बॆंक ऑफ महाराष्ट्र, गुलबकावलीचे फूल आणि नानजकर

प्रास्ताविक: 'माणूस, बेडूक आणि उप्पीट्टम' या थाटाची ही न-नवकथा वगैरे नाही.
एका सामान्य माणसावर ओढवलेल्या प्रसंगाचे हे (प्रत्ययकारी वगैरे) चित्रण आहे.
 अगदी गुलबकावलीच्या फुलासकट यातली सर्व पात्रे व प्रसंग खरे आहेत. ते तसे न वाटल्यास ती लेखकाची आणि त्याच्या लेखनसामर्थ्याची मर्यादा समजावी.

झाले काय, की काही वर्षांपूर्वी मी एका खाजगी कंपनीत कामाला लागलो होतो. त्या काळाच्या मानाने पगार बेताचाच होता, पण भविष्यकाळ उज्वल आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. तो तसा फारसा उज्वल वगैरे निघाला नाही, पण तो मुद्दा नाही.

त्या कंपनीत वाईकर नावाचे एक गृहस्थ होते. फावल्या वेळात ते इन्शुरन्स एजन्सी, पब्लीक प्रॉव्हिडन्ड फंडाची एजन्सी असले बरेच व्यवसाय करत. पण माणसांना मरणाची आणि वहानधारकाला अपघाताची भीती घालून त्यांचा विमा उतरवणे हा त्यांचा आवडता जोडधंदा. माणूस वृत्तीने फेव्हिकॉल तयार करणाऱ्या कंपनीने जाहिरातीत मॉडेल म्हणून वापरावा, इतका चिकट. त्यांची ही ख्याती जगजाहीर असल्याने मे बरेच दिवस त्यांच्यापासून जपून होतो. पण कसले काय, एक दिवस त्यांनी मला त्यांच्या स्कूटरवरुन लिफ्ट दिली आणि त्या चारपाच किलोमिटरच्या प्रवासात एवढे काही ऐकवले की 'भीक नको पण कुत्रा आवर' या न्यायाने मी त्यांच्याकडून पीपीएफ चे एक खाते उघडायला राजी झालो. 'मला कुणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, पण ज्यांनी बेल्जियम सैनिकांनी वापरलेले संडास पाहिलेले नाहीत, त्यांना मी म्हणेन, की जगात तुम्ही काहीच पाहिलेलं नाही' असं वुडहाऊसनं लिहिलेलं आहे. त्याच धर्तीवर 'ज्यांना छळ म्हणजे काय हे माहिती नाही, त्यांना आजवर कधीही एखाद्या संध्याकाळी एखादा इन्श्युरन्स एजंट भेटायला आलेला नाही' असंही कुणीतरी म्हटलेलं आहे. तर ते असो. वाईकरांनी उत्साहाने सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि मी ते खाते उघडले. नाही नाही म्हणता त्यात इतक्या वर्षांत काही रक्कम जमा झाली. दरम्यान मी ती नोकरीही सोडली आणि आता लहानसहान व्यवहारांसाठी मला बॆंक ऑफ महाराष्ट्रच्या त्या वाईकरांच्या घराशेजारच्या शाखेत, इतक्या दूर काही जायला जमेना. बरे, आता वाईकरांना भेटणेही अवघड झाले होते.  मग महत्प्रयासाने मी मीझे ते खाते माझ्या घराशेजारच्या शाखेत गेल्या वर्षी बदली करुन घेतले.

या महिन्यातली गोष्ट. सहज विचार आला, की या खात्यावर इतकी वर्षे आपले पैसे पडून आहेत, त्यातले काही काढता येतात का बघू.  'आजच्या तारखेपासून पाच वर्षे आधी पीपीएफच्या खात्यावर जितकी रक्कम असेल, त्यातली निम्मी काढता येते' वाईकरांची सूचना आठवली.

