जटायू

का पुन्हा खोटे हसावे वाटते?
चेहर्‍यामागे लपावे वाटते...

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!

चार दाणे आज कोणी टाकले
पाखरांना किलबिलावे वाटते

नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते!

प्रश्न माझा वाल्मिकीला एवढा -
का जटायूला लढावे वाटते?

काय त्याचा दोष? कसली ही सजा?
...काय त्यालाही जगावे वाटते?

तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?

हे असावे ते नसावे वाटते
यात का आयुष्य जावे वाटते?

जाणतो होणार नाही जे कधी
ते अचानक आज व्हावे वाटते...