नेपथ्य

का असे निरंतर आयुष्याचे होते ?
माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते !

वेचता विखुरले तुकडे जगतो मरतो
हे असेच का हो स्वप्नबघ्याचे होते ?

लागते वळाया नजर सारखी मागे
तेव्हाच बारसे वार्धक्याचे होते

कुंचला कशाला दिलास तू डोळ्यांना ?
भलतेच रंगले चित्र उद्याचे होते

सोडता सुटेना मोहमार्ग माझ्याने
चोरटे प्रलोभन पण दिव्याचे होते         

जर राग, लोभ अन् मोह असे स्वर्गीही
मग कशास अवडंबर पुण्याचे होते ?       

वेगळा तसा पृथ्वीहुनी फार न स्वर्ग
असलेच फरक तर नेपथ्याचे होते

१ : (दिवा -> दिव्याचे   दिव्य -> दिव्याचे)

२ : (पुणे -> पुण्याचे  
पुण्य ->
पुण्याचे. समस्त पुणेकर कापरासारखे पेटून उठून माझ्यावर चालून येऊ नये म्हणून हा आगाऊ खुलासा. सैद्धांतिक
सूचना : 'आगाऊ' हा श्लेष
वाटल्यास त्यास सदरहू लेखक जबाबदार नाही !   )