'जोधा -अकबर' च्या निमित्ताने

कालच 'जोधा अकबर' पाहिला आणि आज या चित्रपटाच्या विरोधात सांगलीत शिवप्रतिष्ठानतर्फे काढलेला मोर्चा आणि त्यावर पोलिसांचा लाठीमार वगैरेच्या बातम्या पाहिल्या.  'जोधा- अकबर' मध्ये फक्त अकबराचीच उजळ प्रतिमा दाखवली आहे असे या निदर्शनकर्त्यांचे म्हणणे आहे. जोधा आणि अकबर यांचे नाते पती -पत्नीचे नव्हतेच असे इतर काही निदर्शनकर्ते म्हणतात. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दिलेल्या एका मुलाखतीत निर्माता - दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर याने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपण किती दीर्घ संशोधन वगैरे केले आणि आपण इतिहासाशी प्रामाणिक राहून कलाकाराचे निर्मितीस्वातंत्र्य कसे घेतले आहे याचा तपशील दिला होता. (हा अर्थात चित्रपटाची हवा करण्याचाही प्रकार असू शकतो.)
इतर सर्व ऐतिहासिक घटनांप्रमाणेच ही नेमकी हकीकत काय याची विश्वासार्ह नोंद काही सहजासहजी उपलब्ध नाही. खरोखर हा मुघल सम्राट इतका सहिष्णू वगैरे होता का? हिंदुस्थानात जन्मलेला आणि राजपूतांत वाढलेला असल्याने त्याला हिंदुस्थानाबद्दल एक उपभोग्य जमीन आणि हिंदू जनतेबद्दल गुलाम प्रजा या पलीकडे काही ओढ होती का? राजकीय तडजोड म्हणून जिच्याशी विवाह केला त्या हिंदू राजपूत स्त्रीला त्याने पत्नीचा दर्जा देण्याचे आणि 'मलिका- ए- हिंदुस्थान' करण्याचे धैर्य दाखवले होते का? तसे असेल तर पुढे सलीम -अनारकली मीलनाला त्याचा कडवा विरोध कसा? (काहींच्या मते अनारकली ही अस्तित्वातच नव्हती म्हणे!)
मूळ चित्रपटातही इतिहास संदिग्ध असल्याचे उल्लेख आहेत. मग काही धूसर माहितीवर आधारित एक काल्पनिक रंगीत चित्र एवढेच या चित्रपटाचे महत्त्व असेल तर त्याला विरोध करणे म्हणजे त्याचे महत्त्व वाढवण्याच प्रकार नाही का? शिवसेना किंवा मनसेने असे प्रकार केले असते तर एकवेळ त्यामागचा हेतू लक्षात आला असता, पण कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेल्या संघटना या विरोधात उतरेल्या दिसताहेत, मग हे खरेच इतिहासाचे विद्रूपीकरण आहे का?