मनसुबे

गंध इथले वेगळे पण श्वास माझा तोच आहे
बंध हे रेशम जरी मी त्यात गुदमरलोच आहे *

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे

मी किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
सारखा दारापुढे तो पारवा घुमतोच आहे

ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळी
हाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच आहे!

कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!

संत थकले! नाहिसे अज्ञान त्याचे होत नाही...
पीठ तो भलत्या जनीसाठी किती दळतोच आहे!

कोरडे होतील डोळे - आसवे असतील जर ती
कोण डोळयातून संततधार ओघळतोच आहे?

या अटळ अपुरेपणाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - मी तरी उरलोच आहे...

* सानी मिसऱ्यासाठी सुचवण्यांबद्दल चित्तंचे आभार!