गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू


प्रस्तावना

गंपू ही एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची असामान्य कथा आहे.मात्र "गंपूच्या चारित्र्यामध्ये कृष्णाची झलक पाहायला मिळते व बरेचसे प्रसंग कृष्णाशीच संबंधीत असल्यासारखे वाटतात" असा माझ्या विरोधकांनी सूर लावला आहे. पण असल्या कारवायांना मी भीक घालणार नाही.ज्या पुस्तकाच्या एका आठवड्यात वीस हजार प्रती खपाव्या त्या पुस्तकाबद्दल विरोधकांचा जळफळाट होणे हे साहजिकच आहे. त्यामुळे त्यांचा हा विरोध मी माझ्या यशाची पहिली(दुसरी आणि तिसरी) पायरी मानून चालत आहे,चालतच आहे आणि चालतच राहणार आहे.

गंपूचा उल्लेख

गेल्याच महिन्यात पुण्यात झालेल्या अखिल ताडीवाला रोड साहित्य संमेलनात या कादंबरीचा "असामान्य व्यक्तिमत्त्वाची व्यथा जनसामान्यांसमोर मांडणारे विद्रोही साहित्य" म्हणून विशेष उल्लेख करण्यात आला("मात्र विरोधकांनी त्यात विशेष काही नव्हते" अशी टिका केली होती.) शिवाय मार्केट यार्ड साहित्य परिषदेतर्फे "गंपू आणि भारतीय व्यापार" हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.(त्यातही विशेष काहीच नव्हते अशी पुनश्च टिका झाली)

गंपूबद्दल काही-थोरांची मते

"गंपू हा आधुनिक विचारांच्या तरुणांचा प्रतिनिधी बनून रूढ परंपरांवर घणाघाती हल्ला करणारा नवनायक आहे"--श्री. पा.द.लेले(ज्येष्ठ साहित्यिक व अध्यक्ष प्रभातनगर ज्येष्ठ नागरिक संघ)
"गंपूच्या ह्या असामान्य प्रवासाची तुलना सिंदबादच्या सफरींशीच करता येईल." --श्री. का.रे.बोले(साहित्यिक व खजिनदार : हिंदू कॉलनी भ्रमण मंडळ)
"गंपूरावांसारख्या माणसाची आज ग्रामीन समाजाला गरज ह्ये.आम्ही त्यांना आव्हान कर्तो की त्यांनी आम्हाला सामील व्हावे."--श्री.झुंजारराव तुळपुळे(आमदार व संस्थापक-अध्यक्ष: ग्रामीण साक्षरता भियान)

टीप प्रस्तुत लेख हा 'गोखूळवाडी बुद्रुकचा गंपू 'या कादंबरीचा संक्षिप्त परिचय आहे.रसिक वाचकांनी पूर्णं कादंबरी घरपोच मिळविण्याकरिता कृपया श्री.ध.र. लेले किंवा श्री. मा.र.लेले(डेक्कन जिमखाना,पुणे) यांच्याशी संपर्क करावा.

