गझल

अजून आहे ठरायचे, उरायचे की सरायचे
इथे न डोळ्यांस ओलही, कसे कुणी मग मरायचे ?

वेदनाच आयुष्याला, जडवायाचा सोस जुना
वादळास या प्रेमाच्या, उरी कशाला भरायचे ?

तुझ्या नि माझ्या नात्याला, नाव दिले जर नाजुकसे
शब्दांच्या पलिकडल्या त्या, क्षणांस कैसे स्मरायचे ?

एकरूपल्या श्वासांचे, काळजात गोंदण आहे
अंतर दोनच हातांचे, परके कां मग ठरायचे ?

कां शेरातून शेवटच्या, करावीस मैफल हळवी ?
शब्द अनावर झाले तर, ओठ दाबुनी धरायचे

त्यागाच्या प्रत्येक क्षणी, दात अजुन रुततो ओठी ?
'आनंद' तुला ना जमले, आइसारखे झरायचे