मार्च २००८

का कल्लोळ कल्लोळ - 'देवराई'

माणसाचे मन ही मोठी अजब गिजबीज आहे. मनाचे व्यापार, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. मानसिक रोगांचीही तीच कथा आहे. मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यांची कारणे आणि नेमके उपचार याबाबतचे माणसाचे ज्ञान मर्यादितच आहे. मनोरुग्णांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही फारसा बदललेला नाही. भारतात तर नाहीच नाही.

स्किझोफ्रेनिया किंवा दुभंगलेले व्यक्तिमत्व हा असाच एक गंभीर मानसिक आजार. 'देवराई' मधला शेष देसाईला हा आजार झाला  आहे. मुळातच काहीसा एककल्ली, आत्ममग्न, सतत कसला ना कसला विचार करत राहणारा, पण अतिशय बुद्धीमान असा हा शेष हळूहळू जास्तजास्त चिडचिडा, तापट होत गेला आहे. त्याचे वडील लहानपणीच गेलेले, आई आणि धाकटी बहीण सीना, एवढेच त्यांचे कुटुंब. पण शेषची खरी जवळीक आहे ती कल्याणीशी. कल्याणी शेष आणि सीनाची मामेबहीण. तिची आई गेल्यावर ती तिच्या आत्याकडे, शेष आणि सीनाच्या आईकडेच वाढली आहे. कल्याणी, शेष आणि सीना यांचे बालपण कोकणातल्या त्या गावात मोठ्या मजेत गेले आहे. गावाजवळ देवराई आहे. देवराई म्हणजे सेक्रेड ग्रोव्ह - देवाच्या नावाने वाढलेले, वाढवलेले जंगल. ते तोडायचे नसते. लहानपणापासून शेषला देवराईचे वेड आहे.त्यातच वाडीवर काम करणाऱ्या पार्वतीमध्येही शेषची काही चमत्कारिक भावनिक गुंतवणूक झाली आहे, पण पार्वतीचे गावातल्यच शंभूशी लग्न झाले आणि शेषचे सगळे बिनसायला सुरुवात झाली. शंभू दिसायला दांडगा, पार्वती एवढीशी, नाजूक. शेषचा विक्षिप्तपणा वाढतच गेला. त्यातच परिस्थितीने असे काही चमत्कारिक वळण घेतले की कल्याणीला ताबडतोब तिथून निघून जावे लागले. सीनाचेही लग्न झाले. मुळात एकांडा असलेला शेष आता पार एकाकी झाला. त्याचे शिक्षण अर्धवटच राहिले होते. त्याला जे मनापासून करायचे होते, ते देवराईवरचे संशोधन तसेच राहिले. लग्न वगैरे झाले नाहीच. मुळात अतिशय बुद्धीमान असलेलेया शेषच्या आयुष्याची अशी वाताहात झाली. त्याच्या मनात विचारांचा, कल्पनांचा एक भलामोठा गुंता झाला. त्याच्या मनातल्या दोन हळव्या बिंदूंची - पार्वतीची आणि देवराईची - गल्लत होऊ लागली. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यात देवराई तोडली जाणार असे ऐकताच तर शेषचा स्फोटच झाला. देवराई? की पार्वती? देवराई तोडणार? म्हणजे पार्वतीला मारणार? कोण? शंभू? मग हे सगळं सांगायचं कुणाला? सीना? कल्याणी? पार्वती? देवराई....

स्किझोफ्रेनिक लोकांच्या मनातल्या या कल्लोळाचे सुरेख चित्रण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा 'देवराई'. 'देवराई' ची सुरुवात थोडीशी भयपटाच्या अंगाने होते. जंगलात वरखाली होणारा कॅमेरा, खर्जातल्या गूढ आवाजात 'शेष... शेष...' अशा अनामिक हाका वगैरे. पण त्यानंतर बाकी का चित्रपट संपूर्ण पकड घेतो. वास्तविक या चित्रपटाच्या कथेत मानसिक आजार आणि पर्यावरण असे दोन विषय आहेत. पण या दोन्ही विषयांवर प्रेक्षकाला विचार करायला लावतानाही हा चित्रपट क्षणभरही प्रचारकी थाटाचा वाटत नाही, हे महत्त्वाचे.