माथेरानचा नगरसेवक कणसे पाटील याचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते.या ना त्या विकासनिधीत फक्त त्याच्या एकट्याचाच विकास होत होता.गेली पंधरा वर्षे नगरसेवकपदी असूनही वॉर्डासाठी तो काहीच करायला नव्हता.विरोधक ही त्याच्याकडे असलेल्या गुंडांची फौज पाहून मूग आणि जे काही मिळेल ते गिळून गप्प बसले होते.भ्रष्टाचार करून गडगंज संपत्ती मिळवूनही त्याची पैशाची भूक काही भागायला तयार नव्हती.आपले राजकीय आणि आर्थिक सामर्थ्य वापरून नुकतीच त्याने विधानसभेची उमेदवारीही पदरात पाडून घेतली होती,यामुळे त्याची पाच गुणिले चार बरोबर वीसही बोटे तुपात होती.अशातच एक दिवशी कणसेची एकुलती एक लाडकी बहीण देवयानी हिच्यासाठी माथेरानातच राहणार्‍या वासूअण्णा जाधव यांचे स्थळ चालून आले.वासूअण्णा बर्‍यापैकी सधन होते.(तरीही हे स्थळ चालून का आले-गाडीने का नाही आले याबाबत संभ्रम आहे)दिसायलाही बर्‍यापैकी होते.(थोडे सावळे होते एवढंच) देवयानीवर त्यांचे लहानपणापासूनच प्रेम होते.कणसे पाटील जाधवांच्याच परिचयातला असल्यामुळे त्वरित होकार मिळाला.लवकरच चांगला मुहूर्त गाठून दोघांचे लग्न ठरले.वासूसारखे चांगले स्थळ बहिणीला मिळाले म्हणून कणसेला अपार समाधान लाभले होते.आणि देवयानीसारखी श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी(हुंड्यासकट) मिळाली म्हणून वासूअण्णाही खुशीत होते.लग्न समारंभ थाटात झाला.आणि साश्रु नयनांनी बहिणीला निरोप देत असतानाच नेमका कणसेच्या ज्योतिष्यांचा निरोप आला व तुमचा आठवा भाचा तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणू शकतो म्हणून भविष्यातल्या धोक्याची सूचना दिली.कणसे पाटील कमालीचा अंधश्रद्ध होता.आणि शिवाय आता आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर आपलाच भाचा वरवंटा फिरवणार म्हटल्यावर तो रागाने लालबुंद झाला..ज्या बहिणीला निरोप द्यायचा त्याच बहिणीला तिच्या नवर्‍यासकट त्यांनी हाय वे जवळ असलेल्या आपल्या गुटख्याच्या कारखान्यात कैद केले.देवयानीच्या बाळंतपणावर त्याने करडी नजर ठेवली.ती प्रसूत झाली की प्रत्येक वेळी तो तिचं पोरं नेऊन उकिरड्यावर सोडून यायचा.खरेतर तो वाट पाहत होता तिच्या आठव्या अपत्याची.जोपर्यंत स्वत:च्या हाताने तो देवयानीच्या आठव्या पोराला यमसदनिकेत पाठवत नाही तोपर्यंत त्याला चैन पडणार नव्हती.

