जाहिरात फक्त जाहिरातीसाठीच : अर्धसत्य आणि चांदण्या ..!

स्टार न्यूजवर नेहेमी 'नॅशनल रिपोर्टर :  आपका रिपोर्टर' ची जाहीरात येते. त्यात ते म्हणतात की आधा सच खतरनाक होता है. उदाहरणादाखल अर्धी मिशी, अर्धे वर्तमानपत्र, अर्धे कुंकू दाखवतात. जाहिरात बघून वाटते की, वा! खरंच काय काळजी घेतात हे प्रेक्षकांची! सगळ्या जगातले पूर्ण सत्य दाखवणारे चॅनेल फक्त हेच एकमेव की काय असे वाटायला लागते, पण ते फक्त जाहिराती पुरतेच मर्यादित आहे हे नंतर प्रत्यक्ष बातमी बघतांना लक्षात येते. राज ठाकरेंचे म्हणणे त्यांनी 'आधा सच' दाखवले. ध चा मा नक्की केला गेला. फक्त याच बाबतीत नाही तर जेव्हा धोनी जेव्हा म्हणाला होता की जर सचिन, युवराज चांगले खेळले असते तर आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकलो असतो.तर चांदण्यांनी लगेच ओरडून ओरडून सांगितले ली सचिन पर साधा निशाना. सचिन की योग्यता पर सवाल आणि बरेच काही. नंतर सचिनने श्रीलंकेविरुद्ध चांगले प्रदर्शन केल्यावर धोनी म्हणाला की, आपण सचिन बद्दल बोलतो आणि लिहितो आहेत हे लक्षात घ्यायला हवे, कुणा ऐऱ्यागैऱ्याबद्दल नाही. त्याच्यावर आरोप करण्याआधी सगळ्यांनी विचार करायला हवा होता. हे धोनी अप्रत्यक्षरित्या प्रसारमाध्यमांनाच बोलला कारण, त्यांनीच त्याचे सचिनबाबतचे म्हणणे चुकीच्या पद्धतीने अर्थ लावून लोकांसमोर मांडले (आधा सच की पूरा गलत). धोनीने असे केल्यामुळे "चांदणी" चिडली आणि म्हणाली, गोळी चालवून, निशाना अचूक लागल्यावर धोनीने बंदूक दुसऱ्यांच्या (चांदण्यांच्या) खांद्यावर ठेवली.

इतर चॅनेलही काही वेगळे नाहीत. उदा. खबर हर कीमत पर, सबसे तेज, हकिकत जैसी खबर वैसी वगैरे! जो दावा केला जातो तो पाळला जातो का?

इतर कोणतीही जाहिरात असू द्यात, जाहिरातीतला दावा कधीच पूर्ण केला जात नाही. भलेही अशा जाहिरातींना कल्पनाशक्ती वापरल्यामुळे ('अर्धी मिशी, अर्धे वर्तमानपत्र, अर्धे कुंकू' किंवा 'खड्ड्यांची बातमी बघून मोटरसायकलस्वार म्हणतो की हा तर सरकारचा प्रश्न आहे आणि नंतर तोच स्वतः मोटरसायकलसह खड्ड्यात पडतो' वगैरे ) बक्षीस मिळो. पण दाव्याचे काय? जाहिरातीला बक्षीस हे त्यातील फक्त कल्पनाशक्तीला द्यायला हवे/दिले जाते  की त्यातील दावे किती खरे यालाही बक्षीस  देतांना महत्त्व द्यायला हवे/दिले जाते?

आपणा सर्वांना काय वाटते याबद्दल. माझे म्हणणे पटले का? कोणत्या जाहिरातींना बक्षीस मिळाले आणि कुणी खरंच दावे पाळलेत?