पधनीसारे

'पधनीसारे' चा कार्यक्रम सुरू झाला होता. निवेदिका सांगत होती. " हल्लीच्या मुलांना ध,नी आणि वरचा सा हे ठाऊकच नसतं अशी आमच्यावर टीका होऊ लागली म्हणून आम्ही कार्यक्रमाचे फक्त नांव बदलले आहे, बाकी स्वरुप आधीचेच राहील. सध्या आपण ४५ वरच्या वयाच्या स्पर्धकांना संधी देत आहोत. त्यानंतर यातल्या विजेत्या स्पर्धकांना परीक्षक करून आत्ताच्या परीक्षकांची स्पर्धा घेण्याचा विचार आहे." यावर एकही टाळी न पडल्यामुळे निवेदिकेने हक्काने टाळ्या पाडून घेतल्या. आजच्या भागात, एका महान संगीतकार व गायकाच्या रचना म्हणायच्या होत्या. त्यामुळे तो महान संगीतकार हा गायक म्हणून श्रेष्ठ होता की संगीतकार या विषयावर निवेदिकेने एक चतुर भाष्य केले. शेवटी दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ होते व स्वतःचे संगीत असताना स्वतःच ते गायचे तेंव्हा 'दुधात साखर' असे काही नेहमीचे संवाद म्हणून तिने परत एकदा टाळ्या घेतल्या.
                 पहिले स्पर्धक एक उतारवयाचे सज्जन गृहस्थ होते. त्यांनी खरोखरच छान गाणे म्हटले. तसे ते एकदा थोडे सुरांत घसरले होते किंचित, पण वयाच्या मानाने उत्तम गायले. गाणे संपल्याबरोबर निवेदिकेने त्यांचा ताबा घेतला. "कसं वाटलं तुमचं गाणं ?" आता या प्रश्नावर काय उत्तर देणार ? मी असतो तर " मला काय विचारता ? त्या परीक्षकांना विचारा" असा फटकळपणा दाखवला असता. पण ते गृहस्थ सज्जन असल्यामुळे त्यांनी 'बरं वाटलं,' असं सावध उत्तर दिलं. नंतर थोड्या जुजबी संभाषणानंतर गाडं परीक्षकांकडे वळलं.
               पहिले परीक्षक तरुण पण मोठे धोरणी वाटले. पुलंच्या भाषेत त्यांना भारताच्या परराष्ट्रखात्यात सहज नोकरी मिळाली असती!
" सुंदर, गळ्यांत आवंढा आला माझ्या! काय निष्पापपणा आहे हो तुमच्या आवाजांत! मला तर सर्वात तोच 'भावला'.(हा शब्द मागे एकदा हृदयनाथांनी वापरल्यापासून फारच 'वापरला' जातो. त्यामुळे तुम्ही स्वतः फार उच्च कोटीतले आहात असे सर्वांना वाटू लागते की काय ,न कळे! असो.) मग बोलता बोलता त्यांनी आपले आप्तही उत्तम कलाकार असल्याचे खुबीने संगून टाकले. बेसुर झाल्याचा उल्लेख मात्र त्यांनी कटाक्षाने टाळला.
             दुसऱ्या परीक्षक आधी कांही न बोलताच नाकाला चुण्या पाडून मिष्किल हंसल्या. म्हणाल्या, " छान गाता तुम्ही, बरेचसे भाव आणण्याचा प्रयत्न चांगला केलात तुम्ही, पण अजून पुष्कळ सुधारणेला वाव आहे." (मनांत आलं, यांना सांगावं, तुम्हाला तर तुमच्या उमेदीच्या काळातच हे कोणीतरी सांगायला हवं होतं! असो.)
            तिसरे परीक्षक हे प्रथितयश गायक होते. त्यांनी एकदा त्या स्पर्धकाकडे रोखून पाहिलं अन उदगारले, ' सुंदर, अतिसुंदर!!! मला क्षणभर आपण रामानंद सागरचे रामायण पाहत आहोत असा भास झाला. एकूण त्या गाण्याचे संगीताच्या दृष्टीकोनातून विश्लेषण कोणीच केले नाही.
           नंतर दुसरे स्पर्धक आले. त्यांनी सुरवात तर झकासच केली. पण कडव्यांमध्ये ते इतके बेसूर झाले की एकदोन परीक्षकांचा कानावरचा हेडफोनच घसरला. पण प्रत्यक्षांत गाण्यानंतर तेच संवाद, छानछान म्हणणं वगैरे वगैरे! नंतरच्या सर्वच स्पर्धकांना कमीअधिक याच मापाने तोलण्यात आले. मला तर कळेचना, इतके मुरलेले परीक्षक! मला जर कोणी बेसूर होताना कळते तर यांना ते जाणवले नाही हे शक्यच नाही. तर त्याबद्दल कांहीच न बोलता भाव, शब्दोच्चार या इतर गोष्टींवरच भर देण्यात आला.
          सर्वात शेवटी माझा नंबर आला. निवेदिकेच्या निरर्थक प्रश्नांना मीही तितकीच निरर्थक उत्तरे दिली. खरं तर मी एखादे हळुवार भावगीत गाणार होतो. पण सगळ्यांचेच भाव कमी पडत असल्याचे पाहून मी आयत्या वेळेला, ' माता न तू वैरिणी' हे गाणे म्हणणार असल्याचे जाहीर करताच प्रेक्षकांतून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आला. गाणे म्हणताना मी मूळ गायकापेक्षाही जास्त त्वेषाने घसा खरडून म्हटले. गाताना मी इतका तल्लीन झालो होतो की सगळे कानात बोटे घालून बसले होते हे मला दिसलेच नाही. परीक्षकांनी तर म्हणे टेबलाखाली दडी मारली होती.(असे नंतर कळले)
गाणे संपताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. निवेदिकेने विचारले," कसं वाटलं तुम्हाला तुमचं गाणं ?" "छानच झालं असणार कारण टाळ्या तर तुम्ही ऐकल्याच आहेत. मी स्वतः गाताना इतका तल्लीन असतो की मला आजुबाजूचे कांही दिसेनासे होते." मी उत्तरलो. " क्या बात है, यावर एकदा टाळ्या होऊन देत" इति निवेदिका. मग बोलू लागले आपले पहिले परीक्षक.
"तुमच्या गाण्याला नक्की काय म्हणावं तेच मला कळत नाही. ते शब्दांत सांगताच नाही येणार." असे म्हणून त्यांनी तोंडाला पाण्याचा ग्लास लावला.
दुसऱ्या परीक्षक कसलेल्या अभिनेत्री असाव्यात. त्या नुसत्याच कोपरापासून हात जोडून हंसत राहिल्या. त्यांच्या या अदेलाच टाळ्या पडल्या. म्हणाल्या, " मी यांच्याशी शंभर टक्के सहमत आहे.
तिसऱ्या परीक्षकांना मात्र क्रोध आवरेना. " तुमचे गुरू कोण ? अशी गाणी म्हणताना सूर टिकवणं शक्य तरी आहे का ? तुमच्या नुसत्या शब्द आणि भावाच्या अतिरेकानेच आम्ही अर्धमेले झालो! त्यांत सूर शोधता शोधता मेंदुचा भुगा झाला."
क्षणभर शांतता पसरली. मग मीच मोठ्ठ्याने टाळ्या वाजवायला सुरवात केली. सगळेच गोंधळले. मी माईकचा कब्जा घेतला.
" तुम्ही तिघेही थोर कलाकार आहात. मला तुमच्याविषयी खूप आदर आहे. तरी मी हे मुद्दाम केले. कारण मला कोणाच्या तरी तोंडातून सत्य ऐकायचे होते. ते साध्य झाले. मला तुम्ही शून्य गुण दिले तरी हरकत नाही." मी स्लो मोशन मध्ये खाली उतरलो.(सिरियल्स बघण्याचा एवढा तरी परिणाम होणारच ना!)
               जागा झालो तर घरातलेच सगळे माझ्याभोवती जमा होऊन आश्चर्याने पहात होते. असो.