वासूअण्णा आणि देवयानीही कमालीचे आशावादी होते.त्यांनी कच खाली नाही("यावरूनच त्यांचे कैदेतही खायचे प्यायचे वांधे नव्हते हे सिद्ध होते"-अभ्यासकांचे मत). दिवसांमागून दिवस गेले तसे देवयानीलाही पुन्हा दिवस गेले.तिची प्रसूतीची वेळ जवळ आली होती.कणसेही यावेळी निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त होता.आणि एक दिवशी देवयानी प्रसूत झाली.तिनं आपल्या आठव्या अपत्याला जन्म दिला.अनंत वेदना सोसूनही तिच्या चेहर्‍यावर समाधान झळकत होते.आपल्या नुकत्याच जन्मलेल्या पोराकडे देवकी आनंदाने पाहत होती."पोरगं रंगाने बापावर गेलं,आमच्या खानदानातली गोर्‍या रंगाची परंपरा याने मोडली"-देवकी मनातल्या मनात म्हणाली.पण रंगाने सावळा असला तरी त्याच्या चेहर्‍यावर वेगळेच तेज होते.डोळे बंद असल्याने त्या माउलीला त्याचे चमकदार डोळे पाहता आले नाहीत.आपल्या मुलाकडे असे कौतुकाने पाहत असताना अचानक ती भानावर आली.आपलं हे मूलही दादा कुठल्यातरी उकिरड्यावर टाकून देणार आणि आधीच्या पोरांसारखाच हा ही लावारीसच्या अमिताभसारखा भटकत राहणार?. तिच्या मनाला अनेक विचारांनी घेरले. "नाही...नाही!या मुलाला तरी वाचवायलाच हवे.आपल्या मातापित्यांच्या,भावांच्या छळाचा बदला घ्यायला तुला मोठा व्हावंच लागेल." तिने मनोमन विचार केला आणि वासूअण्णाला सांगितला.त्यांनीही तत्काळ होकार दिला. कारखान्याच्या मागच्या बाजूस मैलापाणी बाहेर जाते;त्या मोठ्या गटारातून वासू बाहेर पडला.मध्यरात्र उलटून गेली होती.मुसळधार पाऊस चालू होता.आसपास कुठे रिक्षाही दिसत नव्हती,बारा वाजून गेले असल्यामुळे रिक्षावाला हाफ रिटर्न मागणार हे त्याच्या चाणाक्ष मनाने ओळखले.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याजवळ पैसेच नव्हते,आणि आजकालचे रिक्षावाले जिथे रात्रीच्या पासिंजराला लुटायला कमी करत नाहीत ते एवढी माणुसकी कुठून दाखवणार.असा मनोमन विचार करून त्याने सरळ चालतच एस.टी. डेपो गाठला.खिशात पैसे तर नव्हते पण सकाळ उजाडायच्या आत त्याला गोखूळवाडी बूद्रूकला जाऊन परत यायचे होते. मनातल्या मनात देवाचे नाव घेत (कुठल्या देवाचे हे सांगायचे टाळल्यामुळे काही अभ्यासकांच्या टाळक्याने लेखकाची 'टाळभैरव' म्हणून हेटाळणी केली.मात्र लेखकाने त्यांच्या रटाळ बोलण्याकडे लक्ष देणे चाणाक्षपणे टाळले)तो गाडीच्या मागच्या बाजूची शिडी चढून टपावर जाऊन बसला.काही वेळाने गाडी हिंदकळत गोखूळवाडीकडे निघाली.चालून चालून दमल्यामुळे पोराला छातीशी धरून तो निश्चिंतपणे झोपी गेला.
पहाट झाली होती.ड्रायव्हरने करकचून ब्रेक मारीत गाडी थांबवल्यामुळे वासूअण्णाला जाग आली.अर्धवट झोपेतच त्याने आजूबाजूला नजर टाकली. गोखूळवाडी बुद्रुकचा बस डेपो आला होता. तो खाली उतरला.नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे हवेत चांगलाच गारवा होता.त्याने बाजूच्याच टपरीवर जाऊन चहा बिडी मारली आणि नंदू मानेच्या घराकडे निघाला.नंदू माने हा सुप्रसिद्ध माने डेअरीचा(गायीचे व म्हशीचे ताजे-सकस दूध मिळण्याचे तालुक्यातले एकमेव ठिकाण) संस्थापक-चालक व वासुआण्णाचा मित्र विष्णूबुवा शेषनागपूरकर याचा आतेभाऊ होता.विष्णूबुवांमुळे तो वासूच्याही चांगलाच परिचयाचा झाला होता.नंदू निपुत्रिक होता.आपल्याला मूल नाही या विचाराने त्याची पत्नी येसूबाई सारखी आजारी असायची.पहाटेची वेळ असल्याने नंदू गोठ्यात गाई-म्हशींच्या धारा काढत बसला होता.वासूअण्णा सरळ घरात गेला.आणि त्याने आपल्या पोराला आजारी येसूबाईच्या बाजूला झोपवले आणि नंदूला काही न बोलताच परत कारखान्यावर गेला.आपलं मूल कुठे आहे हे काही त्या दोघांनी(लाथा खाऊनही) कणसेला कळू दिले नाही. ज्योतिष्याच्या सांगण्यावरून नाही नाही त्या खटपटी करूनही कणसे निवडणूकीत दणकून आपटला.म्हणून त्याने ज्योतिष्याच्या पार्श्वभागावर लाथा घालीत त्याला हाकलून दिले.आणि शेवटी वैतागून वासू आणि देवयानीलाही सोडून दिले.

