...लवकर ये !

........................................................
... लवकर ये !
........................................................

रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये !
हो माझी श्रावणसर; लवकर ये !

वाळवंट जगण्याचे रणरणते...
देहाची धूळ किती वणवणते...
कळवळते, तगमगते अन् म्हणते -
-`सोड सोड तू अंबर; लवकर ये `!

तूच फक्त; तूच निवारा माझा !
तूच विसावा नि सहारा माझा!
ऐक जरा; ऐक पुकारा माझा !
काहीही आता कर...लवकर ये !

सांग तुझी वाट किती पाहू मी ?
सोसवे न; सांग किती साहू मी ?
वाट बघत सोसत का राहू मी ?
आपुल्यात का अंतर ? लवकर ये !

* * *

मिटले; सारे दरवाजे मिटले...
फिटले रे, जाल भ्रमांचे फिटले...
मन आता या जगण्याला विटले...
ये मरणा, ये लवकर ! लवकर ये !

- प्रदीप कुलकर्णी
........................................................
रचनाकाल ः १७ सप्टेंबर २००२
........................................................