'देवराई' हा खऱ्या अर्थाने दोन कुलकर्ण्यांचा चित्रपट आहे. अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी. अतुल कुलकर्णीची शेषची भूमिका ही एकंदरीत मराठी चित्रपटांच्या इतिहासातील काही उल्लेखनीय भूमिकांपैकी एक मानली जावी, असे मला वाटते. मानसिक आजारांनी ग्रस्त लोक ज्यांनी पाहिले आहेत, त्यांना मी असे का म्हणतो हे ध्यानात येईल. शेषचा एकलकोंडेपणा, त्याचे गर्दीत मिसळतानाचे अवघडलेपण, त्याचे लोकांशी नजर न मिळवणे, चाचरत, अडखळत बोलणे आणि खरे जग आणि कल्पनेतले जग यातल्या सरमिसळीने हताश, उद्विग्न होऊन हिंसक होणे हे अभिनयाची 'केस स्टडी' म्हणून बघावे असे आहे. आधी खेळकर, हसरा असणारा, बहिणीचे लाड करणारा शेष, हळूहळू मानसिक आजाराच्या विळख्यात असहाय झालेला शेष, हतबलपणे 'माझ्या डोक्यात कसंतरी होतंय' असं म्हणणारा शेष आणि सीनाच्या घरी चाललेल्या पार्टीत 'किस चीज का पेटंट लोगे तुम? व्हॉट डू यू नो अबाऊट बायोडायव्हर्सिटी?' म्हणून थैमान घालणारा शेष.... त्याच्या दुखण्याच्या भीषण स्वरुपाला त्याचा लहान भाचा घाबरतो आणि 'माझी पुस्तकं फाडू नकोस..' असं ओरडत आपल्या आईकडं धावतो, तेंव्हा गोंधळलेला, कोसळलेला शेष 'फाडत नाहीये, फाडत नाहीये..' असं फाटक्या आवाजात किंचाळतो आणि आपलं मन त्याच्या विषयी कणवेनं भरून येतं. एकदा टॉयलेटमध्ये असताना त्याचा विलक्षण गोंधळ होतो. आपण आहोत नक्की कुठे? घरी? देवराईत? कधीकधी भानावर असताना आपल्या लहान बहिणीचा हात हातात घेऊन शेष कापऱ्या आवाजात म्हणतो, 'तुला किती त्रास...आई नाहीये... कुठं जाणार मी?' आणि आपल्या डोळ्यात त्याच्याविषयीच्या सहानुभूतीनं पाणी येतं. रुग्णांच्या एका मीटींगमध्ये तो बोलताबोलता एकदम फुटतो, हा प्रसंग तर अंगावर काटाच आणतो.त्याचा त्याच्या भाच्याबरोबरचा (बाल कलाकार आश्विन चितळे) एक प्रसंग आहे. टेबलाशी बसलेला अतुल पाण्याच्या घोटाबरोबर गोळ्या घेत असतो. खेळून दमलेला, घामेजलेला त्याचा लहानगा भाचा टेबलाशी येतो. दुसरा पेला उचलून पाणी घ्यायला लागतो. अतुल काही न बोलता त्याला आपल्या हातातला पेला देतो. संपूर्ण प्रसंगात एकही संवाद नाही, पण यातून अतुलचे हळूहळू बरे होणे, आपल्या आसपासच्या लोकांबद्दलचे भान येणे स्पष्ट होत जाते.