इकडे इतकी वर्षे मूल नाही म्हणून कुठल्या कुठल्या देवांना नवस करणारे माने दांपत्य घरात मूल सापडल्याने आनंदून गेले.त्यांनी नवस फेडून देवाचे आभार मानले(नक्की कुठल्या देवाचा चमत्कार हे माहीत नसल्यामुळे ,सगळ्याच देवांचे विनाकारण फेडले-नवस)आणि पोराचं बारसं थाटामाटात केलं. आजूबाजूचे लोक त्यांना बरीच नावे ठेवीत पण त्यांनी मुलाचे नाव गणपत ठेवले. येसूबाई मात्र त्याला लाडाने गंपू म्हणत असे.लहानग्या गंपूच्या आगमनाने माने कुटुंब पूर्णं झाले.आणि नंदू मान्याने डेअरीवरचा 'माने डेअरी'चा(गा. व म्ह.चे ता.-स.दू.मि.ता.ए.ठि.) फलक काढून 'माने ऍन्ड सन्सचा' फलक चढवला.दिवसां मागून दिवस गेले.गंपू आता रांगू लागला होता.त्याच्या रांगण्यामुळे घर भरल्यासारखे झाले होते.मात्र गंपूच्या काही विचित्र सवयींमुळे येसूबाई फार चिंतीत होती.एकदा नंदूशेठच्या पलंगाजवळ ठेवलेल्या तंबाखूच्या बटव्यातली मूठभर तंबाखू गंपूने गिळली आणि मस्तपणे चावू लागला.येसूबाई घाबरली.तिला तर जणू आभाळ कोसळल्यासारखे झाले.तिने त्याच्या पाठीत रट्टा घालून त्याचं तोंड उघडलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला.गंपूच्या मुखात तिला साक्षात चंद्रदर्शन झाले व त्या दिवशी तिचा चतुर्थीचा उपवास असल्याने चंद्रदर्शनानंतर तिने लगेच उपवास सोडला.(टीकाकारांच्या मते येसूबाईला उपवास सहन न झाल्यामुळे तिने खोटे बोलून उपवास सोडला असावा तर काही अभ्यासकांच्या मते आपल्या मातेला उपाशी पाहवले गेले नाही म्हणून गंपूने मुद्दाम तांबूलभक्षण करून आपल्या दैवी शक्तीचा वापर करून चंद्रदर्शन घडवले असावे-अंनिसच्या मते -हा निव्वळ भास असावा).
पुन्हा दिवसांमागून दिवस गेले.एकदा बाजूच्याच कुणा एका इसमाची पुतणी (नावाबद्दल संभ्रम असल्याने पुन्हा एकदा खुबीने टाळले)जी शाळेला सुट्ट्या लागल्या असल्यामुळे गावी आली होती; खेळता खेळता येसूबाईच्या घरी आली.त्यावेळी येसूबाई पाणी भरायला विहिरीवर गेली होती(ग्रामपंचायतीच्या कृपेने तिथे जलवाहिनी पोचली नव्हती-पाहा गोखूळवाडी बुद्रुक ग्रामपंचायत- विकासकामांचा अहवाल ) आणि नंदू ही गोठ्यात म्हशींकडे लक्ष देण्यात गर्क होता. बाळ गंपू त्यावेळी आपल्या दुधाच्या बाटलीतील दूध पिण्यात गर्क होता. त्याचा हेवा वाटून त्या पुतणीने गंपूच्या हातातली दुधाची बाटली हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र बाळ गंपू बाटली सोडत नाही हे लक्षात आल्याने तिने गंपूला चापट मारली.यामुळे चिडून बाळ गंपू तिला चावला,तेव्हा गंपूच्या पाठीत धपाटा घालून रडत रडत ती तिच्या घरी गेली.पुढे काही दिवसांनी त्याचा साईड इफेक्ट होऊन ती पुतणी वारली. बाल गंपूचे बालपण अशाच अचाट चमत्कारांनी भरून वाहत होते.त्याच्या चमत्कारांचे वर्णन करायला शब्दसागरही अपुरा पडेल.

