वादळभूमी २.०

    सकाळी विमानतळावरुन निघालो तेव्हा भुवनेश्वर जागं झालं होतं. पूर्वेकडे जाऊ तसं लवकर उजाडतं त्यानुसार ओरिसामध्ये सकाळी सहा वाजताच चांगलं फटफटीत उजाडतं. पण मावळतं देखील तितकंच लवकर आणि सवय होईपर्यंत बर्याचदा पाच वाजेपर्यंतच अंधार पडायला सुरुवात होऊन आमचं नियोजन चुकत असे.
       असो. सकाळ सकाळ भुवनेश्वरचं जे दर्शन झालं ते मी तरी कधी विसरणार नाही. कुणालाही आवडेल असंच! म्हणजे कामाला जाणाऱ्यांची घाई, घरांसमोर चाललेली झाडलोट, रस्त्याकडेच्या टपऱ्यांवर उकळणारा चहा! आणि सर्वत्र जाणवण्याइतपत असलेली स्वच्छता! भुवनेश्वर चा विमानतळ शहराच्या जवळच आहे त्यामुळे गाडीतून शहरात पोहोचायला बिलकूल वेळ लागत नाही. डीआरडीओच्या विश्रामगृहात राहण्याची आमची सोय होती. क्षेपणास्त्र चाचणीवेळी भुवनेश्वर वरुन बालासोर(बालेश्वर)आणि तेथून पुढे चंदीपूरला  जाणाऱ्यां अधिकाऱ्यांसाठी हे विश्रामगृह डीआरडीओने ट्रान्झिट फॅसेलिटी म्हणून बांधले आहे. तिथे पोहोचून सामान खोल्यांवर टाकलं आणि नंतर दुपारी भुवनेश्वर बघायला निघावं असं ठरलं. एकतर सकाळचं साडेपाचचं विमान पकडण्यासाठी कालच्या संपूर्ण झोपेचं खोबरं झालं होतं. त्यामुळे झोपेची थकबाकी मिटवणे हा पहिला कार्यक्रम होता. 
   आख्ख्या ओरिसात जवळजवळ ६०० मंदिरं आहेत. भुवनेश्वर हे सर्वार्थाने मंदिरांचं शहर आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने कुठेही, कशीही, हरएक देवांची, भडक ऑईलपेंटने रंगवलेली ही मंदिरं नाहीत तर दगडांमध्ये नजाकतीने कोरलेली, कित्येक शतकांपूर्वी बांधलेली, काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान देणारी मंदिरं आहेत. बहुतेक मंदिरं ही भोळ्या शंकराची आहेत. मुक्तेश्वर, परशुरामेश्वर अशी! पण भुवनेश्वर (भुवन+ईश्वर ?) मधलं सगळ्यात मोठं आणि पर्यटकांच्या अजेंड्यावरचं पहिलं मंदिर आहे ते लिंगराज मंदिर

   खासच आणि आवर्जून बघण्यासारखं! विशाल परिसरात एक भव्य मंदिर आणि त्याच्याजवळच असलेली इतर देवतांची छोटी छोटी मंदिरं! पण हे पाहण्याचा आनंद जेवढा तेवढाच मनस्तापही नंतर होतो. काहीतरी अपूर्व पाहिल्याचं समाधान मिळतं तेवढाच संताप, चीड, आणि आपल्या कर्मदरिद्रीपणाचं वाईट वाटतं!  हे मंदिर बाहेरून बघायला जेवढं भव्य, बारकाईने कोरलेलं, शब्द अपुरे पडतील असं आहे तेवढंच अस्वच्छ, ओंगळवाणं आतून आहे. अर्थात ही तिथल्या पुजाऱ्यांची, भोळसट, निर्बुद्ध भक्तांची करणी आहे. ठिकठिकाणी  अभिषेकासाठी वाहिलेल्या दही दुधाचे ओघळ, बेलाची पानं, कुजलेलं निर्माल्य, धूर ओकणाऱ्या उदबत्त्या, चिकट मेणचट जमीन!  बऱ्याचदा ख्रिश्चन, मुस्लिम, शीख मंदिरांपेक्षा हिंदू मंदिरं अस्वच्छ असतात हा आक्षेप कोणीही एका क्षणात मान्य करेल असंच हे मंदिर आहे. जोडीला शांती करवाओ, प्रसाद चढाओ वगैरे साठी मागे लागणारे तुंदिलतनू भटजी आहेत. नाक, कान, डोळे उघडे ठेऊन आत गेलेलो आम्ही लवकरच नाक चिमटीत पकडून बाहेर आलो आणि बाहेरुन मंदिर बघण्यालाच आम्ही प्राधान्य दिलं. आतला अनुभव विसरायला लावेल अशीच कलाकुसर या मंदिरावर आहे. अक्षरश: लोण्यात कलाकुसर केल्यासारखे हात त्या अनाम कारागिरांनी दगडावर चालवले आहेत.

