'सारे तुझ्यात आहे' अल्बमचा प्रकाशनसोहळा

'सारे तुझ्यात आहे' या आल्बमच्या (ध्वनि तबकडीईच्या सीडी च्या) प्रकाशनाचा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक मंडळात पार पडला. सहा ते आठ अशी वेळ दिली होती. ठीक साडेसहाला म्हणजे 'भारतीय' वेळेप्रमाणे बरोबर सुरू झाला.

श्री. हेमंत बर्वे यांनी सुत्रसंचालनास सुरुवात केली. चुरचुरीत शैलीत मसुदा (स्क्रिप्ट) लिहिला होता. स्वागतकाचे काम आल्बमचे निर्माते आणि जयश्रीताईचे पती श्री अविनाश अंबासकर यांनी भूषविले. गायक गायिका वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीतकार अभिजित राणे, फ़ाउंटन म्यूझिकचे कांतिभाई ऒसवाल आणि मान्यवर अतिथि सुप्रसिद्ध संगीतकार श्री अशोक पत्की यांचे त्यांनी स्वागत करून त्यांना स्थांनापन्न केले.

प्रास्ताविकानंतर माईक जयश्रीताईच्या हातात गेला. काही व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने एखाद्या समारंभावर ठसा उमटवून जातात. त्यांनी कुवैतच्या मराठी मंडळासाठी रचलेले स्वागतगीत (वा स्फूर्तिगीत म्हणू) म्हणून दाखवले. शब्द कसे उच्चारावेत, गद्य वाक्यात स्वराचा चढउतार कसा असावा हे खरे म्हणजे त्यांच्याकडून शिकावे. प्रत्येक शब्दाला त्या वाक्यात एक विशिष्ट नाद असतो, एक उच्चारसौंदर्य असते. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते. असे नादमय बोलणे असल्यावर कविता मीटरमध्येच जन्माला आल्या तर आश्चर्य नाही. असे नादमय पण हिंदी शब्द मी कलापिनी कोमकली यांच्या तोंडून ऐकले आहेत. ही एक निसर्गत्त अशी दैवी देणगी आहे आणि फ़ार दुर्मिळ आहे. याबद्दल जयश्रीताईंचे अभिनंदन. यात एकहि अ़क्षर अवास्तव नाही. जयश्रीताईंना मी पहिल्यांदाच पाहिले व त्यांना भेटलो देखील नाही. पण त्यांचे ते उच्चार अजून माझ्या कानांत आहेत. समारंभ वेगळ्या उंचीवर गेला आहे हे जाणवू लागले.

हेमंतने मग स्वप्निलला कांही प्रश्न विचारले. अर्थातच स्वप्निलने त्यांना योग्यती उत्तरे दिली. स्वप्निलने नंतर याच आल्बममधील "आभास चांदण्यांचा" ही गजल म्हटली. साथीला त्याच गाण्याचा इंटरनशनल ट्रॅक म्हण्तात तो वाजत होता. असे गाणे तेवढे सोपे नाही. स्वप्निलने त्याचे व्यावसायिक कौशल्य सिद्ध केले. सोहळा एका वेगळ्याच माहोलमध्ये गेला.

नंतर वैशाली. तिने प्रथम तिचे विचार व्यक्त केले. वेळ खर्चून आलेल्या रसिकांचे आभार मानले. तिला देखील हेमंतने असेच काही प्रश्न विचारले. उत्तरे झाली. तिने व व स्वप्निलने अल्बममधील 'ओला वारा' हे द्वंद्वगीत म्हटले. इंटरनॅशनल ट्रॅक च्या साथीने. ठीक झाले. या गाण्यामधील वैशिष्ट्यपूर्ण ठेका मात्र ठसा उमटवून गेला.

मग अभिजित राणेशी थोड्या गप्पा. अर्थात सुत्रसंचालक हेमंतच्या माध्यमातून. मग ओसवालजी बोलले. आणि पुन्हा एकदा जयश्रीताईंनी मनाचा ताबा घेतला आणि शब्दस्वर्गाची सफ़र घडवली.

मग या सर्वावर कळस चढला. अर्थातच देवकी. देवकीने जाहीर केल की ती इंटरनॆशनल ट्रॅकच्या साथीने न गाता नुसतीच दोन ओळी गाईल. मग हेमंतने संगीत संयोजक प्रशांत लळित यांस पाचारण केले.  ते संवादिनीवर बसले. आणि देवकीने बाजी मारली. दोन ओळीत तिने संपूर्ण सभागृह जिंकले. एका रसिकाने वन्स मोअर दिला. आपणा रसिकाचा आग्रह कोणी नाकारू शकतो काय? आणि पुन्हा दोन ओळी. याचा रसास्वाद लिहायला संगीतज्ञाचीच गरज आहे.  दिव्यत्वाचा स्पर्श आणखी काय वेगळा असतो.

नंतर सर्व लहानमोठ्या कलाकारांचा सत्कार. ओसवालजी इ.थोरांचे तसेच आल्बमच्या निर्मितीतील लहानमोठ्या कलाकारांचे सत्कार होऊन सोहळा सम्पन्न झाला. शेवटी जयश्रीताईंचे आभारप्रदर्शन. मनोगत चे आणि देवकाकांचे त्यांनी खास उल्लेख करून आभार मानले.

कांही गोष्टी मात्र खटकल्या. एवढा छान चुरचुरीत मसुदा. पण हेमन्तचा स्वर "आकाशवाणिवरील हे मरातीतील बातमीपत्र दिल्लीवरून ध्वनिक्षेपित करण्यात येत असून ......" असा पन्नास वर्षापूर्वीचा. नवीन पिढीचा जोश पूर्ण गायब. एखाद्या दिवशी एखादा आपला सूर गमावतो. तसेच एका छोट्या कलाकाराचा सत्कार करतांना "हा अंडर ग्रॅज्युएट आहे" असा उल्लेख केला होता. अशा गोश्ह्टी टाळता येण्यासारख्या होत्या. असो. एक संस्मरणीय असा आनंददायी सोहळा संपन्न झाला.

मी व्यावसायिक पत्रकार नाही. टाचणे काढली नाहित.म्हणुन काही तपशील देता आले नाहीत. ती न काढल्यामुळे काही घटनाक्रम पुढेमागे झालेला आहे. तरी क्षमस्व.

सुधीर कांदळकर