ने पुन्हा मज माउली...!

..................................................
ने पुन्हा मज माउली...!
..................................................

सोसवेना हे जिणे; मज ने पुन्हा देहात ने !
ने पुन्हा मज माउली तू गर्भकाळोखात ने !

पाहिले येऊन येथे; जीव पण रमला कुठे ?
घेतले नाना पवित्रे; खेळ पण जमला कुठे ?
डाव शेवटचाच हा...मी हारण्याच्या आत ने !

य़ेथल्या चकव्यांत आता यापुढे जगणे नको !
ताणुनी आयुष्य सारे हे असे तगणे नको !
तोड माझी नाळ; मज तू ने पुन्हा उदरात ने !

झोप लागावी अशी की जागही येऊ नये !
जागण्यासाठी कुणी मज हाकही देऊ नये !
गाढ काळोखात ने; मज गूढ एकांतात ने !

एवढे उपकार दुसऱ्यांदा पुन्हा करशील ना ?
पोटच्या गोळ्यास पोटाशी पुन्हा धरशील ना ?
नरक झाला भोगुनी; मज तू तुझ्या स्वर्गात ने !

* * *

घाल जन्माला असा तू जीव तेजस्वी पुन्हा...
जो कधी करणार नाही जन्म जगण्याचा गुन्हा... !!
अंत वा आरंभ नाही; मज तशा तेजात ने !

* * *
गर्भकाळोखातुनी तू मज तशा तेजात ने !!

- प्रदीप कुलकर्णी
..................................................
रचनाकाल ः १८ व ३० सप्टेंबर २००२
..................................................