   ११ व्या शतकात हे मंदिर बांधून झालं. जजॉती केसरी या राजाने साधारणत: सातव्या शतकात पाया घातल्यावर पुढे त्याच्या नातवांनी ते पूर्ण केलं. दिलेली लिंगराज मंदिराची चित्रे जालावरुन घेतलेली आहेत. भावना दुखावण्याची शक्यता असल्याने मंदिरात कॅमेरा नेऊन छायाचित्रे काढायला बंदी आहे. अस्वच्छता मात्र चालू शकते.
   सुदैवाने भुवनेश्वर मधल्या इतर मंदिरांमध्ये मात्र ही परिस्थिती नाही. मुक्तेश्वर, राजारानी या मंदिरांमध्ये पूजाअर्चा वगैरे प्रकार पूर्ण बंद आहेत. राजारानी या मंदिरात राजाराणीचा काही संबंध नसून      

 

राजारानिया नामक एका वेगळ्या प्रकारच्या दगडात घडवल्याने मंदिराला हे नाव मिळाले आहे. ही मंदिरे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत. अतिशय सुंदर निगा राखलेल्या बागांनी या मंदिरांचा परिसर सजवलेला आहे. केवळ भेट देण्यासाठी आलेले पर्यटकच इथे दिसतात. हीच गोष्ट लिंगराज मंदिराच्या बाबतीत अवश्य व्हायला हवी मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे ते शक्य नसावं.


  

भुवनेश्वर पासून जवळच उदयगिरी आणि खंदगिरी या दोन टेकड्यांवरील जैन लेणी बघण्यासारखी आहेत. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात बांधलेली ही लेणी आश्चर्यकारकरित्या सुस्थितीत आहेत. अगदी समोरासमोरच या दोन्ही टेकड्या आहेत. त्यामुळे एकावर जाताच दुसऱ्या टेकडीवरची लेणी अगदी विस्तारपूर्वक बघता येतात.

  

भुवनेश्वर पासून ८ किलोमीटरवरचं धौली हे ठिकाण विकसित करण्यात जपानने आपले योगदान दिले आहे. याच ठिकाणी कलिंग युद्ध झाले ज्याच्या पश्चातापाने अशोक राजाने बौद्ध धर्म स्विकारला.

 

 एक धवल रंगाचा स्तूप आणि  विविध प्रसंग उलगडणारी दगडचित्रे येथे पाहण्यासारखी आहेत.
     

भुवनेश्वर आणि त्याच्या आसपासची हि ठिकाणं पाहून ही सहल आताच सार्थकी लागल्यासारखं वाटत होतं, मात्र 'याचसाठी केला होता अट्टहास' असं वर्णन होऊ शकेल ते कोणार्कचं जगप्रसिद्ध सूर्यमंदिर आम्हाला खुणावत होतं. जागतिक वारसा असलेल्या या केवळ एका गोष्टीसाठी आम्ही इतक्या दूरचा ओरिसा दौरा आखला होता.

-सौरभ.

चित्रेः  १ व २ = लिंगराज मंदिर
       ३ व ४ = राजारानी मंदिर
       ५ वे    = मुक्तेश्वर मंदिर
       ६ व ७ = उदयगिरी खंदगिरी लेण्या.
       ८ व ९ = धौली.