प्रचंड क्षमतेचं शहर नागपूर

कोणत्याही ठिकाणच्या वनसंपदेच्या श्रीमंतीवर तिथल्या वन्यजीवांचं प्रमाण अवलंबून असतं. वनसंपदा जितकी जास्त तेवढ्या विविध जाती-प्रजातींचे पक्षी, प्राणी त्या भागात जास्त प्रमाणात आढळतात. निसर्गाने नागपूरला भरभरून सृष्टीवैभव दिलं आहे. प्रचंड वनसंपदा आणि वन्यजीवन असलेलं 'पेंच' आंतरराष्ट्रीय तोडीचं नॅशनल पार्क आहे.

.....

नागपूरला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. नागपुरच्या वैविध्यपूर्ण वनसंपदेत इतरत्र अभावानेच आढळणारे पक्षी-प्राणीही पहायला मिळतात. सागवान, साजडा, धावडा, तंेदू, काई अशी विविध प्रकारची झाडं इथे विपुल प्रमाणात आढळतात. अनेक प्रकारच्या वनस्पतींमुळे इथल्या पक्ष्यांतही विविधता आढळते. उंच झाडांप्रमाणेच मोठ्या खोडांची झाडंही इथे आहेत. त्यामुळेच की काय या मोठ्या झाडांच्या ढोलीत घरटं करून राहणाऱ्या पक्ष्यांचं प्रमाणही इथं खूप आहे. मुंबईतील 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'नंतर आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकषिर्त करणारं दुसऱ्या क्रमांकांचं नॅशनल पार्क आहे. शिवाय महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश असं दोन राज्यात पसरलेलं 'पेंच' हे देशातील एकमेव नॅशनल पार्क आहे.

येथील प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या समृद्ध जगतासाठी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू पोषक आहेत. उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पूर्व मान्सूनच्या प्रकारातील उत्तर आणि दक्षिणेकडून वाहणारे वारे यांच्या अद्भूत संगमाचे ठिकाण म्हणजे 'रामटेक'. या संगमानंतर हे वारे हिमालयाच्या दिशेने वाहतात. रोमँटिक जीवनात अशा मोसमाचं महत्त्व, अशा वाऱ्याचं महत्त्व और असतं, हे वेगळं सांगायला नको. याच कारणामुुळे कवि कालिदासांनी 'मेघदूत'ची रचना करण्यासाठी 'रामटेक'ची निवड केली. मेघांना वरून पृथ्वी कशी दिसते यांचं अद्भूत वर्णन त्यात आहे. पावसाचं प्रमाणही इतर भागापेक्षा अधिक आहे. परिणामी पानगळीसह सदाहरित वृक्षही इथे आढळतात.

इथल्या वनसंपदेने ब्रिटीशांनांही मोहात पाडले होते. केरळच्या निलाम्बूर आणि तामिळनाडूतील 'टॉप स्लिप'नंतर त्यांनी नागपुरात कृत्रिम सागवानाची लागवड केली होती. कृत्रिम पद्धतीने अर्थात रोप लावून वाढवलेल्या सागवानांचा प्रयोग नागपुरात होऊ शकला तो केवळ तिथल्या पूरक वातावरणामुळेच. 'फुटाळा' तलावाच्या पूर्व दिशेला 'सेमिनरी हिल्स'वर असलेलं सागवानाचं जंगल कृत्रिम आहे. ही नक्कीच नागपूरसाठी कौतुकास्पद बाब आहे. इथं डिंकाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होतं. पण प्राण्यांची संख्या जास्त असल्यानं तस्करीचं प्रमाणही मोठं आहे. कासव, तितर, जंगली डुक्कर यांसारख्या प्राण्यांची तस्करी मांसासाठी जास्त प्रमाणात होत असल्याचं दिसून आलं आहे. ज्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. 'नागझिरा' अभयारण्य येथून जवळच आहे. देशात सर्वाधिक वाघ या अभयारण्यात पहायला मिळतात. 'बोर' अभयारण्यही पर्यटकांना आकषिर्त करतं. 'पेंच'मधील प्रचंड वनसंपदा आणि वन्यजीवनामुळे हे स्थळ आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद होऊ शकतं.