'देवराई' चे दुसरे बलस्थान म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने साकारलेली सीना ही अगदी साधी मुलगी आहे - 'गर्ल नेक्स्ट डोअर' म्हणतात तशी. साधी पण चांगली मुलगी. शेषवर तिचा जीव आहे. तिच्या लग्नात शेष असाच डोक्यात राख घालून निघून गेला, अगदी तिच्या अक्षदांच्या वेळीही आला नाही - या त्याच्या चमत्कारिकपणावर ती आईजवळ रडलीही; आई गेल्यावरही शेष विक्षिप्तपणानेच वागला, पण यातले तिने काही मनात ठेवलेले नाही. शेषच्या आजारपणात त्याच्याकडे आणि आपल्या संसाराकडे लक्ष देता देता तिची तारांबळ उडते. त्यातून शेषला काय झाले आहे, हे तिला धडपणे कळतही नाही. संसाराकडे, विशेषतः आपल्या मुलाकडे तिचे दुर्लक्ष होते आहे, असे म्हटल्यावर तिचा नवरा वैतागतो. या सगळ्या कात्रीत सापडलेली सीना सोनाली कुलकर्णीने जिवंत केली आहे. तिचीही देहबोली अतुल कुलकर्णीइतकीच प्रभावी आहे. शेष हॉस्पिटलमध्ये असताना सेमिनारसाठी टूरवर गेलेला तिचा नवरा आल्याआल्या ग्लास घेऊन टीव्हीसमोर बसतो, तेंव्हा तिने म्हटलेला 'शेष कसा आहे हे विचारावं पण वाटलं नाही ना तुम्हाला?' हा तर अगदी घराघरात ऐकू येणारा संवाद. ' आता माझा भाऊ आहे, मग तुम्ही म्हणाल ते ऐकून घ्यायलाच पाहिजे मला' हाही तसाच एक संवाद. हे, आणि इतर सगळेच संवाद सोनालीने असे म्हटले आहेत, की ती खरोखर भावावर माया करणारी बहीण वाटते. आपल्या सगळ्यांच्या बहिणीसारखी, किंवा आपल्याली जशी बहीण असावी असे वाटते, तशी. बरा होत आलेला शेष पुन्हा विचित्र बोलायला लागतो, तेंव्हा 'अहो, बघा ना हा कसं बोलतोय...' म्हणून नवऱ्याच्या कुशीतले तिचे ढसाढसा रडणे मनावर एक चरचरीत ओरखडा काढते. शेवटी शेषला आणि कल्याणीला गावी सोडताना ती त्याला म्हणते, 'शेष, कल्याणी आपल्यापेक्षा लहान आहे. तिला सांभाळशील ना? तिच्यावर माया करशील ना?' तिच्या व्यक्तीरेखेतला हा समजूतदारपणा हे लेखकाचे यश आणि ती जे बोलते, ते अगदी मनापासूनचे, खरे वाटते, हे सोनालीचे.

तुषार दळवी हा नट एक माणूस म्हणून सुसंस्कृतच दिसतो. अमेरिकेत शिकून आलेल्या रसायनशास्त्रज्ञ डॉ. सुदेश गोरेची भूमिका त्याने समजून केली आहे. हा सीनाचा नवरा. सुरुवातीला शेषबद्दलचा त्याचा तुटकेपणा हळूहळू निवळत जातो. हा बदल तुषारने फार छान दाखवला आहे. एकंदरीतच सगळ्या प्रकारांनी त्याला आलेला अस्वस्थपणा फटाफटा टीव्हीवरची चॅनल्स बदलण्यासारख्या कृतीतून दिसतो. (त्यातही 'है सबसे मधुर वो गीत' हे गाणं एका चॅनलवर आल्यावर तिथं तो थोडासा थबकतो, हा दिग्दर्शनाचा आणखी एक बारकावा)' सगळा समाजच स्किझोफ्रेनिक झालाय' हे त्याचे फ्रस्ट्रेशन तर पटतेच.

देविका दफ्तरदार या गुणी अभिनेत्रीला फक्त अशाच भूमिका का मिळातात कुणास ठाऊक! (तिची दुसरी एक छान भूमिका म्हणजे 'नितळ' मधली) तिने 'कल्याणी समजून केली आहे. आता सोनालीपुढे ती थोडी फिकी वाटते खरी, पण अशी तुलना करणे काही योग्य नाही.

मनोविकारतज्ञाच्या भूमिकेत डॉक्टर मोहन आगाशेंना 'होम ऍडव्हांटेज' मिळाला आहे ('देवराई' तली त्यांची भूमिका बघून त्यांना किती नवीन पेशंट मिळाले, हे त्यांना कुणीतरी एकदा खाजगीत विचारले पाहिजे!). मनाचे क्लिष्ट व्यापार सोनालीला समजावून सांगताना त्यांच्या हाताच्या हालचाली पाहाव्यात. सामान्यतः भारतीयांना हाताच्या प्रभावी हालचाली करता येत नाहीत. डॉक्टरांनी या बाबतीत एक छोटीशी शिकवणीच घेतली आहे. ज्योती सुभाष, रमा जोशी यांच्या भूमिकाही सुरेख. अमृता सुभाषच्या जागेवर बाकी कुणीही चालले असते.