बँकेत गेलो. प्रचंड गर्दी होती. 'पीपीएफ' असे काही कुठल्या खिडकीवर लिहिलेले नव्हते. अंदाजाने 'डिपॉझिटस' असे लिहिलेल्या खिडकीसमोरील एका रांगेत उभा राहिलो. पाचदहा मिनिटांनी खिडकीतून माझे पासबुक आत सरकवले. आतल्या सज्जनांना माझी इच्छा सांगितली. त्यांनी समोरच्या संगणकावर काहीसे केले आणि स्वत:शीच नकारार्थी मान हलवली. अशा प्राथमिक प्रतिक्रियांना मी आता भीत नाही. कुठलीही बॆंक, सरकारी कार्यालये इथे पहिली प्रतिक्रिया अशी नकारार्थीच असते. आपल्याला जे करायचे आहे, ते कसे करता येणार नाही, हे अशा कार्यालयात गेल्यागेल्या आधी समजून घ्यायचे असते.
"नाही..."
"काय?"
"नाही..."
"काय नाही?"
"पैसे नाही काढता येणार तुम्हाला"
"का?"
"अहो, अकाऊंट उघडून पाच वर्षं व्हायला लागतात..."
"मग झाली की पाच वर्षं. एकोणनव्वद सालचं आहे अकाउंट.."
"इथं तर गेल्या वर्षीची एन्ट्री आहे.."
"अहो, ती ट्रान्स्फर आहे, हे बघा, आधीचं पासबुक.."  
"बघू"
सज्जनांनी ते पासबुक बघीतले. त्यांची मुद्रा चिंताग्रस्त झाली. त्यांनी परत त्या संगणकाची थोडी मनधरणी केली.
 दरम्यान रांगेत माझ्या मागे थोडी चुळबूळ सुरु झाली होती.
"गेल्या वर्षी अकाउंट उघडलंय, असं म्हणतोय तो..."
"कोण तो?"
"कॉम्प्युटर.."
"अहो कमाल करताय तुम्ही! मी अकाऊंट उघडलंय, तुम्हाला पासबुक दाखवतोय, कॉम्प्युटरचा काय संबंध इथे?"
"अहो, तो तसा प्रोग्रॅम फीड केलेला असतो... एक मिनिट हं.."
मग सज्जन उठून मॅनेजर बाईंच्या टेबलाशी गेले. बाई कामात होत्या. आता मागच्या रांगेचे प्रेशर जाणवून मी जरा अस्वस्थ झालो होतो.
 तेवढयात मागच्या गृहस्थांनी खांद्यावर टकटक केले.
"पीपीएफ मधून पैसे काढताय का?"
"हो.." आता पीपीएफ मधून स्वत:चे पैसे काढणे ही काहीतरी अनैतिक गोष्ट असल्यासारखे मला वाटू लागले होते.
"माझं ऐका, नका काढू.."
"आं?"
"ओन्ली ऍन ऍडव्हाईस. पण पीपीएफ एवढी सेफ इन्व्हेस्टमेंट नाही दुसरीकडे कुठे. शेअर मार्केट तुम्ही बघताच आहात..."
मी खरंतर मॅनेजर बाईंच्या टेबलाशी उभे असलेल्या त्या सज्जनांकडे बघत होतो. खांद्यावर पुन्हा टकटक झाली.
"माझं एक ऐका.."
आता हा माणूस "चार घास खाऊन घ्या..." असं म्हणतो की काय असं मला वाटलं
"काय?"
"तुमचं एक अकाउंट आता मॅच्युअर झालंच आहे, आता दुसरं एक उघडा. वाटल्यास मुलाच्या नावे उघडा. हे माझं कार्ड. कुठे राहता आपण?"
'इट इज नन ऑफ युवर बिझनेस' हे वाक्य मराठीत कसे म्हणावे या विचारात माझे अर्धे मिनिट गेले. तेवढ्यात मॅनेजर बाईंच्या टेबलाशी उभ्या असलेल्या सज्जनांनी अंगविक्षेप करून मला तिकडे बोलावून घेतले.
"गुड मॉर्निंग मॅडम" कधीकधी माझ्या अंगात स्त्रीदाक्षिण्य संचारते. बाईही दिसायला जरा... असो.
"
गुड मॉर्निंग. बसा. राणे, काय प्रॉब्लेम आहे यांचा?"
मग राणेंनी परत एकदा साधुवाण्याची कथा सांगितली. दरम्यान माझी अवस्था 'रुपया नही तो डॉलर दे दे, कमीज नही तो कमीजका कॉलर दे दे' अशी झालेली. बाईंनी आता त्यांच्या संगणकावर काहीतरी केले. दरम्यान राणे 'तळ्यात-मळ्यात' अशा अवस्थेत घुटमळत होते. पाचसात मिनिटे गेली.
"गेल्या वर्षीपर्यंत पद्मावती शाखेत खातं होतं ना तुमचं?"
"होय."
"मग इकडे का ट्रान्स्फर केलं तुम्ही?"
"चूक झाली हो. खरं तर मी ते नाशिकला ट्रान्स्फर करायला पाहिजे होतं, म्हणजे मला अधिक गैरसोयीचं झालं असतं.."
"हे बघा, कुजकटपणा करण्याचं कारण नाही. ट्रान्स्फर म्हणाजे नवं खातं उघडल्यासारखंच असं म्हणतोय तो..."
"हे बघा बाई..." मी म्हणालो. अधिकारी महिलावर्गासमोर अगतिकतायुक्त संताप व्यक्त करायचा असेल तर हे संबोधन वापरावे. तसे करत असताना नाना पाटेकरसारखे चष्म्याच्या काचेवरून सदर महिलेकडे बघता आले तर फारच उत्तम. "हा कोण जो तुमचा तो आहे, मला माहिती नाही. तो माझ्या खात्यावरचे व्यवहार का कंट्रोल करतो आहे, मला कल्पना नाही. मला एकच सांगा, माझ्यासारख्या गरीबाला माझे स्वतःचे पैसे माझ्याच खात्यातून काढता येतील अशी काही तरतूद तुमच्या बँकेत आहे का?"
"खातं बंद करणार का तुम्ही?
"तसं करता येईल का?"
 यावर बाई 'त्याला विचारावं लागेल' असं म्हणतायत काय अशी मला शंका आली. पण सुदैवाने त्या "हो, त्यात काय, सात नंबर खिडकीतून फॉर्म घ्या" म्हणाल्या. आपल्याला आपले खाते बंद करता येते या आनंदात मी सात नंबरच्या खिडकीसमोर बारी लावली. माणूस कसा अल्पसंतुष्ट होत जातो पहा. माणसाला त्याच्या क्षुद्रतेची जाणीव करून द्यायची असेल तर त्याला हिमालयातल्या एखाद्या भव्य सुळक्यावर न्यावे. ते अवघड असेल तर एखाद्या सरकारी कार्यालयात न्यावे. सगळा नक्षा उतरतो. दहा मिनिटांनंतर तो खास सरकारी रंगाचा फॉर्म हाती मिळाला. त्याच्या तळाला एक अतिसूक्ष्म आकाराचा चौकोन होता आणि त्यात 'अफिक्स रेव्हेन्यू स्टँप हिअर' असे लिहिलेले होते. रेव्हेन्यू स्टँप आणि पासपोर्ट साईज फोटो लावायचे चौकोन त्या त्या आकाराचे  का असत नाहीत कुणास ठाऊक. मी चपळाईने खिडकीतून एक रुपयाचे नाणे सरकावले.
"नाही, फॉर्मचे काही पैसे नाहीत"
"हो, ते माहिती आहे मला.."
"मग?" मी त्यांना एक रुपयाची लाच देतो आहे की काय असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
"अहो, रेव्हेन्यू स्टँप.."
"तो इथं नाही मिळत."
"मग कुठे मिळतो?"
"मला काय माहीत हो? मॅनेजरांना विचारा."
चला, परत बाईंकडे. आता फॉर्म न भरता का चौकशीला आला म्हणून बाई परत खवळायला नकोत म्हणून आधी फॉर्म भरला, त्यावर 'फायनल विद्ड्रॉल' असं लिहिलं आणि परत मॅनेजर बाईंकडे आलो.
"हं. झालं? त्यावर फायनल विद्ड्रॉल असं.. हं, लिहिलंय नाही का तुम्ही.. आता त्यावर रेव्हेन्यू स्टँप लावून सही करा आणि पासबुक आणि तो फॉर्म राणेंकडं द्या. दोनतीन दिवसांत तुम्हाला पे ऑर्डर मिळेल.." 
"बाई.." माझी परत चष्म्यावरुन नजर. "आता तो रेव्हेन्यू स्टँप तेवढा कुठं मिळेल ते सांगा की.."
"इथं नाही बाई मिळत.."
बाई आता 'इश्श' म्हणून एखादा मुरका मारतात की काय  या शंकेने मी कसासाच झालो.
"अहो, मग कुठं मिळेल ते सांगा"
"असं करा, पोस्टात विचारा, नाहीतर स्टँप व्हेंडरकडे नक्की मिळेल"
माझ्या माहितीतला स्टँप व्हेंडर तिथून दोन किलोमिटरवर आहे. त्यापेक्षा पोस्ट जवळ म्हणून मी पोस्टात चालत निघालो. आता ऊन मी म्हणायला लागलं होतं. धापा टाकत मी पोस्टातल्या तिकिटांच्या खिडकीशी आलो आणि ठळक अक्षरात लिहिलेली 'रेव्हेन्यू स्टँप शिल्लक नाहीत' ही पाटी दिसली.
आमच्या पोस्टातल्या बाई अतिशय शांत स्वभावाच्या आहेत. माणसं कितीही गाढवासारखी वागली तरी त्या बिचाऱ्या आपला पारा चढू देत नाहीत. हे माहिती असल्यानं मी रांगेत उभा राहिलो आणि माझा नंबर आल्यावर स्पष्ट आवाजात एकेक शब्द तोडून म्हणालो,

