शीर्षक सुचत नाही

ऋण सर्व जरी मी तुझे चुकवले होते
वेगळेपणाचे सुरूच खटले होते

साक्षीस कुणीही उभे न माझ्यासाठी
तू इमान साऱ्यांचेच फितवले होते

राहिल्यात मागे स्मृतिसाखळ्या कणखर
अनुबंध रेशमी जरी उसवले होते

तू दुरावल्याचे दुःख कराया हलके
बागेत ताटवे अनेक फुलले होते

लीलया खेळलो शब्दांशी जीवनभर
संवाद तुझ्याशी परी न जमले होते

भ्रम, मिलिंद, तुजला खेळलास शब्दांशी
रे खुळ्या, तुझ्याशी शब्द खेळले होते !