'देवराई' चे संवाद नुसते ऐकू नयेत, ते अभ्यासावेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात असे संवाद ऐकायला मिळत असत.(उदा. 'मुंबईचा जावई' चे संवाद) शेषच्या आजाराची माहिती देताना सीना डॉक्टरांना सांगते, 'आई कधीकधी चिडली की म्हणायची, तू तुझ्या वडिलांसारखाच माथेफिरू आहेस म्हणून. पण बायकांना असं बोलायची सवयंच असते ना, त्याचा काही शब्दशः अर्थ घेता येणार नाही....' समुद्राच्या लाटांकडे टक लावून तासनतास बघत असलेल्या शेषला कल्याणी विचारते, 'कुठलं जग बघत असतोस रे तू? या जगाच्या पलीकडलं? काय दिसतं तुला तिथे?'
पण हे असं लिहिण्यात काही अर्थ नाही. मी वर म्हटलं आहे तसंच. संवाद अभ्यासावेत.

नाही हाकारा, पण उठले रान
घरटे समोर, सापडेना वाट
बेभान पाखरु, समजेना कोणा
का कल्लोळ कल्लोळ
का कल्लोळ कल्लोळ

आहे आग, नाही राख
रक्त रक्त, नाही बाण
पारधी पारधी, बेभान पाखरू
समजेना कोणा का कल्लोळ कल्लोळ

आहे वस्ती, नाही सखा
घर आहे, बंधू नाही
एकटे एकटे, बेभान जग
पाखरा कळेना का कल्लोळ कल्लोळ

एका वाटसरे, पसरले बाहू
हलकेच घाली, पाखरा पाखर
हाताला टोचे, वाहे डोळा पण
पण ओठा हसू, वाटसरे

जंगल जंगल, आक्रंदे पाखरू
खुषीतही
हलकेच त्याच्या, कानी कुजबूज
वाटसरू त्याला, दावे देवराई

या सुरेख, अर्थपूर्ण कवितेने 'देवराई' संपतो. (ही कविताही अतुल कुलकर्णीचीच!) पडद्यावर जिथे चित्रपट संपतो, तिथे तो प्रेक्षकाच्या मनात सुरू झाला पाहिजे हे वाक्य अगदी 'क्लिशे' झाले आहे, पण 'देवराई' च्या बाबतीत हे घडते. ज्याचे पाऊल तुमच्या पावलाच्या शिस्तीत पडत नाही त्याचा स्वतःचा असा वेगळा ताल असू शकतो, या अर्थाचे थोरोचे एक वाक्य आहे. 'देवराई' बघून ते खरे असावेसे वाटते.

काहीकाही पुस्तके, काही गाणी, काही चित्रपट कायम हाताशी राहावेत, असे वाटते. 'जगमगाती जागती सडकोंपे आवारा फिरुं' हे ऐकावेसे वाटले की लगेच ऐकता आले पाहिजे. 'अरे बाळ यंकट, एक विचारायचंच इसरले, लगीन केलंस का?' हे आठवलं की दुसऱ्या मिनिटाला ही 'माणसं' डोळ्यापुढे पाहिजेत. 'व्हय, ठेवलाय वाड्यावर. पर तुमी गुमान ऱ्हावा, सांगल तेवडंच करा. जावा, म्हेनतीला जावा' हा सज्जड दम मनात आला की पडद्यावर आणता आला पाहिजे. 'देवराई' हा असाच एक चित्रपट आहे. मनोरुग्ण आणि पर्यावरण यांबाबत ज्यांना थोडी का होईना, संवेदना आहे, त्यांच्यासाठी 'देवराई' पाहणे ही आवश्यक गोष्ट आहे, असे मला वाटते. ज्यांना अशी संवेदना नाही, त्यांच्यासाठी अत्यावश्यक.

Post to Feedउत्तम रसग्रहण
प्रेक्षक
मस्त
असेच
सहमत
तात्काळ
जरूर पाहीन (आणि एक विनंती)
उत्तम रसग्रहण
मन मांडता मांडता ...
सुंदर
उत्तम चित्रपटाचे मार्मिक रसग्रहण
असेच
उत्तम रसग्रहण
सुरेख .............
सोनाली कुलकर्णी
चित्रपटाचा आस्वाद
सहमत
खूप सुंदर...
थोडंसं विषयांतर...
खाला
पर्यावरणावरचा चित्रपट
'अ ब्युटिफुल माईंड'
अतिशय सुंदर

Typing help hide