१-२-३ चे १२: अकलेचे ३-१३

            आता आपण म्हणाल, हे काय शीर्षक आहे नेमके? पण 'त्या'नंतर माझी मती अशी काही कुंठीत झाली की मला काय शीर्षक द्यावे हे सुचेना. (पुढे कसं आणि काय लिहिले असेल याचा विचार न करता वाचून टाका). 'त्या'नंतर हे वाचून 'कशानंतर' हा प्रश्न पडला असेलच. तर, "१-२-३" हा हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर... ही सुरुवात जर अगदीच सोसो (बकवास!) वाटल्यास तो देखील चित्रपटाचाच परिणाम समजावा

            शुक्रवारी म्हणजे कालच आम्ही कार्यालयीन गटातील मंडळी (टीम मेंबर्स) अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन 'गरुडा मॉल' (बंगलोर) मधल्या एका रेस्टॉरन् (मराठी ?) मध्ये जेवायला गेलो होतो. एवढ्या चांगल्या जेवणानंतर आम्हाला काय दुर्बुद्धी सुचली आणि आम्ही तिथेच असलेल्या Inox या चित्रपटगृहात (तिकिट मूल्य रु. २२० देऊन) हा "१-२-३" बघण्यास गेलो. ही पार्श्वभूमी देण्याचे कारण असे की आम्ही मनस्ताप किती रुपयांना विकत घेतला हे सांगून दु:ख हलके करावे!

            या 'मल्टिस्टारर' चित्रपटात मुख्य अभिनेते आहेत: तुषार कपूर, सुनील शेट्टी आणि परेश रावल. तुषार कपूर हा एक होतकरू गुंड आहे. त्याला 'भाईगिरी' मध्ये 'करियर' करायचेय पण तो (नेहमीप्रमाणे) अतिशय भावुक आणि भित्रा! सुनील शेट्टी हा झालेला आणि एका चांगल्याश्या कार्यालयात नोकरी करणारा तरुण, जो लोकांना साधे-साधे (मूर्खासारखे) प्रश्न विचारून वैताग आणतो. यावर वरकड म्हणजे परेश रावल, जो दिल्लीच्या चांदणी चौकात 'अंतर्वस्त्रां'चा व्यवसाय करतो. त्याच्या मुलाची मोठी, आंतरराष्ट्रीय दर्जाची स्त्री-अंतर्वस्त्रांची कंपनी आहे तरी हा बाप रस्त्यावर एका गाडीतूनच विकतोय. चित्रपटातील अत्यंत हीन, अभिरुचिशून्य, तथाकथित विनोदांचा एकमेव स्रोत म्हणजे 'अंतर्वस्त्र' हाच असावा हे सुरुवातीच्या ५ मिनिटातच लक्षात येते. आणि यात महत्त्वाचा मुद्दा असा की या तिघांचे ही नाव 'लक्ष्मी नारायण' आहे! यांच्या सोबतीला आहेत उपेन पटेल, ईषा देओल, समीरा रेड्डी आणि तनिषा (काजोल ची बहीण!)

            आता हे तिघं 'लक्ष्मी नारायण' एकाच पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. तिघांनाही वेगवेगळ्या कामांनिमित्त एक छायाचित्र आणि काही माहिती कुरियर द्वारे कळवण्यात आलेले आहे. ते कुरियर (अपेक्षितरीत्या) पोहचण्यात गफलत झाल्याने पुढे होणारा 'गोंधळ', हे चित्रपटाचे सूत्र आहे. हा 'गोंधळ' दाखवण्यासाठी 'अंदाज अपना अपना', 'हेराफेरी १ व २', 'हलचल', 'क्या कूल है हम', '३६ चायना टाऊन', इ. चित्रपटांतील विनोदी दृश्ये/संवाद जसेच्या तसे उचलून फक्त 'खिचडी' (अगदी बेचव) केलीय आणि सोबतीला वारंवार स्त्रियांची अंतर्वस्त्रे दाखवून केलेले फाजील विनोद (त्यांना विनोद म्हणावे का?) आहेतच!! यासर्वांत 'पापा' आणि त्याचे 'बच्चे' हे गुंड अधिकच मानसिक छळ करून जातात

            एकंदरीत काय, दिग्दर्शन तर चांगले नाहीच परंतु परेश रावल आणि सुनील शेट्टी (?) असूनही अभिनयसुद्धा वाईटच! बाकी लोकांकडून तर अपेक्षाच नाही. पटकथाच योग्य रितीने मांडलेली नसल्याने संवादही तसेच फुटकळ. चित्रीकरण, गाणी, वेशभूषा, इ. सगळेच शिकाऊ लोकांनी केल्याप्रमाणे आहे. एकूणच सगळी वैचारिक, किंवा कलात्मकतेची म्हणा हवं तर, गरिबी आहे.

            आणखी लिहिण्यासारखे बरेच काही असले तरी माझी प्रतिभा येथेच खुंटली. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर तमाम जनतेचे चेहरे सुतकी दिसत होते. तेव्हा मंडळी, माझी अगदी कळकळीची विनंती आहे की आपला कष्टाचा पैसा आणि बहुमोल वेळ या चित्रपटाकरता खर्च करण्याआधी या लेखाचा जरुर विचार करावा!

            हो, चित्रपट कसा 'नसावा' याचा अभ्यास करायचा असेल, तर बघायला हरकत नाही....

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१. चित्रपट समीक्षणाचा पहिलाच प्रयत्न असून हा लेख अतिशय 'विमनस्क मनस्थितीत'  लिहिल्याने विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे. सांभाळून घ्या...

२. मला या चित्रपटातील अभिनेते-अभिनेत्री यांशिवाय बाकी कोणी किंवा काही माहिती नाही. तसेच वरील सर्व मते माझी वैयक्तिक आहेत. ती इतर कुणाच्या मतांशी जुळण्याची शक्यता नाही आणि अपेक्षितसुद्धा नाही.