गंपू आता ब-यापैकी मोठा झाला होता.रंगानं सावळा असला तरी गोंडस दिसत होता,चाणाक्ष होता.नुकत्याच वयात आलेल्या पोरींच्या आकर्षणाचा तो केंद्रबिंदू ठरला होता.मोठ्यांच्याही लक्षात न राहणारी सिनेमाची गाणी गंपू आपल्या जिभेवर अलगद नाचवायला लागला होता. गोखूळवाडीतली बारीक सारीक पोरंही दिवसभर गंपूच्या मागे मागे पळत राहायची,प्रत्येक वेळी त्यांना गंपूच हवा असायचा.गंपू आपला खाऊ आपणच खायचा आणि वर त्यांचा खाऊ ही फस्त करायचा यावरूनच भविष्यात हा पोलिस खात्यात किंवा राजकारणात पडणार असा अंदाज नंदूने बांधला.दिवसभर दंगा मस्ती करण्यात,खोड्या काढण्यात आणि भरपेट जेवण करण्यात गंपूचे दिवस जात होते. शिवाय त्याच्या गोजिरवाण्या रूपामुळे गोखूळवाडीतल्या पोरीही त्याचे पटापटा पापे घेत असत.अल्पावधीतच गंपू गोखूळवाडीत पॉप्युलर झाला.सिनेमावाले बालकलाकाराच्या भूमिकेकरिता नंदू मानेच्या घराबाहेर रांग लावू लागले.मात्र गंपूचा जन्म असले ऐहिक सुख भोगण्यासाठी झाला नव्हताच मुळी त्याला आपल्या आई बाबांच्या(हल्लीच्या भाषेत मम्मी पपांच्या) आणि भावंडाच्या छळाचा बदला घेण्यासाठी जणू राखीव जागा देऊन विधात्याने पाठविले होते.(या घटनेमुळे यमलोकांतही आऊटसोर्सिंग चालू झाल्याचा काही धंदेवाईक लोकांना साक्षात्कार झाला असून; भविष्यातली बाजारपेठ म्हणून यमलोकाकडे पाहिले जात आहे-इति अभ्यासक) याचा प्रत्यय तो पदोपदी देत होता.एकदा गावाजवळच्याच माळरानात गंपू आणि मंडळी क्रिकेट खेळत होती.बाजूलाच असलेल्या नदीकिनारी कालिया नावाच्या गुंडाची दारूची भट्टी होती.गंपूने मारलेला बॉल एका भट्टीत पडल्यामुळे कालियाचे अंदाजे पाच हजार रु.चे नुकसान झाले.(पाहा: दै. पहाट-बातमीदार: श्री.स.दा.खोटे) या नुकसानीमुळे चिडून जाऊन कालियाने गंपूला नुकसान भरपाई म्हणून आपल्या पाच गाई कालिया ऍन्ड सन्सच्या पांजरपोळात जमा करण्याचा आदेश दिला मात्र गंपू आणि मंडळींनी हा आदेश झुगारून देत असहकार आंदोलन सुरू केले.यामुळे सहकारावर विश्वास असलेल्या कालिया व त्याच्या गुंडांनी गंपू आणि मंडळींवर हल्ला केला.(या हल्ल्याची जालियानवाला बागच्या हल्ल्याशी तुलना होऊ शकते-इतिहासकार श्री. का.ल.गोरे व श्री. आ. ज. काळे)त्यावेळी हातात असलेल्या बॅटने कालिया ऍन्ड कंपनीला गंपू ऍन्ड कंपनीने चांगलेच प्रत्युत्तर दिले.या घटनेमुळे गोखूळवादीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले व शेवटी कालियाला पोलिसांकडून अटक झाली.पोलिस ठाण्यात त्याची चांगलीच धुलाई झाली.शिवाय त्याच्यावर मोका कायद्याअंतर्गत खटला भरण्यात आला.या घटनेचा दूसर्‍या दिवशी सगळ्याच आघाडीच्या वृत्तपत्रांनी 'कालिया मर्दन' म्हणून उल्लेख केला.

गंपूचे नाव आता पंचक्रोशीत गाजू लागले होते.शिवाय आता तो ऐन जवानीत येऊ लागल्याने गावातल्या सगळ्याच तरुणींच्या आणि त्यांच्या चिंताग्रस्त आईबापांच्या चर्चेचा मुख्य विषय होता. गंपूने साधी विजार घातली तरीही गावातील पोरे 'लेटेस्ट फॅशन' म्हणून त्याचे अनुकरण करीत होती. येता जाता गावातल्या सगळ्याच तरुणी गंपूच्या कॉमेंट्सच्या शिकार होत होत्या,आणि त्यातच धन्यता मानत होत्या.गंपू पोरींचे माठ गिलोरीने फोडत असे,यामुळे गावात तरुणींकडून पितळी व तांब्याच्या हंड्यांची मागणी घसरली व मातीच्या माठांचे भाव वधारले.(याच कारणास्तव मागच्या महिन्यातील कुंभारवाडा टाईम्सच्या मुखपृष्ठावर गंपूचे छायाचित्र झळकले व गंपूचा 'उद्योगशील तरुण' म्हणून विशेष उल्लेख करण्यात आला.)अंदरकी बात म्हणजे मागच्या वर्षीची 'मिस गोखूळवाडी बुद्रुक' ठरलेली व त्यानंतर घरच्यांच्या बळजबरीने त्याच गावात लग्न झालेली सौ. प्रेमलता उर्फ राधिका विश्वासपुरेचा गंपूवर खास जीव होता.गंपूलाही ती आवडत होती.मात्र जालीम जमान्यापुढे त्याचे काही चालले नाही.तरीही तो तिला चोरून माळावर भेटायचाच.'गोखूळवाडी बुद्रुक आयडॉल' च्या अंतिम फेरीत गंपूने पाव्यावर वाजवलेले 'जब हम जवॉं होंगे' हे गाणे प्रेमलताला उद्देशून असल्याची जोरदार चर्चा आहे.

क्रमशः

-इनोबा म्हणे (inoba.blogspot.com)