"रेव्हेन्यू   स्टँप   कधी   येणार   आहेत?"

"काही सांगता येणार नाही हो..."
"????????"
"बहुदा नाही येणार..."
"आं?"
"अहो, त्याचं काय आहे, पूर्वी त्यावर पोस्टाला जे कमीशन मिळायचं ना, ते हल्ली देत नाहीत. म्हणून आम्ही नाही ठेवत रेव्हेन्यू स्टँप."
'पब्लीकला साला असाच ठेचून काढला पाहिजे' हा विचार गिळत मी म्हणालो,
"मग...?"
"ट्रेझरीत मिळतील बघा. नाहीतर एखाद्या स्टंप व्हेंडरकडे असतील."

'काय सांगताय? खरंच असतील का हो? आणि कदाचित मला मिळेलसुद्धा एखादा, नाही का? तुम्हाला काय वाटतं?' हा आपला आत्मसंवाद.

हताशपणानं घराकडे चालत येत असताना मला अचानक मुक्याची आठवण झाली. मुक्या म्हणजे मुकुंद रानडे. आमचा मित्र. तो ट्रेझरीजवळच्याच एका बँकेत नोकरीला आहे. वाटलं, कुणी सांगावं, त्याच्या बँकेत असेलही एखादा गुप्त रेव्हेन्यू स्टँप. नसलाच तर ट्रेझरी जवळच आहे त्याच्या बँकेच्या. येताना घेऊन ये म्हणून सांगू पाचदहा. त्याचा फोन फिरवला. 'हात्तीच्या, लगेचच आणतो आणि संध्याकाळी टाकतो तुझ्याकडं' मुक्या आत्मविश्वासानं म्हणाला. अर्धाएक तास गेला आणि फोन वाजला. मुक्याच होता.

"अण्णा...."  मुक्या म्हणाला. "मी ट्रेझरीतूनच बोलतोय.."
"बोल"
"रेव्हेन्यू स्टँप आहेत इथं."
"काय सांगतोस! है शाब्बास.."
"पण ते सुट्टे मिळत नाहीत म्हणे"
"??????"
"किमान एक हजार घ्यायला लागतील म्हणतायत."
"हा....हा... हजार?"
"होय, एक हजार. काय करु?"
"......."
"अरे बोल की"
"अरे काय करू काय....मुक्या, मोबाईल डाव्या हातात धरला असशील ना?"
"हो, का?"
"एक काम कर, उजव्या हातानं तुझ्यासमोर जो कोणी असेल त्याच्यासमोर स्वतःला एक खाडकन थोबाडीत मारून घे. कारणबिरण काही विचारू नकोस. संध्याकाळी मी भेटलो की मलापण एक हाण, म्हणजे फिटाफिट"

संध्याकाळी मुक्या काही भेटला नाही पण नानजकर भेटला. नानजकर हाही इन्शुरन्स एजंटच, पण दोस्तांमधला असल्यामुळे अगदी प्राणघातक वगैरे नाही. मनाच्या चिरफाळलेल्या अवस्थेत मी नानजकरला ही सगळी कथा सांगितली आणि म्हणालो, "जग कसं आहे बघ नान्या, एक रुपयाच्या टिनपाट स्टँपसाठी माझा अर्धा दिवस वाया गेला. शिवाय काम झालं नाही ते नाहीच आणि वरतून मनस्ताप..."
"मूर्ख आहेस." नान्याने धृपद म्हटले.
"आता या वेळी का, ते तेवढं सांग.."
"अरे, मला फोन करायचा."
"का? पोस्टमास्टर जनरल तुझा सासरा आहे वाटतं? आणि तुला फोन करून काय करायचं?"
"म्हणायचं की मला असा असा रेव्हेन्यू स्टंप पाहिजे आहे..."
"मग तू काय केलं असतंस?"
"मी असा खिशात हात घातला असता, असं पाकीट बाहेर काढलं असतं, असा त्यातनं तो स्टँप काढला असता, आणि असा तुझ्यासमोर टाकला असता.."

असं म्हणून नानजकरनं तो लाखमोलाचा रेव्हेन्यू स्टँप माझ्यासमोर टाकला!