नकळत होत असतं. जुन्या - पान्या आठवणी निघतात, माणसं निघून गेलेल्या रम्य काळाचा चित्रपट क्षणार्धात पाहून येतात आणि सुरू होताना केंव्हा हा प्रवास संपतोय आणि मुक्कामी पोचतोय असं झालेल्या प्रत्येकालाच प्रवास संपत आला की अजून थोडा वेळ प्रवास असाच सुरू राहिला असता तर अशी हुरहूर लागते. मग डब्यातल्या त्या चिमुकल्या जागेच्या कटकटी जाणवत नाहीत. रेल्वेने दिलेलं बेचव अन्नही चविष्ट वाटू लागतं. रक्तापेक्षाही घट्ट असं शेजाऱ्याचं नातं असलेल्या 'काकू' सगळ्या लहान मुलांना गोष्टी सांगून लळा लावून जातात. मंडळी खऱ्या अर्थाने एक संघ बनून लग्नाच्या ठिकाणी पोचतात. ध्यानीमनी नसताना अनपेक्षित आणि नॉस्टॅल्जिक असा आनंद सगळ्यांना ताजंतवानं करून सोडतो.

        थंडीचे दिवस मला त्या आगगाडीच्या डब्यासारखेच वाटतात. सगळं विश्व आकुंचन पावून आपल्या हाताच्या परिघाएवढं झालेलं असतं. सगळंच हाताच्या अंतरावर असावं असं वाटत असतं. एकमेकांना धरून राहावं, सगळ्यांनी मिळून घरातलं वातावरण उबदार करून सोडावं, दारं खिडक्या बंद करून ज्याला इंग्रजीमध्ये कोझी कोझी म्हणतात तसं वातावरण घरी सतत असावं असं वाटतं. खावं, प्यावं, व्यायामाचं नावही काढू नये आणि त्या क्षणाचा आनंद घेत बसून राहावं असं वाटत राहातं.

       पण या थंडीची सवय झाली की लगेच ती संपते. आणि मग उन्हाळा येतो. आधी येतो तो थोडासा थंड थोडासा गरम असा ऋतुराज वसंत. आंब्याच्या मोहोराचा, द्राक्षांचा संत्र्या - मोसंब्यांचा. पण आता उन्हं जोरदार तापायला लागतात. दक्षिणायनामुळे सोडायला लागलेला भूभाग परत मिळवण्यासाठी जणू काही सूर्य त्याची किरणरूपी बोटं तापवतो. आणि पाहता पाहता, साहेब रजेवर गेलेले असताना निवांत पहुडल्यासारखं वाटणारं ऑफिस, साहेब रजा अर्ध्यावर टाकून पंधरा मिनिटात हजर होत आहेत या बातमीने कसं खडबडून जागं होतं, विजेसारखं हलायला लागतं तसे  ते मरगळलेले, बसून राहावंसं वाटायला लावणारे, निष्क्रीय, कोरडे असे थंडीचे दिवस आठवणींचा भाग बनून जातात. जीवनातला रस परत येतो. दिवस लवकर उगवतो आणि संध्याकाळ मोठी असते. सगळं वातावरण कसं रसरशीत असतं. उत्साह ओसंडून वाहत असतो. मधूनमधून ते युरोपातले २५ अंश तापमानाचे दिवस हवेसे वाटू लागतात. पन्हं, लिंबाचं किंवा कोकमाचं सरबत, नीरा, नारळपाणी हवंहवंसं वाटायला लागतं. सगळं हाताच्या अंतरावर असावं या भावनेपासून ते सगळं लांबलांब असावं आणि कितीही लांब असलं तरी सहज गाठू इथपर्यंतचा हा प्रवास मला नेहमीच मोठा मनोरंजक वाटतो.

        क्षणभर थांबून विचार करून पाहिलं तर मला नेहमी प्रश्न पडतो की या दोन ऋतूंपैकी मला कोणता ऋतू आवडतो? बरेचदा मला तो रसरसलेला उन्हाळा मरगळलेल्या थंडीपेक्षा जास्त प्रिय वाटतो. फुलांचा, मृद्गंधाचा, गच्चीवर झोपण्याचा, ए. सी. सुखाचा वाटण्याचा ऋतू.  आमच्या हिंदीच्या पुस्तकात एक कविता होती,
                                जब से है बसंत यह आया
                                जन जन के मन को है भाया
                                जाडे का पिट गया दिवाला
                                सुख से अब सोते है लाला
त्यातल्या 'जाडे का'  दिवाला पिटवणारा तो बसंत आणि त्यानंतर येणारा झळाळणारा तरीही प्राण कंठाशी आणणारा तो ग्रीष्म जास्त आवडतो. माझ्यासाठी तरी शेकोटीच्या आसपास राहावंसं वाटणं यापेक्षा शेकोटीची गरजच नसणं जास्त सुखाचं आहे. आगगाडीच्या डब्यापेक्षा उघड्या मैदानात चांदण्या रात्री ट्रेकसाठी ठोकलेला तंबू जास्त मनोरम आहे. थंडीसारख्या गोष्टीला भिऊन एकमेकांचे हात धरून कोंडाळं करून राहण्यापेक्षा एकमेकांपासून अंतराने दूर आणि तरीही मनाने जवळ असणं जास्त आश्वासक आहे.
तुम्हाला काय आवडेल?

--अदिती
(माघ शु ९ शके १९२९
१४ फेब्रु. २००८)