मोजणी

हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही
मीही चुकून तेथे कोणास नेत नाही

ऐन्यात शोधतो मी सारे जुने पुरावे
निसटून काळ गेला हातात येत नाही 

बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही

मी श्वास घेत आहे की भास होत आहे ?
काळीज धडकल्याचा आवाज येत नाही

आश्वासने जरी ते देऊन काल गेले
परतून भेटण्याला कोणीच येत नाही

माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही