वाट

सांज किंचित किर्र काळोखात जाता
कोण घाली या मनाला धाक आता?
दूर रानातून येते हाक आता

पावले जाती कुणाच्या मागुनी ती?
की खुणांचा माग घेती जागुनी ती?
वाजते हे काय पाचोळ्यात आता?
हे कुणाचे पाय पाचोळ्यात आता?

का, कुणासाठी अशी ही आर्त गाणी?
गात असते सावळ्या डोहात पाणी
या कुणाच्या चाहुली अन हालचाली?
का दरीतुन धुमसतो अन धूर खाली?

भास-सत्याची अनोखी पुसट रेषा
जाणुनी घ्यावी कशी संकेतभाषा?
पण हवीशी वाटते रानार्त खोली
का अताशा सुखविते अंधारबोली ?

सांज आता पूर्ण अंधारात गेली
एकट्याने चालण्याची वेळ झाली
भय न उरले, ना कुणाचा धाक आता
फक्त अंधारात दिसते वाट आता!

सारंग